Homeपुणेमी पुणेकर गुजराती भाषक असल्याचा सार्थ अभिमान : डॉ. राजेश शहा

मी पुणेकर गुजराती भाषक असल्याचा सार्थ अभिमान : डॉ. राजेश शहा

Newsworldmarathi Pune : दी पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात गुजराती भाषा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Advertisements

गुजराती भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव तसेच विद्यार्थ्यांना आपल्या भाषिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडण्याच्या उद्देशाने यावेळी गरबा स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि गुजराती निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे आणि सर्जनशीलतेचे प्रभावी सादरीकरण केले. गरबा स्पर्धेत पारंपरिक गुजराती नृत्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले, तर काव्यवाचन व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गुजराती भाषेवरील आपले प्रभुत्व आणि साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावीपणे मांडली.

Advertisements

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा म्हणाले, “आजच्या युगात आपल्या मातृभाषेचे जतन करणे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही पिढ्यान्‌पिढ्या पुण्यात राहत आल्यामुळे कधी पक्के पुणेकर झालो, हे कळलेच नाही. आम्ही पुणेकर गुजराती भाषक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुजराती भाषेबरोबरच मराठी भाषेवरही आमचे तितकेच प्रभुत्व निर्माण झाले आहे.”

पी. जी. के. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जनक शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषेच्या शुद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज आपण एका भाषेत दुसऱ्या भाषेतील शब्द इतक्या सहजपणे वापरतो की अनेकदा त्या भाषेतील मूळ शब्दच आपल्या विस्मरणात जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे.”

या कार्यक्रमाला पी. जी. के. मंडळाचे सहसचिव श्री. दिलीप जगड, श्री. विनोद देढिया, हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, तसेच प्रमुख अतिथी श्रीमती अमिताबेन शाह आणि श्रीमती वर्षाबेन परमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कला मंडळ प्रमुख डॉ. अर्चना पंडित, चेतना आडतीया, शैलजा गुजराथी आणि हार्दिका पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुजराती भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांशी जवळीक साधण्याबरोबरच आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. संदीप देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गुजराती भाषा दिवसाच्या या उत्सवातून भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

“भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपणारे प्रभावी साधन आहे,” हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला. मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाला साजेशा या उपक्रमाने हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments