Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधील राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आला असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वाती चिटणीस यांनी अधिकृतपणे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केल्याने प्रभागातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
स्वाती चिटणीस या युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून संघटन कौशल्य, लोकसंपर्क आणि सामाजिक कार्यातील त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग हा त्यांच्या कार्याचा प्रमुख आधार मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद राहिला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची विश्वासार्ह आणि कार्यक्षम कार्यकर्ती अशी ओळख निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही पाहायला मिळते. सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, युवकांशी संवाद तसेच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. यामुळेच त्यांच्या उमेदवारी अर्जाची प्रभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
अर्ज दाखल करताना स्वाती चिटणीस म्हणाल्या की, “पक्षाने मला संधी दिल्यास त्या संधीचे निश्चितपणे सोने करेन. प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.” त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments