जय हनुमानाच्या जयघोषाने रंगला अखंड कात्रज कोंढवा परिसर…
Newsworldmarathi Pune : अखंड हिंदुस्थानाचे जनक असलेले प्रभु श्रीरामचंद्र व सेवाभावी पवनकुमार हनुमान यांचे मुनोत परीवाराने कात्रज कोंढवा परिसरात स्थापलेल्या एकमेव श्री दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव व रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कात्रज गावठाणातून भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेची सुरुवात कात्रज गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून करण्यात आली व सुंदरनगर येथील हनुमान मंदिर येथे समाप्ती करण्यात आली. यावेळेस एकता मित्र मंडळ चौक येथे नितिन शेलार यांनी शोभायात्रेचे स्वागत करून सर्वांसाठी थंडपेयाची सोय केली.
शोभायात्रेत बलाढ्य बाहुबली हनुमान, घोड्याच्या रथामध्ये राम-लक्ष्मण व सीता यांच्या प्रत्यक्ष भूमिकेतील भक्तगण तसेच ढोल ताशा पथक यासोबतच महिलांचा विशेष पारंपरिक वेशभूषेतील फेटा परिधान केलेला सहभाग व परीसरातील अनेक बाल हनुमानांच्या सहभागाने शोभायात्रा नागरिकांसाठी विशेष लक्षणीय ठरली.
शोभयात्रेमध्ये रामाची भूमिका मनोज छाजेड, सीता प्रिया छाजेड तर लक्ष्मणाच्या भूमिकेत मेहुल जयंत लुणावत यांनी हुबेहुब व लक्षवेधक भूमिका सादर केल्याबद्दल अशोक मुनोत यांनी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करत औक्षण व साखर वाटून आनंद व्यक्त केला.
संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत यांनी सन 2000 साली स्थापन केलेल्या कात्रज कोंढवा परिसरातील एकमेव दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे यंदाचे रोप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सालाबादप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सक्षम फाउंडेशनचे निखिल मुनोत यांनी सांगितले, प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक तसेच सक्षम फाउंडेशनचे स्वयंसेवक व पोलीस बांधवंनी एकेरी वाहतूक ठेवून मोलाचे सहकार्य केले.
30 ते 35 वर्षापासून कात्रज परीसरात वास्तव्यास असणारे मुनोत परिवार कुठलेही जाती-धर्म न मानता शिक्षण, सामाजिक, गोपालन तसेच अध्यात्मिक अशा अनेकविध क्षेत्रात निस्वार्थपणे स्वखर्चातून वर्षभर अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असल्याबाबत जन्मोत्सवप्रसंगी नागरिकांकडून शुभेच्छा देत कौतुक करण्यात आले. प्रसंगी हनुमानाची महाआरती व भाविकांना महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वर्तमान परिस्थितीशी निर्भिडपणे लढा : ॲड. प्रकाश आंबेडकर
Newsworldmarathi Pune : इतिहास विसरलो तर वर्तमान परिस्थितीशी लढायला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे इतिहास विसरू नका. तो समजून घ्या. आंबेडकरी चळवळीत आपण किती टप्पे गाठले याची जाणीव नसल्याने अनेकदा आपलेच लोक त्या चक्रात अडकतात. पण आपल्याला इतिहास माहिती असेल तर वर्तमान परिस्थिती निर्भिडपणे लढता येते, ती लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आंबेडकरी चळवळीच्या कालखंडातील महत्त्वाच्या टप्प्यांचा दस्तऐवज असलेले “सम्यक ते वंचित : चळवळीचा दस्ताऐवज” या शांताराम पंदेरे यांनी संकलित केलेल्या ग्रंथाचे पुण्यातील निळू फुले सभागृहात प्रकाशन झाले. याप्रसंगी ॲड. आंबेडकर बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांनी 1977 नंतरच्या राजकीय घडामोडी, रशियाच्या उदाहरणाने दाखवलेली दूरदृष्टी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील सरकारी लाठीमार आणि जनतेमध्ये पसरवलेली दहशत यावर सखोल विवेचन केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, मी लोकांमध्ये बसून चर्चा केल्या, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नाशिक ते मुंबई लॉंग मार्चचा निर्णय झाला आणि त्यातून लोकांचा चळवळीवरचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला. चळवळीत नेमकं काय साधायचं आहे, हे लक्षात ठेवा. टीकाकारांना घाबरण्याचे कारण नाही. निर्भिडपणे आपले मत मदत रहा. वाचन करून समजून घेणे, निर्णयक्षम होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टीव्हीवर जे दिसते आणि वर्तमानपत्रात जे छापून येते ते तपासून घ्या. लगेच खरे मानू नका, विचार करा, तपासा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. वि. पवार, शांताराम पंदेरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, प्रा. संजीव चांदोरकर, ॲड. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, देवेंद्र उबाळे, पुष्पाताई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा; युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी
Newsworldmarathi Pune : दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता नवीन वादात सापडले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ पासून पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाविरोधात प्रचंड प्रमाणात रोष वाढला आहे. मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका कर आकारणी व संकलन विभागाच्या उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेस पुणे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, ऋषिकेश आंधळे हे उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कर प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. पुढील दोन दिवसात तत्काळ कायदेशीर बाबी तपासून रुग्णालयावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून मी स्वतः युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनास बसणार असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला दिला आहे. सरकार या रुग्णालयास पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य पुणेकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय अशी भूमिका घेता येणार नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.
पैश्यासाठी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका गर्भवती महिलेचा जीव घेऊन नवजात दोन जुळ्या मुलांना आईच्या मायेला पोरकं करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ साला पासून २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकत कर भरला नाही. गेल्या ६ वर्षांपासून जर रुग्णालय कर भरत नसेल तर आजपर्यंत महापालिकेने या रुग्णालयावर कारवाई का केली नाही? सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर घराला टाळे ठोकण्याची, शास्ती आणि जप्तीची तसेच दंड आकारण्याची कारवाई करण्यात महापालिका जी तत्परता दाखवते तीच तत्परता दाखवून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आमच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी महापालिकेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून दोन दिवसात उत्तर न दिल्यास व रुग्णालयावर कारवाई न केल्यास गुरुवारपासून सुप्रिया ताई स्वतः आमच्यासोबत आंदोलनास बसणार आहेत.रोहन सुरवसे-पाटील सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या वतीने कातकरी कुटुंबांना ताडपत्री वाटप
Newsworldmarathi Pune : अहिंसा जैन ग्रुप यांच्या विनंतीवरून पुणे येथील सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या सर्व परिचित इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम या संस्थेच्या वतीने वाईच्या दुर्गम पश्चिम भागातील मालतपूर, बोरगाव,वगाव येथील वीस कातकरी कुटुंबांना वाई येथील गरवारे कंपनीच्या अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या ताडपत्रींचे वाटप करण्यात आले आणि वीस कुटुंबांना डोक्यावर छप्पर देण्याचे महान कार्य इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम तर्फे करण्यात आले.
तसेच याच कुटुंबातीलसदस्यांना कपडे आणि खाऊचे वाटप, शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेश वाटप सुद्धा करण्यात आले. या सर्वच कातकरी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व सदस्यांना समाधान देऊन गेला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माननीय प्रीती शिरुडकर, संस्थापिका मंगल वाईकर, वीणा परब, सेक्रेटरी मंजुश्री उपासनी, सदस्या कल्पना बोरा,वृषाली शिरूडकर आणि वाईच्या वैजयंती सोनीगरा उपस्थित होत्या.
वाई येथील सामाजिक कार्यकर्ते भावेश ओसवाल,आशुतोष शिंदे,प्रशांत डोंगरे उपस्थित होते.संस्थेच्या या बहुमूल्य सहकार्याबद्दल ग्रामस्थ मालतपूर,बोरगाव, वयगाव यांनी आभार मानले.
जामखेडमध्ये ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव भरणार: गायक आनंद शिंदेच्या गाण्यांनी उत्सव रंगणार…
Newsworldmarathi Nagar : हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या १७ एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे.
जामखेडमधील जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदेसाहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. १७ एप्रिल (वार) गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अजितदादा पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले.
संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’
संविधानिक विचार पुढे नेण्याची गरज : सोनवणे
सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात माणसांमाणसांत समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले.
राजकीय जुगलबंदी
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजितदादा नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याने राजकीय जुगलबंदी करण्याची शक्यता आहे.
प्राचीन ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात बगाड
Newsworldmarathi pune : श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य ढोल-ताशा व बँड च्या निनादात पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण… अशा भक्तीमय वातावरणात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी आणि बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला बगाड उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत पालखी व बगाड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी नामावली व माध्यान्ह आरती झाली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.
आर्थिक ताण कमी करण्यासाठी काय करावे : लेखक डॉ. मिलिंद भोई
Newsworldmarathi Arogy : आर्थिक ताण कमी करण्यासाठी बजेट आणि बचत योजना विकसित करा.आर्थिक निर्णयांवर चांगले नियंत्रण मिळविण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम शोधा.
काय टाळावे
तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करताना, काही वर्तन टाळले पाहिजे:
स्वत: ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करणे: एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव-संबंधित आरोग्य समस्या वाढतात.
भावना दडपून टाकणे: भावना कमी केल्याने नैराश्य आणि चिंता होऊ शकते; निरोगी मार्गाने भावना व्यक्त करणे आवश्यक आहे.
उत्तेजक पदार्थांवर जास्त अवलंबून राहणे: जास्त कॅफीन, अल्कोहोल किंवा धूम्रपान यामुळे तणाव आणि आरोग्य समस्या बिघडू शकतात.
विषारी संबंध: भावनिकदृष्ट्या निचरा होणाऱ्या नातेसंबंधांमध्ये राहिल्याने मानसिक ताण वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
परिपूर्णतावाद: अवास्तव अपेक्षा आणि स्वत: ची टीका दीर्घकालीन तणाव आणि बर्नआउटमध्ये योगदान देतात.
निष्कर्ष
मानसिक ताण स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतो, विशेषत: जेव्हा कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक दबाव वाढतो. तणाव दूर करण्यासाठी स्वत: ची काळजी, भावनिक आधार आणि व्यावसायिक मार्गदर्शन यासह संतुलित दृष्टीकोन आवश्यक आहे. महिलांनी त्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे, निरोगी सीमा प्रस्थापित केल्या पाहिजेत आणि आवश्यकतेनुसार समर्थन शोधले पाहिजे. असे केल्याने, जीवनातील आव्हाने असूनही ते निरोगी, अधिक परिपूर्ण जीवन जगू शकतात.
लेखक
डॉ. मिलिंद भोई
इंस्टाग्रामचा शोध – एक कल्पना ते जागतिक लोकप्रियेपर्यंतचा प्रवास : लेखन – अक्षय बनकर
Newsworldmarathi special : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्थान अतिशय प्रभावी आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या काही अॅप्सपैकी इंस्टाग्राम हे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अॅप ठरले आहे. परंतु, याचे मूळ नेमके कसे आणि कुठून सुरू झाले?
ही गोष्ट आहे २०१० सालाची. केविन सिस्ट्रॉम नावाचा एक तरुण, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिकलेला होता. तो एका लाईफ चेंजीग संधीच्या शोधात होता. खरतर त्याला फोटो शेअरिंग आणि लोकेशन बेस्ड अॅप तयार करायचे होते. त्याने सुरुवातीला निर्माण केलेले अॅप होते “Burbn” – हे अॅप वापरकर्त्यांना लोकेशन शेअर करण्यास, इव्हेंट प्लॅन करण्यास आणि फोटो शेअर करण्यास परवानगी देत होते .
केविनला लवकरच उमजले की अॅपमध्ये अनेक फिचर्स असूनही, लोक फक्त फोटो शेअरिंग फिचरच वापरत आहेत. म्हणून मग त्याने त्याचा मित्र माईक क्रिगरला सोबत घेतले आणि दोघांनी मिळून Burbn अॅपमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अॅपमधील इतर सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि वापरायला एकदम सोप्पे (युजर फ्रेंडली) आणि जलद फोटो शेअरिंग अॅप तयार केले. ज्याला त्यांनी नाव दिले “Instagram”.
इंस्टाग्राम या नावाचा अर्थ. “Instagram” हा शब्द “Instant camera” आणि “Telegram” याचे संमिश्र रूप आहे. म्हणजेच, झटपट फोटोज शेअर व्हावेत हेच या अॅपचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वापरकर्त्यांने(यूजर) केवळ फोटो अपलोड करायचा, त्यावर एखादा फिल्टर लावायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं – इतकं सोपं आणि सहज!
इंस्टाग्रामवर अपलोड झालेला पहिला फोटो कोणता होता माहितेय?१६ जुलै २०१० रोजी, केविन सिस्ट्रॉमने त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक फोटो पोस्ट केला होता. तो Instagram वरील पहिला फोटो होता.६ ऑक्टोबर २०१० रोजी हे अॅप अधिकृतपणे iOS App Store वर लाँच झाले. अवघ्या २४ तासांत २५,००० युजर्स अॅपवर नोंदले गेले. एका आठवड्यात युजर्सची संख्या लाखांमध्ये पोहोचली. अशाप्रकारचे वेगवान आणि प्रभावी यश फारच थोड्या अॅप्सना मिळाले आहे.
Instagram चं वाढतं यश आणि लोकप्रियता पाहून, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी २०१२ मध्ये Instagram ला १ बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतलं. Instagram टीमने आपली स्वतंत्र ओळख राखत फेसबुक समवेत कार्य सुरू ठेवले .
आजचे इंस्टाग्राम ऍपचे आधुनिक रुपये हे केवळ अॅप नव्हे, तर एक प्रत्येकाची जीवनशैली ठरत आहे. आज Instagram फक्त फोटो शेअरिंग अॅप नाही, तर ब्रँडिंग, मार्केटिंग, कलाकारांची ओळख, छोट्या व्यवसायांसाठी एक प्लॅटफॉर्म, आणि तरुणाईसाठी अभिव्यक्तीचं माध्यम बनले आहे. Influencers, Reels, Stories, Live Sessions यांसारख्या सुविधांमुळे आज Instagram एक पूर्ण डिजिटल विश्व बनले आहे.
इंस्टाग्रामच्या जन्माच्या या गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात येईल की “साध्या कल्पना जर अचूक ओळखल्या आणि योग्य दिशेने विकसित केल्या गेल्या, तर त्या जागतिक क्रांती घडवू शकतात.” केविन आणि माईकने फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली.लोकांना काय आवडतंय आणि त्यानुसार सोपे, यूजर फ्रेंडली आणि वापरायला सहज असे रूप इंस्टाग्रामला दिले. हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले.
लेखक
-अक्षय बनकर
“शाश्वत शेतीच्या माध्यमातून आता महिला शेतकरी सक्षम होणार”
Newsworldmarathi Pune: भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या (ICSSR) सहाय्याने आयोजित “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद एस. पी. मंडळीच्या प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था (PGDM), मुंबई यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न केला. या परिसंवादात तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी शाश्वत कृषी विकास आणि महिला शेतकऱ्यांचे सशक्तीकरण यावर चर्चा केली.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात डॉ. हेमा यादव, संचालक, VAMNICOM यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांच्या परिवर्तनशील भूमिकेवर प्रकाश टाकला आणि महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणातील त्यांच्या योगदानावर भर दिला. प्रा. डॉ. उदय साळुंखे, ग्रुप डायरेक्टर, वीस्कूल, मुंबई यांनी आपल्या भाषणात सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी क्षमता विकास, संशोधन आणि नवकल्पना यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संस्थात्मक सहकार्य, धोरणकर्ते आणि उद्योग नेत्यांमधील सुसंवादाची गरज नमूद केली, तसेच संशोधन, सल्लामसलत आणि ज्ञानवृद्धीद्वारे सहकारी व्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
परिसंवादातील प्रमुख सत्रामध्ये डॉ. संगीता शेटे, लिंग व सामाजिक विकास विशेषज्ञ, SMART प्रकल्प, महाराष्ट्र शासन, आणि डॉ. के. सत्यलक्ष्मी, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाची भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेली गरज अधोरेखित केली.
विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, परिसंवादातील चर्चेमध्ये मजबूत धोरणे, तांत्रिक नवसंशोधन, आणि अनेक घटकांच्या सहभागाद्वारे ग्रामीण उपजीविकेचा विकास व कृषी वाढीला चालना देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. वीस्कूल आणि VAMNICOM यांनी ICSSR च्या सहकार्याने केलेले संशोधन या उद्दिष्टांमध्ये मोलाची भर घालते.
या परिसंवादाचा मुख्य उद्देश नाविन्यपूर्ण उपाययोजना, धोरणात्मक शिफारशी आणि सहयोगी उपक्रमांना चालना देणे हा होता. “शाश्वत कृषी व्यवसायांसाठी लवचिक उपजीविके” या विषयावर तज्ज्ञांचे पॅनेल चर्चासत्र परिसंवादाचा विशेष आकर्षण होते. या चर्चेमध्ये कृषी सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, धोरण विचारमंच आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. चर्चेमध्ये महिलांसाठी कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवेश सुलभ करणे, महिलांनी चालवलेल्या कृषी व्यवसायांना मदत करणे, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश कसा करता येईल यावर सखोल चर्चा झाली.
शाश्वत कृषी आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने संशोधनात्मक धोरणे आणि बहुउद्देशीय सहकार्याचे महत्त्व परिसंवादात अधोरेखित करण्यात आले. डॉ. वैशाली पाटील, वरिष्ठ सहयोगी अधिष्ठाता (संशोधन), वीस्कूल यांनी समारोपपर भाषणात महिला-केंद्रित कृषी धोरणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आणि कृतीशील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (ICSSR), शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे: महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटनांवरील एक अभ्यास” या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पास मान्यता दिली आहे. हा संशोधन प्रकल्प डॉ. वैशाली पाटील, डॉ. हेमा यादव, डॉ. प्रविण घुंणार, डॉ. महेश कदम आणि डॉ. रचना पाटील यांना प्रदान करण्यात आला असून, महिला-केंद्रित कृषी संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही महत्वपूर्ण दखल आहे.
हा राष्ट्रीय परिसंवाद आणि संबंधित संशोधन प्रकल्प महिला सशक्तीकरणासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण सिफारशी विकसित करेल, जे विकसित भारत 2047 च्या समावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असतील.
भारतीय संविधान हे ‘ आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण आहे : मा. संजय आवटे
Newsworldmarathi Pune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ,पुणे संचलित नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, नेव्हिल वाडिया महाविद्यालय व कुसरो वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल२०२५ ते १४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे. यामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त सहभागी असणार आहेत.
महात्मा फुले जयंती निमित्ताने ११ एप्रिल २०२५ रोजी प्रख्यात लेखक-वक्ते व संपादक मा. संजय आवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपले मनोगतात मा. संजय आवटे म्हणाले की, ” तरुणांपर्यंत आजचे राजकारण पोहोचले पाहिजे. तरुणांना सजग करण्यासाठी छ. शिवाजी महाराज, म.फुले, राजश्री शाहू महाराज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महात्मा गांधी इ .महापुरुषांचा खरा इतिहास महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचायला हवा.
याबाबत महाविद्यालये ही मला शेवटची आशा वाटते. भारतातील संविधान हे कोणा एका विशिष्ट व्यक्तीला अर्पण केलं नसून ‘ we the people of India’ ‘ आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण केले आहे. आताचा काळ हा महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे. आपल्या मिष्कील शैलीत मा. संजय आवटे म्हणाले की, एकवेळ मला लष्करे तोयबाची भीती वाटत नाही परंतु मला भीती वाटते ती होयबा करणाऱ्या लोकांची. आपल्या मुलांनी किती गुण मिळवले यापेक्षा तो उत्तम माणूस कसा बनेल याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक मा संजय आवटे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अशोक चांडक हे होते. आपल्या मनोगतात डॉ. चांडक म्हणाले की,” मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य विकसित करण्याकडे लक्ष पुरवते. संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व प्राध्यापकांनी ‘ मी काय करतो ‘ याचे आत्मपरीक्षण करावे” असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंत बोरकर यांच्या पुढाकाराने संस्थेमध्ये तीस वर्षांपूर्वी संयुक्त जयंती महोत्सवाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थिनी भावना बाठिया (लोकमत वार्ताहार) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष अहिरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. सुभाष अहिरे यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. प्रा.तन्वी झुरुंगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सदर कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. डॉ. अशोक चांडक आणि विश्वस्त प्रा. सचिन सानप यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास नेस वाडियाचे प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, नेव्हिल वाडिया कॉलेजच्या इनचार्ज डायरेक्टर डॉ. अनुराधा डी., डॉ. मनीषा डाले, उपप्राचार्य डॉ. समीना बॉक्सवाला- काळे, उपप्राचार्य डॉ. बी. बी. बहुले, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, प्रबंधक राजेंद्र तागडे, सर्व शाखांचे डीन, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता जहागीरदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. ज्योती अनिरुद्ध, प्रा.जयंत साळवे, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. विकास जाधव, प्रा. सोनाली मोरे-मधाळे, प्रा. करूणा जाधव, प्रा. सुहास जाधव व प्रा. सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतलेत

