दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत ७२ हजार ४८३ जणांची रुग्णसेवा

0
Newsworldmarathi Pune : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे २०२४-२५ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२३-२४ या वर्षात ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की, जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो. ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते. महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते. कर्णबधिर लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या ८ शस्त्रक्रिया यशस्वी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील जन्मत: कर्णबधिर असलेल्या वयवर्षे १ ते ४ मधील लहान मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या. या प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये प्रत्येकी असून अशा ८ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोफत महाआरोग्य शिबीर रविवारी (दि.२०) जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत यंदा मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन रविवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये ह्रदय आजार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात येईल. नागरिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था नू.म.वि. प्राथमिक शाळा, अप्पा बळवंत चौक येथे करण्यात आली आहे. सन २०२४-२५ वर्षातील आढावा * नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया – ३७,२२२ * दंत रोग उपचार – २३६४ * किडनी विषयक उपचार व शस्त्रक्रिया – २०८९ * कर्करोग शस्त्रक्रिया – १२३० * लहान मुलांच्या शस्त्रक्रिया – ६७२ * ह्रदय शस्त्रक्रिया – ४२९ * अस्थिरोग शस्त्रक्रिया – १३३ * मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट – ९२७८ * मोफत फिजिओथेरपी – ७८३१ * श्रवणयंत्र व मोल्ड वाटप – ५१५० * कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप – ३७४८ * एमआरआय, सिटी स्कॅन (५० टक्के सवलत) – २३३७ * ससून रुग्णालयात भोजनथाळी – १२ लाख रुग्ण श्रवणदोष असणा-या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र श्रवणदोष असणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड व श्रवणयंत्र वाटप केले जाते. यावर्षी ५ हजार १५० कर्णबधिर मुले व नागरिकांनी याचा लाभ घेतला. ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या नागरिकांना खुबा प्रत्यारोपण, गुडघा, प्रत्यारोपण आणि अस्थिरोग विषयक १३३ जणांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, किडनी स्टो, डायलिसिस, प्रोस्टेट ग्रंथी, पर्मकॅथ, फिस्तुला अशा २ हजार ८९ जणांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या लहान मुलांच्या विनामूल्य शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या ६७२ लहान मुलांच्या ह्रदय, किडनी, कर्करोग व अन्य शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या गेल्या. तर, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, मेमोग्राफी यासांरख्या महागड्या तपासण्यांवर ५० टक्के सवलतीच्या दरात २ हजार ३३७ रुग्णांना तपासण्या करून देण्यात आल्या आहेत. दगडूशेठ ट्रस्टचे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर – ९ हजार २७८ रुग्णांच्या मोफत तपासण्या पुण्यातील धनकवडी भागात काशिनाथ पाटील नगर येथे दगडूशेठ ट्रस्टचे मोफत रक्त व विविध प्रकारची रुग्ण तपासणी करणारे केंद्र आहे. याकेंद्रामध्ये दररोज किमान ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. रक्त तपासणी व विविध तपासण्या अंतर्गत सीबीसी, रक्तगट, थायरॉइड, लिपिड प्रोइल, लिव्हर फंक्शन टेस्ट, फास्टींग पीपी शुगर, एसजीओटी/एस जी पीटी, युरिया, ईएस आर, युरीन, एच आयव्ही इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. वर्षभरात ९ हजार २७८ रुग्णांची रक्ततपासणी केली आहे. मोफत फिजिओथेरपी, कृत्रिम अवयव व साहित्य वाटप, दंतरुग्णवाहिका सेवा आरोग्य शिबीरात व ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या अस्थिरोग आजार असलेल्या नागरिकांना मोफत फिजिओथेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, न्युरोथेरपी अशा आवश्यक थेरपी ७ हजार ८३१ रुग्णांना करून देण्यात आल्या. तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या ३ हजार ७४८ विकलांग व्यक्तीना मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप करण्यात आले. याशिवाय दंत रुग्णवाहिका द्वारे २ हजार ३६४ रुग्णांना दाढ काढणे, सिमेंट भरणे, रूट केनॉल, कवळी बसविणे असे उपचार विनामूल्य देण्यात आले आहेत. *प्रत्येक महिन्याला शहराच्या विविध भागात आरोग्य शिबिर* उत्सवाची पारंपारीक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे किंवा शहराच्या विविध भागात प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करुन आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषधोपचाराचे वाटप देखील करण्यात येते. दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणारा समाजाचा पैसा, देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करुन उरलेला निधी परत समाजाला देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून ट्रस्ट करीत आहे, यातून ट्रस्टने श्रध्देला सेवेची जोड दिलेली आहे. *तब्बल १३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य* ट्रस्टच्या एकूण १३ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅनसह कार्डियाक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळानिमित्त वारक-यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केले जाते. तसेच पालखी सोहळा निमित्त वारक-यांसाठी जय गणेश प्रांगण येथे मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतले जाते. *ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथे वर्षभरात १२ लाख रुग्णांना मोफत भोजन* जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्य समाजाभिमुख आहे. यामध्ये वर्षभरात १२ लाख रुग्णांकरीता दररोजचे २ वेळचे भोजन,चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वॉर्डाचे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय ५९ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि रुग्णांकरीता अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला. गरोदर महिलांसाठी ५ कक्ष तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकरीता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. गणेशोत्सव कार्यकाळात ४ बेडचे मोफत आयसीयू गणेशोत्सवामध्ये येणा-या भाविकांची गर्दी पाहता दत्तमंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण ४ वैद्यकिय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच ४ बेडचे मोफत आयसीयू व २ कार्डियाक रुग्णवाहिका सुविधा देण्यात आली. त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार, डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ इत्यादी प्रकारची वैद्यकिय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी दिली जाते.

जामखेडमध्ये संध्या सोनवणे मोठा डाव टाकणार; अजितदादा बोलावून कोणाची विकेट घेणार ?

Newsworldmarathi Mumbai: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा एक-एक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर फिरत असतानाच कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार, आताचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारात अजित पवार उतरले नव्हते. ते साधे इकडे फिरकलेही नाहीत. त्यावरून निकालानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर आगपाखड करीत, ते जाणीवपूर्वक प्रचाराला आले नसल्याचा ठपका ठेवला. मात्र, विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघात जाणार आहेत. तिथे करीत, भाषणही ठोकणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार हे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यापलीकडे जाऊन राम शिंदेंचे स्व:पक्षातील राजकीय शत्रू आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हेही एकमेकांशेजारी बसणार आहेत. एरवी, राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहाणारे अजित पवार, राम शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील ही मंडळी एकाच वेळी, एकाच व्यासपिठावर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी पवार, शिंदें,विखे-पाटलांना एकत्र आणण्याचे नियोजन केले आहे. या तिघांना एकत्र आणून संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये आपली राजकीय ताकद दाखविण्याची खेळी करीत आहेत. अजित पवारांना बोलावून, त्यातही जंगी कार्यक्रम घेऊन, संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये कोणाला ‘टशन’ देणार, हे पाहाणे महत्त्वाचे राहणार आहे. काहीही असो, संध्या सोनवणेंनी केलेल्या या राजकीय खेळीने कर्जत-जामखेडचे राजकारण पुन्हा चर्चेत येणार आहे. जामखेडमध्ये येत्या गुरुवारी (ता.१७ एप्रिल) रोज ‘शिव-फुले-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सव भरण्यात आला आहे. संध्या सोनवणेंच्या पुढाकारातून हा महोत्सव होत असल्याने अजित पवार हे आर्वजून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याजोडीला शिंदे, विखे-पाटलांचीही हजेरी राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसत आहेत. निवडणुकीनंतर आणि संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार हे जामखेडमध्ये येत आहेत. या महोत्सवात कुठची कसर राहणार नाही, याची काळजी घेत कार्यक्रमाचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, या महोत्सवात कुठचे कार्यक्रम आहेत, यापेक्षा महोत्सवात अजित पवार, राम शिंदे, विखे-पाटील एकत्र येऊन कोण, कोणावर काय बोलणार ? याकडे राजकीय वतुळाचे लक्ष असेन. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत-जामखेडला जाणीवपूर्वक सभा घेतली नसल्याचे मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे बोलून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी आपल्या पराभवाचे खापर एकप्रकारे अजित पवारांवर फोडले. अशातच ‘थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’अशी सूचक आणि मिश्किल टिपण्णी करीत, अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिंदेंसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर कर्जत-जामखेडच्या निकालानंतरही हा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. या मतदासंघातील राजकारण रोज नवनवे वळण घेत असतानाच, अजित पवारांना आणून संध्या सोनवणे या कोणाचा ’गेम’ करणार ? की, राष्ट्रवादी काँग्रेस आपले ‘प्रमोशन’ करून पक्ष संघटनेत आपले स्थान बळकट करणार, हे महोत्सवात नक्की दिसेल.

आजी-आजोबांचा चिकू गेला… माजी आमदाराच्या नातवाच निधन

पुणे : शिरुर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन तारुण्यातील शर्विन यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मूळ गावी मुंबईत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, शर्विन यांचा दशक्रिया विधी शनिवारी मुंबई येथे होणार आहे. शिरूर तालुक्यातील पलांडे कुटुंब हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या परिचित आहे.. सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे हे शिरूर तालुक्याचे माजी आमदार होते, ज्यांनी या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे सुपुत्र संजीव पलांडे सध्या कोकण भवन येथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते. सोमवारी मुंबई येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुटुंबातील तरुण पिढी, शर्विन ऊर्फ चिकू, यांच्याकडूनही भविष्यात सामाजिक कार्याची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या अकस्मिक निधनामुळे कुटुंबाला परिसराला मोठा धक्का बसला आहे. शर्विन यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. रविवारी मुंबईत त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे.

खळबळजनक…! बदनामीच्या भीतीने १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; मुंबईतील घटना

Newsworldmarathi Mumbai: मुंबईच्या साकिनाका परिसरात बदनामीच्या भीतीने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांच्या आरोपी मित्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा सोशल मिडीयावर चॅट करताना तो तिच्याकडे तिचे अश्लील फोटो पाठविण्यास सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते. याच फोटोवरुन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. सोशल मिडीयावर तिचे फोटो व्हायरल करुन तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता. या धमकीमुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने काही दिवसांपूर्वी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर तिच्या मोठ्या भावाला हा प्रकार समजला. त्यानंतर त्याने आरोपी मित्राविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मित्राला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यात त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

खडसे-महाजन वाद विकोपाला; महाजनाकडून खडसेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; प्रकरण काय?

Newsworldmarathi Mumbai: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे राज्यात कार्यरत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना महाजन यांनी आपल्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. सोबतच खडसे यांनी ज्या पत्रकाराचा हवाला देऊन हे वक्तव्य केले होते, ते पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? पत्रकार अनिल थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओत मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात एक दावा केला होता. महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा सीडीआर दाखवत रात्री अपरात्री महिला अधिकाऱ्यांशी सातत्याने का बोलत असता? असा जाब विचारल्याचा दावा थत्ते यांनी आपल्या व्हिडीओतून केला होता. याचाच आधार घेत एकनाथ खडसे यांनी महाजनांना लक्ष्य केले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री दीड-दोन वाजता महाजन यांनी १०० वेळा कॉल केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. यानंतर महाजन-खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. अखेर महाजन यांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत आपल्या वकिलामार्फत खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना नोटीस बजावली आहे. नोटिशीमध्ये काय? कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर आरोप केले. जनमानसांत आपली प्रतिमा मलीन केली आहे. याप्रकरणी आपण आता कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही, असं एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

शालेय स्वच्छता साहित्य खरेदीची निविदा वादाच्या भोवऱ्यात; माजी नगरसेविका अर्चना पाटील यांचे आयुक्तांना पत्र

0
Newsworldmarathi Pune : महापालिका शिक्षण मंडळासाठी खरेदी करण्यात येत असलेली शालेय स्वच्छता साहित्य खरेदीही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या खरेदीसाठी एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून तो पात्र नसतानाही त्याला पात्र करून खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी केलेली साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विभागप्रमुखांनी नकारात्मक अभिप्राय देऊनही चार कोटींची साहित्य खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता शालेय स्वच्छता खरेदीच्या निविदा प्रक्रियेवरूनही पुन्हा तक्रारी आल्या आहेत. शिक्षण मंडळासाठी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने लिक्विड अॅसिड, फिनेल व हार्डवेअर साहित्य खरेदीसाठी १ कोटीची निविदा प्रक्रिया | राबवली. मार्चअखेरीस या निविदा उघडण्यात आल्या. त्यात पात्र ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव भांडार विभागाकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, माजी नगरसेविका पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठेकेदाराने अटी-शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे असतानाही प्रशासनाने बेकायदेशीररीत्या त्याला पात्र केले आहे. दक्षता व लेखापरीक्षण विभागाने काढलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हृदयद्रावक…! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू; नाका- तोंडातून रक्तस्राव…

Newsworldmarathi Nashik : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली आहे. नितीन फकिरा रणशिंगे (वय-२३) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी पेठरोड भागात निघालेल्या मिरवणुकीत रणशिंगे सहभागी झाला होता. फुलेनगर येथील तीन पुतळ्याजवळ सायंकाळी ७.३० च्या सुमारास डीजेचा दणदणाट सुरू असताना हा प्रकार घडला. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे अचानक नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्तस्राव सुरू झाला. ही बाब निदर्शनास येताच भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फुप्फुसाच्या क्षयरोगाने पीडित असल्याने नितीनवर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. तो न्यूमोनिया या आजारावरही उपचार घेत होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Newsworldmarathi Pune : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसमवेत विविध ठिकाणी फिरतीवर असतात. सोमवारी रात्री भिडे गुरूजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून व इतर चर्चा संपवून ते रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले होते. “संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे” असे म्हणत भिडे गुरूजींनी स्मारकाला समर्थन दर्शवले होते.

“राजेश डेम्बला यांच्यासोबत एआय आणि संस्थापकांच्या मानसिकतेचा अद्वितीय प्रवास!”

0
Newsworldmarathi Pune : पुणे गुजराती युथ फोरम (पीजीवायएफ) ने “एआय आणि संस्थापकांची मानसिकता” या विषयावर एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दूरदर्शी उद्योजक आणि वक्ते श्री राजेश डेम्बला यांचा समावेश होता. या कार्यक्रमात त्यांनी कोंढवा बुद्रुक, पुणे येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथील भव्य क्रोम बँक्वेट येथे सहभाग घेतला. ४००+ हून अधिक उत्साही सहभागींसह, हा कार्यक्रम भव्य यशस्वी झाला, ज्यामुळे प्रेक्षकांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या भविष्याबद्दल ज्ञान, प्रेरणा आणि स्पष्टतेने समृद्ध केले. श्री राजेश डेम्बला यांचा प्रवास हा चिकाटी आणि दूरदृष्टीचा खरा पुरावा आहे. विनम्र सुरुवातीपासून ते मालिका उद्योजक बनण्यापर्यंत आणि भारताच्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप परिसंस्थेतील एक प्रसिद्ध नाव, त्यांची लवचिकता आणि स्वतः बनवलेल्या यशाची कहाणी प्रेक्षकांना खोलवर जाणवली. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसाय उभारणी आणि संस्थापकाची मानसिकता राखण्यावरील त्यांच्या शक्तिशाली अंतर्दृष्टीचा उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कायमचा प्रभाव पडला. या कार्यक्रमाचे विजेते पीजीवायएफचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि युवा सल्लागार राजेशभाई शाह आणि एसपीजीबीएसचे संयुक्त व्यवस्थापकीय विश्वस्त नैनेशभाई नंदू होते, ज्यांचे सतत पाठबळ, प्रोत्साहन आणि नेतृत्व तरुणांना सक्षम करण्यात आणि अशा समृद्ध कार्यक्रमांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे गुजराती युवा मंच टीम सत्येन पटेल (संस्थापक अध्यक्ष), हर्षित देसाई आणि सिद्धार्थ शाह (उपाध्यक्ष), जीत गांधी (एसआयजी लीड), अंकिता पटेल (सचिव), तसेच आमचे उत्साही योगदानकर्ते विशाल पटेल, नितेश पटेल, उल्का शाह आणि वैशाली शाह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नावीन्यपूर्णता, शिक्षण आणि एकतेद्वारे समुदायाला सक्षम करण्याच्या सामूहिक प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ठरतो.

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत : संदीप खर्डेकर

0
Newsworldmarathi Pune : मी अमेरिका दौऱ्यावर गेलो असताना मी बघितलं की तेथील समस्यांमध्ये “एकाकी ज्येष्ठ आणि वैफल्यग्रस्त तरुण” ही समस्या फार मोठी आहे. तेव्हाच ठरविले की आपल्या कडे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ आनंदाने, सुखाने व्यतीत करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी असेही खर्डेकर म्हणाले.आयुष्यभर कष्ट करून जे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात त्यांना आनंदाने आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले. याच भूमिकेला अनुसरून आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त वस्तू भेट देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,डहाणूकर कॉलनी हैप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह डॉ.शिरीष अमृतकर,सह कार्यवाह,राजेश टेंबे,खजिनदार शांताराम वाणी, सहकार्यवाह दत्तात्रय घाटे, उपाध्यक्ष सीमा माळवकर, सह खजिनदार चंद्रकांत टिकेकर,शैलाताई सातपुते,हरिभाऊ नेरकर इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला वॉटर कुलर डिस्पेन्सर भेट देण्यात आले. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात आणि सर्व सभासद एकोप्याने संघात पडेल ते काम करतात असे संघाचे कार्यवाह डॉ. शिरीष अमृतकर म्हणाले. आमच्या संघाला इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर तर्फे कै.बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ 2024 हा पुरस्कार देण्यात आला असेही डॉ. अमृतकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर व श्री. जयंत उमराणिकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आमचा उत्साह दुणावला असून आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू असेही संघाच्या सदस्यांनी एकमुखाने जाहीर केले.आमच्या यशात संघाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह यांचा मोठा सहभाग असल्याने नुकतेच त्यांचेही सत्कार करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन उत्तम सामाजिक काम करत असून आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगून संघातर्फे संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले. यापुढे क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रूप, मुकुलमाधव फाउंडेशन, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने अधिकाधिक सेवाकार्य करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.