Newsworldmarathi Pune: मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल चेस चॅम्पियनशिप २०२६) भारताच्या क्रिशव कवित शाह याने चमकदार कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकावत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदके पटकावून क्रिशवने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप उमटविली आहे.
क्वालालंपूर येथील सिटिटेल मिड व्हॅली हॉटेलमध्ये ४ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भारतासह मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केनिया, बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा, नामिबिया, ब्रुनेई आणि स्कॉटलंड अशा १३ देशांतील २९३ युवा बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत क्रिशवने पंधरा वर्षांखालील गटात आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि अचूक निर्णयक्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले. स्पर्धेतील त्याची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. विविध देशांतील खेळाडूंशी स्पर्धा करताना त्याने दाखविलेला आत्मविश्वास आणि संयम यामुळे त्याच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे.
या यशामुळे क्रिशवच्या कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन केले. दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई करून त्याने कुटुंबीयांसह देशाची मान उंचावली आहे. भविष्यातही त्याने अशाच प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून भारताचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.


Recent Comments