Newsworldmarathi pune: शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, प्रभाग क्रमांक १२ (ड) छत्रपती शिवाजीनगर–मॉडेल कॉलनी परिसरातील भाजप–आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार डॉ. निवेदिता एकबोटे यांनी या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वडारवाडी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेदरम्यान डॉ. एकबोटे यांनी आप्पा रस्ता, भांडारकर रस्ता, सुभाष रस्ता, सेना बापट रस्ता यासह परिसरातील विविध भागांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. अनियमित पाणीपुरवठा, गळती झालेल्या जलवाहिन्या, जुनी व अकार्यक्षम ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्यामुळे होणारे आरोग्याचे प्रश्न याबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या.
या वेळी बोलताना डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या की, महापालिका प्रशासनाकडून अनियमित पाणीपुरवठा, गळती झालेल्या जलवाहिन्या, दूषित पाणीपुरवठा तसेच जुनी ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. या समस्यांवर तात्पुरते नव्हे, तर दीर्घकालीन उपाय राबवले जातील. जलवाहिन्यांचे नूतनीकरण, पाण्याची साठवण क्षमता वाढवणे, ड्रेनेज व्यवस्था आधुनिक करणे यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वडारवाडी, मॉडेल कॉलनी, भोसलेनगर, मंडळकर चौक परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी डॉ. एकबोटे यांच्या भूमिकेचे स्वागत करत, विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त केला.


Recent Comments