Newsworldmarathi Pune: गोरक्ष स्मृती फाउंडेशन आणि गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ मधील माता-भगिनींसाठी मोफत महालक्ष्मी दर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. सर्वांनी भक्तीभावाने ‘जय अंबाबाई’च्या घोषणांमध्ये यात्रेची सुरुवात केली. या यात्रेत शेकडो माता-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला व आई अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दर्शनानंतर सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि श्रद्धेचे तेज दिसत होते. खोपडे यांनी या यात्रेचे आयोजन केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न ठेवता समाजातील एकता, सेवाभाव आणि सामूहिक श्रद्धेचा सुंदर संगम घडवून आणला. हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरल्याचे उपस्थित महिलांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या पार पडले असून यात्रेतील सर्व व्यवस्थेमुळे सहभागी महिलांना कोणताही त्रास जाणवला नाही. गोरक्ष स्मृती फाउंडेशनने या माध्यमातून समाजकार्याची नवी दिशा दाखवली आहे.
या यात्रेद्वारे धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि आनंदाचा संदेश मिळाला. सहभागी माता-भगिनींनी दिलेल्या प्रतिसादामुळे आयोजकांमध्ये आणखी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांनी सहभागी झालेल्या सर्व माता-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही अशाच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


Recent Comments