Homeपुणे‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा ‘श्री गणेश रत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल.

टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल. त्यानंतर दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल.

या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने ‘श्री गणेश रत्न रथ’ सजविण्यात आला असून या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाचे जोरदार वादन करणार आहेत, यानंतर रात्री अकरा वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे करण्यात येईल. ” पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवू असा आमचा मानस असल्याचेही बालन यांनी सांगितले.

‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’

– पुनीत बालन
विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments