Newsworldmarathi special : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्थान अतिशय प्रभावी आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या काही अॅप्सपैकी इंस्टाग्राम हे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अॅप ठरले आहे. परंतु, याचे मूळ नेमके कसे आणि कुठून सुरू झाले?
ही गोष्ट आहे २०१० सालाची. केविन सिस्ट्रॉम नावाचा एक तरुण, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिकलेला होता. तो एका लाईफ चेंजीग संधीच्या शोधात होता. खरतर त्याला फोटो शेअरिंग आणि लोकेशन बेस्ड अॅप तयार करायचे होते. त्याने सुरुवातीला निर्माण केलेले अॅप होते “Burbn” – हे अॅप वापरकर्त्यांना लोकेशन शेअर करण्यास, इव्हेंट प्लॅन करण्यास आणि फोटो शेअर करण्यास परवानगी देत होते .
केविनला लवकरच उमजले की अॅपमध्ये अनेक फिचर्स असूनही, लोक फक्त फोटो शेअरिंग फिचरच वापरत आहेत. म्हणून मग त्याने त्याचा मित्र माईक क्रिगरला सोबत घेतले आणि दोघांनी मिळून Burbn अॅपमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अॅपमधील इतर सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि वापरायला एकदम सोप्पे (युजर फ्रेंडली) आणि जलद फोटो शेअरिंग अॅप तयार केले. ज्याला त्यांनी नाव दिले “Instagram”.
इंस्टाग्राम या नावाचा अर्थ. “Instagram” हा शब्द “Instant camera” आणि “Telegram” याचे संमिश्र रूप आहे. म्हणजेच, झटपट फोटोज शेअर व्हावेत हेच या अॅपचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वापरकर्त्यांने(यूजर) केवळ फोटो अपलोड करायचा, त्यावर एखादा फिल्टर लावायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं – इतकं सोपं आणि सहज!
इंस्टाग्रामवर अपलोड झालेला पहिला फोटो कोणता होता माहितेय?१६ जुलै २०१० रोजी, केविन सिस्ट्रॉमने त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक फोटो पोस्ट केला होता. तो Instagram वरील पहिला फोटो होता.६ ऑक्टोबर २०१० रोजी हे अॅप अधिकृतपणे iOS App Store वर लाँच झाले. अवघ्या २४ तासांत २५,००० युजर्स अॅपवर नोंदले गेले. एका आठवड्यात युजर्सची संख्या लाखांमध्ये पोहोचली. अशाप्रकारचे वेगवान आणि प्रभावी यश फारच थोड्या अॅप्सना मिळाले आहे.
Instagram चं वाढतं यश आणि लोकप्रियता पाहून, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी २०१२ मध्ये Instagram ला १ बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतलं. Instagram टीमने आपली स्वतंत्र ओळख राखत फेसबुक समवेत कार्य सुरू ठेवले .
आजचे इंस्टाग्राम ऍपचे आधुनिक रुपये हे केवळ अॅप नव्हे, तर एक प्रत्येकाची जीवनशैली ठरत आहे. आज Instagram फक्त फोटो शेअरिंग अॅप नाही, तर ब्रँडिंग, मार्केटिंग, कलाकारांची ओळख, छोट्या व्यवसायांसाठी एक प्लॅटफॉर्म, आणि तरुणाईसाठी अभिव्यक्तीचं माध्यम बनले आहे. Influencers, Reels, Stories, Live Sessions यांसारख्या सुविधांमुळे आज Instagram एक पूर्ण डिजिटल विश्व बनले आहे.
इंस्टाग्रामच्या जन्माच्या या गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात येईल की “साध्या कल्पना जर अचूक ओळखल्या आणि योग्य दिशेने विकसित केल्या गेल्या, तर त्या जागतिक क्रांती घडवू शकतात.” केविन आणि माईकने फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली.लोकांना काय आवडतंय आणि त्यानुसार सोपे, यूजर फ्रेंडली आणि वापरायला सहज असे रूप इंस्टाग्रामला दिले. हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले.
लेखक
-अक्षय बनकर



Recent Comments