Homeपुणेराज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा; मदतीत हात आखडता घेणार नाही : एकनाथ...

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा; मदतीत हात आखडता घेणार नाही : एकनाथ शिंदे

Newsworldmarathi Pune: राज्याची तिजोरी ही सर्वप्रथम बळीराजासाठी आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करताना सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजित महर्षी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते व मंदिर स्थापत्यतज्ज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ गायक-संगीतकार श्रीधर फडके यांना मानाचे ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Advertisements

शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र आज दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे. बळीराजा अडचणीत असून त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या मागणीनुसार तातडीने दुष्काळ जाहीर केला. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती; मात्र शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. यंदाही तसे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा.”

परभणी येथे शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर मदतीचे वाटप केल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांनाही सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी लाखो हात उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समाजातील रत्नांचा सन्मान म्हणजे खरी नवरात्र

नवरात्रोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या रत्नांचा सन्मान करून आबा बागुल यांनी खरी नवरात्र साजरी केली आहे. सलग ३२ वर्षे हा महोत्सव सुरू ठेवणे मोठे काम आहे. नऊ दिवसांत येथे सुमारे दहा लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पुण्यात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि संस्कृतीचे जतन होते.”

आपण दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला आहे. अनेक अडथळे आले, तरी शब्द दिल्यामुळेच आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असेही त्यांनी सांगितले.

उषा मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबतच उषा मंगेशकर यांनीही संगीत क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या स्वरांनी घराघरांत भक्तिभाव जागवला. श्रीधर फडके यांनी वडील सुधीर फडके यांचा ‘गीत रामायण’चा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राच्या अभ्यासातून भारतीय सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आहे.

भारतीय संस्कृती केवळ जुन्या ग्रंथांमध्ये किंवा मंदिरांमध्ये नसून ती आपल्या कला, विचार आणि जीवनमूल्यांमध्ये आहे. नवीन तंत्रज्ञान शिकवतानाच मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आवश्यक आहे. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे शिंदे म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकारणात पदे येतात आणि जातात; मात्र पद नसतानाही समाजकारण करणे महत्त्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मंत्र आपण आचरणात आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कार विजेत्यांच्या भावना

पुरस्कार स्वीकारताना उषा मंगेशकर यांनी महोत्सवातील सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. लता मंगेशकर यांनी याच ठिकाणी देवीच्या मंदिरात पसायदान गायल्याच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला. आबा बागुल यांच्याशी आपल्या कुटुंबाचे जवळचे नाते असल्याचे सांगत त्यांनी महोत्सवाचे काम पुढे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता’ या देवीस्तुतीच्या ओळी सादर केल्या.

डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाविषयी बोलताना पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीचा अभ्यास आणि आळंदी येथील समाधीविषयक कामाचा उल्लेख केला. अयोध्येतील राममूर्तीच्या निवडीवेळी बालरूप, हास्यमुद्रा आणि आशीर्वाद देणारा भाव यांचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीधर फडके यांनी आपल्या गाण्यांच्या प्रवासातील आठवणी सांगितल्या. महोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात मुसळधार पाऊस असतानाही लाकडी फळ्या टाकून कार्यक्रम सुरू ठेवला होता. त्या वेळी ‘फिटे अंधाराचे जाळे’ यासह अन्य गाणी सादर केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, माजी उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, महानगरप्रमुख नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, रमेश कोंडे, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आणि युवासेना शहराध्यक्ष हेमंत बागुल उपस्थित होते.

यावेळी गायक जितेंद्र भुरुक, बाली येथील मंदिराचा देखावा सादर करणारे मिथिलेश कुमार आणि पुण्यातील सहा ढोल-ताशा पथकप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले, तर सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले. त्यांनी पुरस्कार विजेत्यांशी संवादही साधला.

दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून पुणे नवरात्रौ महोत्सवात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक सहकार्य जाहीर करण्यात आले. हेमंत बागुल यांनी पाच लाख रुपये, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दीड लाख रुपये, तर सुदर्शना त्रिगुणाईत आणि सुमनदेवी तातेरा यांनी पाच लाख रुपये मदत जाहीर केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments