Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, या एकत्रीकरणास प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध दर्शविला होता. याच भूमिकेचा फटका त्यांना बसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुणे शहराध्यक्ष असतानाही या समितीतून प्रशांत जगताप यांना वगळण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप पुढे काय भूमिका घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.


Recent Comments