गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी व्हिजन सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने “निर्माल्य वाहन आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे जितेंद्र जोशी व माजी सभागृह नेते निलेश निकम यांच्या हस्ते पार पडले.
गणेश पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या फुले, फळे, नारळ यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. या निर्माल्याची थेट नदीत विल्हेवाट लागून जलप्रदूषण होऊ नये म्हणून नागरिकांच्या दारापर्यंत निर्माल्य वाहन जाऊन संकलन केले जाते. व्हिजन सोशल फाउंडेशन गेली २० वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत असून, “तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या – आम्ही तुम्हाला खत देऊ” या संकल्पनेतून हा उपक्रम जनतेत लोकप्रिय झाला आहे.
निर्माल्यावर प्रक्रिया करून दीड-दोन महिन्यांनी दिवाळीच्या सुमारास खत तयार केले जाते आणि नागरिकांना ते मोफत वितरित केले जाते. तसेच गेल्या सात-आठ वर्षांपासून खताबरोबरच रोपेही दिली जात आहेत. या उपक्रमामुळे दरवर्षी दोन ते तीन टन निर्माल्य जमा होऊन पर्यावरणपूरक खत तयार होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी म्हणाले की, विसर्जनानंतर नदीपात्रात साचणारा निर्माल्याचा थर हे प्रदूषणाचे मोठे कारण ठरते. ज्या गणरायाची भक्तिभावाने पूजा करतो, त्याचे निर्माल्य योग्य पद्धतीने वापरले जावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. नागरिकांना ही संकल्पना आवडल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
उद्घाटन प्रसंगी आदित्य माळवे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, संतोष काळे, सचिन मानवतकर, केशवराज धर्मावत, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, विनोद बांदल, मुकेश जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यंदा या उपक्रमाचे २० वे वर्ष असून संयोजन विकास डाबी यांनी केले.


Recent Comments