Newsworldmarathi Pune: उच्च न्यायालयात जमीन मालकीचा वाद प्रलंबित असतानाच संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा जमीन व्यवहार करून मूळ जमीनमालकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी मेहबूब अब्दुल गफार शेख हा हडपसर-कोंढवा आणि काळेपडळ परिसरातील कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, तो मोक्का (MCOCA) प्रकरणातील सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जमीन रविंद्र साकला यांच्या मालकीची व ताब्यातील असून या जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका प्रलंबित आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही आरोपींनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून बनावट खरेदीखत तयार केले, त्याची शासनाकडे नोंदणी करून जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात सुभाष उत्तमचंद दुगड, राजेंद्र उत्तमचंद दुगड, संदेश अशोक भन्साळी यांच्यासह मेहबूब शेख याची एजंट म्हणून भूमिका असण्याची शक्यता तपासात नाकारता येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपींनी न्यायालयात दावा प्रलंबित असल्याची माहिती असूनही व्यवहार केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अवैध दस्तऐवज तयार करून मूळ जमीनमालक रविंद्र साकला यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या संपूर्ण व्यवहारामागील आर्थिक साखळी, बनावट कागदपत्रांची निर्मिती, तसेच गुन्हेगारी टोळीशी असलेले संभाव्य संबंध याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments