Homeपुणेपुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; दुष्काळ निधीसाठी सामंत यांच्याकडून १० लाखांची घोषणा

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; दुष्काळ निधीसाठी सामंत यांच्याकडून १० लाखांची घोषणा

Newsworldmarathi Pune: राज्यात यंदा दुष्काळाचे मोठे संकट असून, संकटग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी भरीव निधी उभारणे गरजेचे आहे. सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने या कामात योगदान द्यावे, असे आवाहन उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी १० लाख रुपये, तर युवासेना पुणे शहराध्यक्ष हेमंत बागुल यांनी पाच लाख रुपये आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

Advertisements

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (११ ऑक्टोबर) सामंत यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी, उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर,शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, , कर्नाटक मधील आमदार एम जी मुळे, अभिनेत्री श्वेता शिंदे, माजी नगरसेविका लता राजगुरू, नंदा लोणकर, मुख्तार शेख , विरेंद्र कीराड, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल, युवासेना पुणे शहराध्यक्ष हेमंत बागुल, सुधीर वाघूलीकर ,नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, सागर बागुल, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, धनजंय कांबळे, अशोक शिंदे, अभिषेक बागुल, गणेश पवार, समीर शिंदे हे उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारका भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया,ऋजुता जुन्नरकर यांची विशेष उपस्थिती देखील होती.

Advertisements

मराठी भाषेच्या संवर्धनावर भर
सामंत म्हणाले, ‘आबा बागुल यांचे काम गेल्या दीड वर्षापासून जवळून पाहत आहे. त्यांनी दूरदृष्टीतून ई-लर्निंग स्कूल सुरू केले असून, भविष्यात वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची त्यांची योजना महत्त्वाची आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून बोलीभाषा आणि लोककलांचे जतन करण्याचे काम होत आहे. मराठी भाषेच्या अर्थसंकल्पासाठी सुरुवातीला ५० कोटी रुपयांची तरतूद होती. आता ती ३६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी लंडनमध्ये जागतिक मराठी भाषा केंद्र सुरू करण्याचा उपक्रमही महत्त्वाचा आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम हे पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन आयोजित झाले पाहिजेत. अशा कार्यक्रमांना राज्यकर्त्यांनीही उपस्थित राहिले पाहिजे. पुढील वर्षापासून पुणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रासाठी डॉ. संजय दुधाणे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. विजय फळणीकर, सांस्कृतिक क्षेत्रासाठी निकिता मोघे आणि लोककलेसाठी वैशाली समसापूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याची सूचना केली. पुढील वर्षी एक लाख नागरिकांना हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले सीपीआर प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवावे’, असे ते म्हणाले.

३२ वर्षांची सांस्कृतिक परंपरा
प्रास्ताविकात आबा बागुल म्हणाले, ‘कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गेल्या ३२ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाने या महोत्सवाची सुरुवात झाली होती. गेल्या २३ वर्षांपासून काशी यात्रेचे आयोजन करण्यात येत असून, आतापर्यंत ६० ते ७० हजार नागरिकांना या यात्रेचा लाभ मिळाला आहे. सहकारनगरमध्ये राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल सुरू केले असून, वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी आणि इमारतीचा अतिरिक्त मजला उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

उल्हास पवार यांनीही बागुल यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाबरोबरच शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केले, असे ते म्हणाले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महोत्सवाची परंपरा जपण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.

नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी अरुंधती पटवर्धन समूहाने ‘शिवशक्ती’ हा भरतनाट्यम कलाविष्कार सादर केला. विनोद धोकटे, स्वाती धोकटे आणि सहकलाकारांनी ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ तसेच एकवीरा देवीवरील गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया आणि ऋजुता जुन्नरकर यांच्या नृत्याविष्काराने रसिकांची दाद मिळवली. निकिता मोघे यांनी नृत्यदिग्दर्शन केले. या वेळी देवीची आरती करण्यात आली आणि नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले, तर घनश्याम सावंत यांनी आभार मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments