Newaworldmarathi Pune: कारेगावच्या सरपंच आणि सोशल मीडियावर मोठी ओळख असलेल्या निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांच्यासमोर भाजपने मनीषा पाचंगे यांना मैदानात उतरवले होते. या थरारक लढतीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी २७०० मतांनी विजय मिळवत निर्मला नवले यांचा पराभव केला आहे.
निर्मला नवले या कारेगावच्या सरपंच म्हणून कार्यरत असून, सोशल मीडियावर त्या प्रचंड सक्रिय आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओंमुळे आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या शैलीमुळे त्या राज्यभर चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा होईल, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती.
मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांनी वेगळा कौल दिला. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला. मतमोजणीनंतर मनीषा पाचंगे यांनी २७०० मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.
या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यातील फरक पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. तसेच हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठीही धक्का मानला जात आहे. कारेगाव परिसरात या निकालाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी स्थानिक राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Recent Comments