Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी–उंड्री परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार झपाट्याने वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती आण्णा बांदल, श्वेता घुले, फारूक सय्यद आणि अश्विनी सूर्यवंशी यांनी प्रभागातील विविध भागांत प्रत्यक्ष भेटीगाठी घेत नागरिकांशी संवाद साधला.
या प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
निवृत्ती आण्णा बांदल यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन असल्याचे सांगत पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. श्वेता घुले यांनी महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका मांडली. फारूक सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अश्विनी सूर्यवंशी यांनी युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
या प्रचार मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आगामी निवडणुकीत प्रभाग ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments