Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे १९ जूनला प्रस्थान; किती मुक्काम? वाचा एका क्लिकवर…
Newsworldmarathi Pune : वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जूनला देहूतून पंढरपूरकडे होणार असल्याची माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली आहे.
हा सोहळा ६ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख, दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते.
यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ वद्य सप्तमीला बुधवार, १८ जूनला पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
देहूमधून १८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर इनामदारवाड्यात मुक्काम असेल.
गुरुवारी (दि. १९) इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम.
शुक्रवारी (दि. २०) पिंपरीतील एच. ए. मैदान, कासारवाडी, शिवाजीनगरमार्गे पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम.
शनिवारी (दि.२१) तेथेच मुक्काम.
रविवारी (दि.२२) हडपसरमार्गे लोणी काळभोर येथे मुक्काम.
सोमवारी (दि.२३) यवत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्कामी.
मंगळवारी (दि.२४) वरवंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्काम.
बुधवारी (दि.२५) जूनला वरवंड येथून भागवत वस्ती, पाटसमार्गे उडंवडी गवळ्याची येथे मुक्काम.
गुरुवारी (दि.२६) बऱ्हाणपूर, मोरेवाडी मार्गे बारामती येथील शारदा विद्यालयाच्या पटांगणात मुक्काम.
शुक्रवारी (दि.२७) बारामतीतून मोतीबाग, काटेवाडी, भवानीनगर साखर कारखाना मार्गे सणसर येथे मुक्काम.
शनिवारी (ता. २८) सणसरमार्गे बेलवंडी येथे पोहोचेल. तेथे पहिले गोल रिंगण. त्यानंतर बेलवंडी, लासुर्णे, आंथुर्णे मार्गे निमगाव केतकी येथे मुक्काम.
रविवारी (दि.२९) निमगाव केतकीहून तरंगवाडी ओढामार्गे इंदापूरला सोहळा दाखल. इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण. त्यानंतर इंदापूर येथील नवीन पालखी तळावर मुक्काम.
सोमवारी (दि.३०) इंदापूरहून गोकुळीचा ओढा, बावडामार्गे सराटी येथे मुक्काम.
मंगळवारी (दि.१ जुलै) सराटी येथे नीरास्नान झाल्यानंतर सोहळ्यीचे अकलूज येथे माने विद्यालयात दाखल होणार आहे. तेथे तिसरे गोल रिंगण होईल.
बुधवारी (दि.२) अकलूजहून माळीनगर येथे पोहोचल्यानंतर पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर बोरगाव श्रीपूर येथे मुक्काम.
गुरुवारी (दि.३) बोरगाव येथून दुपारी तोंडले बोंडले येथे पोहोचणार. तेथे पालखी सोहळ्याचा धावा. त्यानंतर पिराची कुरोली येथे मुक्काम.
शुक्रवारी (दि. ४) बाघडवस्ती, भंडी शेगावमार्गे बाजीराव विहीर येथे आगमन. तेथे दुसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर वाखरी तळावर सोहळा मुक्कामी.
शनिवारी (दि. ५) दुपारी एकनंतर पंढरपूरकडे मार्गस्थ. पादुका अभंग आरती. उभे रिंगण झाल्यानंतर पंढरपुरातील नवीन संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी जाणार आहे.
CM Fadnavis : अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वर्षा ‘वर; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सपत्निक गृहप्रवेश
Newsworldmarathi Mumbai : CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘वर्षा’ निवासस्थानी गृहप्रवेश केला. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील गृहप्रवेशावरून राजकारण रंगले होते. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच, वर्षा बंगल्यावर ते राहायला कधी जाणार, अशी चर्चा रंगली होती. विरोधकांनी सातत्याने त्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. तसेच फडणवीस यांनी मात्र ‘वर्षा’ बंगल्यावर जाणे टाळल्याने या
चर्चेला वेगळे वळण लागले होते.
वर्षा बंगल्यावर काही अद्भुत असल्याचे बोलले गेले. दरम्यान, मुलगी दिविजा हिची १० वी परीक्षा आहे. वर्षा निवासस्थानी डागडुजीचे काम बाकी आहे. ते काम आणि मुलीची परीक्षा संपल्यानंतर राहायला जाणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पूजाअर्चा करत गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाची चांगलीच गुप्तता पाळण्यात आली होती. पत्नी अमृता फडणवीस यांनी गृहप्रवेशाचे फोटो एक्स माध्यमावरून सर्वत्र व्हायरल केले आहेत.
Maharashtra Day : PM मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…
Newsworldmarathi Mumbai : Narendra Modi : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्याला आज १ मे २०२५ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत, महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून शुभेच्छा
“भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत
भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अजित पवारांची ‘उद्घाटन’घाई; खासदार मेधा कुलकर्णींची नाराजी
Newsworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी राज्यभर ओळखले जातात. त्यांचा दिनक्रम पहाटेपासूनच सुरू होतो आणि ते वेळेचं काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नेत्यांची तारांबळ उडते.
अशीच एक घटना आज पुण्यात पाहायला मिळाली. एका सार्वजनिक कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवारांनी नियोजित वेळेच्या आधीच पार पाडले. यामुळे कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना नाराजीचा सामना करावा लागला.
मेधा कुलकर्णींनी थेट अजित पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मात्र अजितदादांनीही यावर नेहमीप्रमाणे संयम राखत, “परत उद्घाटन करा” असा हलकाफुला सल्ला देत प्रसंगावर विनोदी शैलीत मात केली.
नेमकं काय झालं?
पुण्यात पहाटेपासून अजित पवार यांनी कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला. परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवार यांनी पहाटे उद्धाटन केलं. पहाटे साडेसहा वाजता या इमारतीच्या उद्धाटनाची नियोजित वेळ होती. त्यासाठी मेधा कुलकर्णीही वेळेत उपस्थित राहिल्या, मात्र अजित पवारांनी दहा मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं होतं. वेळेआधीच कार्यक्रम झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दादांनी पुन्हा सोबत उद्घाटन करण्याचं सुचवत तणाव निवळून टाकला.
अमूल दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ…
Newsworldmarathi Pune : मदर डेअरीनंतर आता अमूलनेही दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने बुधवारी किंमतवाढीची घोषणा केली. ही वाढ आजपासून म्हणजेच १ मे २०२५ पासून लागू होईल. अमूलने विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीचे कारण म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा खर्च तसेच इथर उत्पादन खर्चात वाढ असल्याचे म्हटले जाते. दुधाच्या किमती वाढवणारी ही सलग दुसरी मोठी डेअरी कंपनी आहे. यामुळे सामान्य माणसावरचा भार आणखी वाढेल. काल मदर डेअरीनेही किमती वाढवल्या होत्या.
अमूलने दूध दर वाढीची बुधवारी, ३० एप्रिल रोजी घोषणा केली. ही वाढ सर्व प्रकारच्या दुधावर लागू असेल. ५०० मिली पॅकवर १ रुपयांची वाढ होईल. अमूल हा भारतातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत बदल केल्यानंतर आता ग्राहकांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.
हा बदल सर्व प्रकारच्या दूध प्रकारांना लागू
हा बदल जवळजवळ सर्व प्रकारच्या अमूल दूध प्रकारांना झाला आहे. कंपनीने म्हटले की, ‘अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय माझा, अमूल ताजा आणि अमूल गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.’ याचा अर्थ असा की आता तुम्हाला अमूलचे दूध खरेदी करण्यासाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागतील
जातीनिहाय जनगणन म्हणजे सामाजिक न्यायासाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया…
Newsworldmarathi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल.
जातनिहाय जनगणना का महत्वाची ?
• सर्व समाजघटकांचा खरा सामाजिक व आर्थिक डेटा उपलब्ध होईल
• योजनांचा लाभ उपयुक्त ठिकाणी व योग्य प्रमाणात पोहोचेल
• वंचित, मागास व उपेक्षित घटकांपर्यंत विकास पोहोचवणे शक्य होईल
• सामाजिक समतेसाठीची पावले अधिक गंभीर आणि प्रभावी ठरतील
• डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया सक्षम होईल
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी किती, शाळा कधी सुरू होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Newsworldmarathi Pune : Maharashtra School Start Date : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विदर्भातील शाळा वगळता इतर शाळा १६ जूनपासून सुरू होतील. विदर्भातील शाळा मात्र २३ जूनपासून सुरू होणार आहेत. उष्णतेमुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उद्या १ मे रोजी निकाल व २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. शिक्षण विभागाने शाळांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. १ मे रोजी निकाल व २ मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत शाळा ३० जूनपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. तीव्र उन्हाळाच्या परिस्थितीत विदर्भातील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून कळवण्यात आले आहे.
विदर्भ वगळून राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात, त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू कराव्यात, तर विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरू कराव्यात, त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिवशी शाळा सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद केले आहे. याचा अर्थ, सुट्टी असली तरी शाळा त्यानंतर लगेच सुरू होतील.
रमणबाग प्रशालेचा प्रत्युष धाडगे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित परीक्षेत राज्यात प्रथम
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील सहावी यलो वर्गात शिकणारा विद्यार्थी प्रत्युष गणेश धाडगे याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रत्युषला या यशासाठी शाळेच्या गणित शिक्षिका सारिका रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई तसेच शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्युषचे कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आटपाडीत विनयभंगप्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल
Newsworldmarathi Aatpadi : कोरोना काळात दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक व जिल्हा शिक्षक बँकेचा माजी अध्यक्ष पोपट सुखदेव सूर्यवंशी (मूळ रा. खांजोडवाडी, सध्या रा. आटपाडी) यांच्यावर आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना १९ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता आटपाडी तालुक्यातील कुचरेवाडी पळसखेल येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने पोपट सूर्यवंशी यांना कोरोना काळात काही पैसे दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी पीडित महिला भावाला घेऊन सूर्यवंशीच्या शेतातील घरी गेली होती. यावेळी सूर्यवंशी यांने पैसे देण्यास नकार दिला. पीडितेला शिवीगाळ करत त्याने तिचा विनयभंग केला.
‘मी अनेकांना जेलमध्ये बसवले आहे आणि तुम्हालाही कामाला लावतो. तुम्ही परत पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सुर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर…
Newsworldmarathi Mumbai : राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील धरणसाठा व पाणीपुरवठ्याबाबत सादरीकरण केले.
सध्या 18 जिल्ह्यांतील 644 गावे व 2051 वाड्यांमध्ये 796 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत 2564 टँकर सुरू होते. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी 263 टँकर होते, सध्या तेथे एकही टँकर नाही. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात सर्वाधिक म्हणजेच 275 टँकर कार्यरत असून त्यातील 192 टँकर केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरेशा व नियोजनबद्ध पाणीपुरवठ्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील एकूण पाणीसाठा
मोठी धरणे: 10,401 दलघमी
मध्यम धरणे: 2,572 दलघमी
लघु धरणे: 2,101 दलघमी
मुख्य धरणांतील उपयुक्त साठा (24 एप्रिल 2025 रोजीचा साठा)
गोसीखुर्द – 5.67 दलघमी (गेल्या वर्षी – 09.47)
तोतलाडोह – 20.74 दलघमी (गेल्या वर्षी – 20.46)
ऊर्ध्व वर्धा – 09.64 दलघमी (गेल्या वर्षी – 09.97)
जायकवाडी ३३.५१ दलघमी (गेल्या वर्षी – ८.८७)
मांजरा – 02.03 दलघमी (गेल्या वर्षी – 0.28)
हतनूर – 04.51 दलघमी (गेल्या वर्षी – 04.51)
गंगापूर – 03.07 दलघमी (गेल्या वर्षी – 02.48)
कोयना – 34.14 दलघमी (गेल्या वर्षी – 35.98)
खडकवासला – 0.96 दलघमी (गेल्या वर्षी – 01.06)
भातसा – 14.65 दलघमी (गेल्या वर्षी – 12.91)
धामणी - 0.07 दलघमी (गेल्या वर्षी – 0.07)

