Newaworldmarathi Pune: पुणे अंधजन मंडळातर्फे आयोजित “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलनात योगेश सोमण यांनी ही इच्छा व्यक्त केली. “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिने-अभिनेते,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री योगेश सोमण तसेच ख्यातनाम साहित्यिक, गझलकार, समाजसेविका श्रीमती ममता सपकाळ उपस्थित होते.
रामटेकडी,हडपसर येथील संस्थेच्या टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये दृष्टिबाधितांच्या कल्याणासाठी प्रेरणादायक कार्य करणाऱ्या श्री दत्तात्रय जाधव यांना आंतरज्योती गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच श्री प्रकाश थोरात,श्री अनिल दिवटे,श्री सतीश निकम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
एक दिवसीय संमेलनात दृष्टीबाधित रसिकांनी कविता,गाणी सादर केली तसेच स्वरगंधा सांस्कृतिक मंच,पुणे या दृष्टीबाधित कलाकारांचा मराठी-हिन्दी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
दृष्टिबाधित व्यक्तींच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन गेल्या ६५ वर्षापासून पुणे अंधजन मंडळ या सामाजिक संस्थेतर्फे “आंतरज्योती” नावाचे ब्रेल मधील मराठी मासिक प्रसिद्ध केले जाते.दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकामध्ये कथा,कविता,माहितीपर लेख यांचा समावेश असतो.महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राहणारे दृष्टिबाधित व्यक्ती मासिकाच्या सभासद आहेत.
पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेश शहा,विश्वस्त श्री धनराज पाटील,कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती काश्मिरा ठाकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
पुणे अंधजन मंडळ ही सामाजिक संस्था गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळापासून दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.दृष्टिबाधित व्यक्तीं,विद्यार्थी यांच्या सर्वागीण विकासासाठी संस्थेमार्फत विविध प्रकल्प राबविले जात आहे उदा.दृष्टिहीन निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,१८ ते ३५ वयोगटातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल.आतापर्यंत महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिबाधित व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.



Recent Comments