Newsworldmarathi Pune: पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि तब्बल २४ ते ३० तास अविरत चालणारी अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक हा संपूर्ण जगासाठी एक सांस्कृतिक व धार्मिक सोहळा असतो. या महासोहळ्यात कायदा, सुव्यवस्था आणि गर्दीचे नियोजन राखण्यात पुणे पोलीस दलाचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त बैठकांनंतर पोलीस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीत स्पीकर वापरण्यावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुणेकर गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे पुणे महानगर प्रमुख हेमंत बागुल यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र दिले आहे.
गणेशोत्सव हा लोकवर्गणीतून साजरा केला जात असून अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी आधीपासूनच स्पीकरचे बुकिंग पूर्ण केले आहे. अशा परिस्थितीत सर्व गणेश मंडळांना विश्वासात न घेता, त्यांची बाजू समजून न घेता पोलीस प्रशासनाने एकतर्फी निर्बंध लादला जात असल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले आहेत. त्यामुळे हा एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा आणि सर्व मंडळांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी विनंती हेमंत बागुल यांनी पत्राद्वारे पोलीस प्रशासनाला केली आहे.


Recent Comments