Newsworldmarathi Pune : गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे निर्माल्य नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जित होऊन जलप्रदूषण होऊ नये, यासाठी व्हिजन सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ‘निर्माल्य वाहन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे २१ वे वर्ष असून, निर्माल्य संकलन करणाऱ्या वाहनाचे उद्घाटन नगरसेविका निशा सचिन मानवतकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गणेशपूजनासाठी वापरण्यात येणारी फुले, फळे, नारळ आणि अन्य पूजासाहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माल्याच्या स्वरूपात जमा होते. हे निर्माल्य जलस्रोतांमध्ये जाऊन प्रदूषण होऊ नये, तसेच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी, या उद्देशाने फाउंडेशनकडून नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन निर्माल्य संकलित केले जाते.
‘तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या, आम्ही तुम्हाला खत देऊ’ या संकल्पनेतून गेल्या वीस वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. संकलित केलेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. साधारण एक-दोन महिन्यांनंतर, दिवाळीच्या काळात नागरिकांना हे खत तसेच रोपे देण्यात येतात. गेल्या सात-आठ वर्षांपासून नागरिकांना खत आणि रोपे देण्याचा उपक्रमही राबविला जात असल्याचे व्हिजन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी यांनी सांगितले.
दरवर्षी या उपक्रमातून सुमारे दोन ते तीन टन निर्माल्य संकलित केले जाते. गणरायाला श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डाबी यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी शामराव सातपुते, आदित्य माळवे, सचिन मानवतकर, प्रविण डोंगरे, विजयसिंह निकम, मुकेश जाधव, हेमंत डाबी, विशाल जाधव, स्वप्निल निकम, शशिकांत अंबेडे, केशवराज धर्मावत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपक्रमाचे संयोजन विकास डाबी यांनी केले.


Recent Comments