Newsworldmarathi Pune: भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या (ICSSR) सहाय्याने आयोजित “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद एस. पी. मंडळीच्या प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था (PGDM), मुंबई यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न केला. या परिसंवादात तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी शाश्वत कृषी विकास आणि महिला शेतकऱ्यांचे सशक्तीकरण यावर चर्चा केली.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात डॉ. हेमा यादव, संचालक, VAMNICOM यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांच्या परिवर्तनशील भूमिकेवर प्रकाश टाकला आणि महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणातील त्यांच्या योगदानावर भर दिला. प्रा. डॉ. उदय साळुंखे, ग्रुप डायरेक्टर, वीस्कूल, मुंबई यांनी आपल्या भाषणात सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी क्षमता विकास, संशोधन आणि नवकल्पना यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संस्थात्मक सहकार्य, धोरणकर्ते आणि उद्योग नेत्यांमधील सुसंवादाची गरज नमूद केली, तसेच संशोधन, सल्लामसलत आणि ज्ञानवृद्धीद्वारे सहकारी व्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
परिसंवादातील प्रमुख सत्रामध्ये डॉ. संगीता शेटे, लिंग व सामाजिक विकास विशेषज्ञ, SMART प्रकल्प, महाराष्ट्र शासन, आणि डॉ. के. सत्यलक्ष्मी, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाची भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेली गरज अधोरेखित केली.
विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, परिसंवादातील चर्चेमध्ये मजबूत धोरणे, तांत्रिक नवसंशोधन, आणि अनेक घटकांच्या सहभागाद्वारे ग्रामीण उपजीविकेचा विकास व कृषी वाढीला चालना देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. वीस्कूल आणि VAMNICOM यांनी ICSSR च्या सहकार्याने केलेले संशोधन या उद्दिष्टांमध्ये मोलाची भर घालते.
या परिसंवादाचा मुख्य उद्देश नाविन्यपूर्ण उपाययोजना, धोरणात्मक शिफारशी आणि सहयोगी उपक्रमांना चालना देणे हा होता. “शाश्वत कृषी व्यवसायांसाठी लवचिक उपजीविके” या विषयावर तज्ज्ञांचे पॅनेल चर्चासत्र परिसंवादाचा विशेष आकर्षण होते. या चर्चेमध्ये कृषी सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, धोरण विचारमंच आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. चर्चेमध्ये महिलांसाठी कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवेश सुलभ करणे, महिलांनी चालवलेल्या कृषी व्यवसायांना मदत करणे, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश कसा करता येईल यावर सखोल चर्चा झाली.
शाश्वत कृषी आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने संशोधनात्मक धोरणे आणि बहुउद्देशीय सहकार्याचे महत्त्व परिसंवादात अधोरेखित करण्यात आले. डॉ. वैशाली पाटील, वरिष्ठ सहयोगी अधिष्ठाता (संशोधन), वीस्कूल यांनी समारोपपर भाषणात महिला-केंद्रित कृषी धोरणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आणि कृतीशील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (ICSSR), शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने “शाश्वत शेती पद्धतीद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे: महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटनांवरील एक अभ्यास” या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पास मान्यता दिली आहे. हा संशोधन प्रकल्प डॉ. वैशाली पाटील, डॉ. हेमा यादव, डॉ. प्रविण घुंणार, डॉ. महेश कदम आणि डॉ. रचना पाटील यांना प्रदान करण्यात आला असून, महिला-केंद्रित कृषी संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही महत्वपूर्ण दखल आहे.
हा राष्ट्रीय परिसंवाद आणि संबंधित संशोधन प्रकल्प महिला सशक्तीकरणासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण सिफारशी विकसित करेल, जे विकसित भारत 2047 च्या समावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असतील.


Recent Comments