Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून आदिमायेच्या जागराने पुणे शहर भक्तिभावाने गजबजले आहे. या काळात पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या *पुणे नवरात्र महोत्सवाचे* उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात आयोजित केला जातो.
यंदा मात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला वेगळेच राजकीय रंग मिळाला. विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसपासून दुरावलेले आबा बागुल यांनी आपल्या मंचावर भाजपमधील वजनदार मंत्री आणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष्य साधल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी गेली ३५ वर्षे पाळलेला वैयक्तिक नियमही यावेळी मोडला.
उद्घाटनावेळी बावनकुळे म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून मी घरी घटस्थापना केल्यानंतर दिवसभर महालक्ष्मीची पूजा-अर्चना करतो आणि घराबाहेर जात नाही. पण आबा बागुल यांनी लक्ष्मीमातेचे दर्शन घेण्यासाठी आग्रह केला आणि तो मोडता आला नाही. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हा नियम मोडला आहे.”
दरवर्षी महोत्सवाच्या मंचावर काँग्रेस नेत्यांची उपस्थिती असते. मात्र यंदा भाजप नेत्यांचा मोठा जमाव दिसून आला. महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह पर्वती मतदारसंघाच्या आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे हे भाजप नेते एकाच मंचावर आले. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचीही उपस्थिती होती.
यामुळे काँग्रेसपासून दुरावलेले आणि नव्या राजकीय समीकरणांच्या शोधात असलेले आबा बागुल यांनी आपला प्रभाव दाखवत भाजपच्या मंत्र्याला मंचावर आणल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागुल यांच्या या पावलाकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.


Recent Comments