Newsworldmarathi Pune : लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून पाहिले जात असलेल्या या घटनेत पोलिस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्याची चर्चा आहे. केतनला त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच दरीत ढकलल्याचा आरोप करण्यात आला असून, या कथित कटात तिच्या काही मित्रांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असलेला केतन अग्रवाल नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च, आलिशान व्यवस्था आणि दोन्ही कुटुंबांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र या आनंदावर अचानक दुःखाचे सावट आले.
अधिकच्या माहितीनुसार, होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगड किल्ल्यावर गेले होते. ट्रेकिंग आणि फोटोशूट सुरू असताना केतन दरीत कोसळल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. त्यानंतर बचाव पथकाने जवळपास तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला बाहेर काढले. मात्र त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींची चौकशी यामधून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर या मृत्यूकडे केवळ अपघात म्हणून नव्हे तर संशयास्पद मृत्यू म्हणून पाहिले जाऊ लागले. दरम्यान, या प्रकरणामुळे अग्रवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ज्या घरात काही महिन्यांनंतर लग्नाच्या शहनाया घुमणार होत्या, त्याच घरात आता शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.


Recent Comments