Newsworldmarathi pune: श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकरवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी अखेर संमती दर्शवली असून, लगतच्या जागेमध्येच गावाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्रामस्थांना एका वर्षाच्या आत नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
याबाबतचे निवेदन आज भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवादे आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात पुनर्वसन प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम नमूद करण्यात आले आहेत.
त्यामध्ये भीमाशंकरवाडीतील सर्व घरांचे स्थलांतर लगतच्या जागेतच व्हावे, जुना गट क्रमांक १२९ (नवीन गट क्रमांक १) येथे गावाचे काम पूर्ण झाल्यानंतरच स्थलांतर करावे, तसेच बाधित प्रत्येक कुटुंबाला दुकानासाठी गाळा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गावठाणाबाहेरील सुमारे ३० ते ४० घरांना, ज्यांची ग्रामपंचायत नोंद आहे, त्यांनाही नवीन गावात घरे मिळावीत, अशी अट घालण्यात आली आहे.
तसेच स्थलांतरापूर्वी नवीन जागेचा सिटी सर्व्हे करून उतारा देण्यात यावा आणि ग्रामपंचायत उतारा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. भीमाशंकरवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करून नव्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचाही प्रस्ताव निवेदनात समाविष्ट आहे.
या सर्व अटींचा विचार करून ग्रामस्थांनी पुनर्वसनास संमती दर्शवली असून, सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.



Recent Comments