Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील कला चळवळीला चालना देणाऱ्या कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित पाचव्या भव्य चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दिनांक २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कला दालन, पुणे येथे भरविण्यात आले असून दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आदरणीय प्रमोद कांबळे, आदरणीय रामकृष्ण कांबळे आणि मा. घनश्याम देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्यास कला क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात संस्थेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विषयांवरील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या चित्रांमधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, रंगांचा समतोल आणि सृजनशील दृष्टी स्पष्टपणे जाणवते. निसर्ग, मानवी भावना, सामाजिक प्रश्न तसेच अमूर्त कलेचे विविध पैलू विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे चित्ररूपात सादर केले आहेत. उपस्थित कला प्रेमींनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले.
यावेळी कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. पूनम पोटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कलेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलाविषयक जाणिवा अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे चित्रप्रदर्शन नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून पुणेकर कला रसिकांकडून या उपक्रमाला विशेष दाद मिळत आहे.


Recent Comments