Newsworldmarathi Pune: सुखसागर येथील श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा नवरात्रौत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्वर्गीय धनराजजी मालचंदजी राठी यांनी १९९३ मध्ये सुखसागर नगर परिसरात या ट्रस्टची स्थापना केली होती. गेल्या ३२ वर्षांपासून ट्रस्टतर्फे धार्मिक परंपरा जपत जन्माष्टमी, दत्तजयंती, गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवासारखे अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले जात आहेत.
यंदा सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या पूजाअर्चा, अभिषेक व आरतीसोबतच भजन, दांडिया, भोंडले यांसारखे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७:३० वाजता आरती होणार असून दिवसभर प्रसाद वाटपाची सोय असेल.
अष्टमीच्या दिवशी देवीची फुलांनी आकर्षक सजावट केली जाईल. तसेच हलवा-पुरीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाईल. मान्यवरांच्या हस्ते आरती होणार असून परिसरातील विविध मंडळांतर्फे देवीला तोरण अर्पण केले जाईल. या धार्मिक वातावरणात भाविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून सुरक्षा दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्ड्सची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोयही केली आहे.
विश्वस्त मगराजजी एम. राठी, रविंद्र डी. राठी, राजेश डी. राठी आणि संपूर्ण राठी परिवारासह स्वयंसेवक, तसेच पोलिस यंत्रणा शिस्तबद्ध नियोजनात सक्रिय सहभागी आहेत. दररोज सुमारे पाच ते सहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज आहे.
श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे परिसरातील सर्व नागरिक, भाविक व भक्तजनांना नवरात्रोत्सवाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments