Homeपुणेपुण्यातील जलसंपदा विभागाची कार्यालये परत आणा : रोहन सुरवसे पाटील

पुण्यातील जलसंपदा विभागाची कार्यालये परत आणा : रोहन सुरवसे पाटील

Newaworldmarathi Pune: जलसंपदा विभागाची पुण्यातील दोन महत्त्वाची मुख्य अभियंता कार्यालये कोल्हापूर आणि सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करून ही कार्यालये पुन्हा पुण्यातच कायम ठेवावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकींमध्ये बांधकाम आणि सिंचन व्यवस्थापनाच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले होते. ज्या प्रकल्पांचे बांधकाम ज्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच मंडळाकडे संबंधित प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, भूसंपादन, पुनर्वसन, बांधकाम, सिंचन व्यवस्थापन तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने संबंधित महामंडळाने १५ मे २०२६ रोजी विभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करणारे आदेश जारी केले. त्यानुसार मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे हे कार्यालय कोल्हापूर येथे, तर मुख्य अभियंता (विप्न), जलसंपदा विभाग, पुणे हे कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, पुणे हे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक केंद्र असून जलसंपदा विभागाची प्रमुख कार्यालये येथे कार्यरत होती. अशा परिस्थितीत ही दोन्ही महत्त्वाची कार्यालये पुण्याबाहेर हलविणे म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय महत्त्वाला कमी लेखण्यासारखे आहे.

या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील समन्वय, प्रशासकीय कार्यक्षमता तसेच नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेली दोन्ही कार्यालये पुन्हा पुण्यातच कार्यरत ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी ही दोन्ही कार्यालये पुन्हा पुण्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments