दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
Newsworldmarathi Pune : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग हि आयोजित करण्यात आला
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून…
Newsworldmarathi Ahilyanagar : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन, संचालक व अधिकारी अशा ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा अपहार करत कर्जमाफीस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत बाळासाहे ब केरुनाथ विखे (वय-६६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी बनावट कागदपत्रे तयार करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला. युनियन बँक व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ तसेच ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु शेतकरी सभासदांना ती रक्कम प्रदान करण्यात आली नाही.
कारखान्याचे तत्कालीन संचालक व बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा आर्थिक अपहार केला. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा आर्थिक लाभ स्वतःच्या फायद्याकरिता केला. कर्जमाफी प्राप्त नसताना ती प्राप्त असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०२५ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या इसमांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
मोठी बातमी…! रावसाहेब दानवेंच्या गाडीला अपघात, दुचाकीची कारला जोरदार धडक
Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणावळ्यातील जयचंद चौकात घडली आहे. कामानिमित्त रावसाहेब दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले होते. त्यावेळी एक मोटारसायकलने रावसाहेब दानवे यांच्या अर्टिका गाडीला जोराची धडकदिली. या अपघातात कोणतीही दुखापात झाली नसून दानवे यांची प्रकृती उत्तम असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रावसाहेब दानवे हे कामानिमित्त लोणावळ्यात आले होते, यावेळी त्यांच्या गाडीला दुचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये मोटरसायकल स्वाराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.. या अपघातानंतर मोटारसायकलस्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर तेथील स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार? कामाचा वेग वाढवण्याच्या अजित पवारांच्या सूचना
Newsworldmarathi Mumbai : पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांचे अर्थसहाय्य; शासकीय नोकरीही देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता.
Maharashtra Cabinet : हडपसर ते यवत सहापदरी रस्त्याला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचे सर्वांत मोठे ११ निर्णय, वाचा संपूर्ण यादी…
Newsworldmarathi Mumbai: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे अकरा निर्णय घेण्यात आले.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ११ निर्णय
टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी रु.488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा)
मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपये ऐवजी आता 40 रुपये प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास)
PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओ.बी.सी., ई.बी.सी. व डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय. (इतर मागास बहुजन कल्याण)
हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता. 5262.36 कोटी रुपयांचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम)
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम)
महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard)आणि जहाज पुनर्वापर सुविधा
(Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता. (परिवहन व बंदरे)
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025 ला मान्यता. (परिवहन व बंदरे)
ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण. (परिवहन व बंदरे)
सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी)
आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)
म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण
उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का; बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
Newsworldmarathi Mumbai: मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी महापौर, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दत्ता दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजुर, भांडुप, मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विक्रोळीत ठाकरेंना खिंडार पडले. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटिशांनंतर महायुतीकडून पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले, मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी केली. या वेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीना कांबळी आदी उपस्थित होते.
७० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वतःची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत शिवसेनेचे (ठाकरे गट) ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
पुण्यात २८ लाखांच्या बनावट नोटा जप्त; २ महिलांसह ५ जणांना अटक, असा झाला भांडाफोड?
Newsworldmarathi Pune : पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीची व्याप्ती मोठी असून त्यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय-३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय-३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय-३५, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय-४२, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय-३८, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेतर्फे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत १७ एप्रिल २०२५ ला २०० रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्या असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तेथील व्यवस्थापकांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार कळवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास करण्यात आला.
असा झाला भांडाफोड?
बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली. संबंधित खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिली असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा छडा पोलिसांना लागला.
ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व तत्सम आर्थिक व्यवसाय करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तिच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले. या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले.
प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करीत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना त्याच्या घरी चार लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या. या टोळीमध्ये प्रभू गुगलजेड्डी हाही सामील असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली. एक लाख रुपयांना बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा ही टोळी देत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. त्याचबरोबर या टोळीमध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचीही माहिती पुढे आली असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा
Newsworldmarathi Mumbai :पुणे महानगरपालिका आणि महाप्रीत यांच्या संयुक्त विद्यमान पुणे शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक मंगळवारी बीकेसी येथील महाप्रीत कार्यालयात झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी भूषवले.
या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक माळी, पुणे महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, उपायुक्त महेश पाटील, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनवणे तसेच महाप्रीतचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:
विद्युत दिवे एलईडीमध्ये रूपांतर : नव्याने समाविष्ट गावांमध्ये विद्युत पोलवरील जुने दिवे एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये बदलण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, एकूण ७०,००० विद्युत दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले आहे. यामुळे ऊर्जेची बचत होण्याबरोबरच देखभाल खर्चातही मोठी घट होणार आहे.
सौरऊर्जेचा प्रभावी वापर : स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रकिया सुरू असुन पुढील कालावधीत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे यासोबतच
इंटरनेट कमांड सेंटर व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुणे शहरात एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC) स्थापन करण्यात येणार आहे. सुमारे २८३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षितता, जल व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे पुणे शहराचे व्यवस्थापन अधिक वेगवान व कार्यक्षम होणार आहे.
बैठकीत बोलताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत, वेळेचे काटेकोर नियोजन करावे व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आणि महाप्रीत यांच्यातील सहकार्यामुळे पुणे शहराचे स्वरूप अधिक विकसित आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.
Supriya Sule : पहलगाम हल्यात मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार द्या
Newsworldmarathi Mumbai: काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रीतील ६ व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिचे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देऊन महाराष्ट्रीची सेवा करण्याची संधी द्यावी, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने हे तिघे जण, पनवेल येथे राहणारे दिलीप देसले, पुण्यामध्ये राहणारे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे हे मरण पावले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना आपल्या भारतावर झालेला हल्ला असून या दहशतवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नागरिक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचे वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो, मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरिकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही केली जात नाही, असं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना दहशतवादी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबीयांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखवलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसे डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखवणे सोपे नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

