Newsworldmarathi Baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या तालुक्यातील नगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळाला भ्रष्टाचाराची कीड लागले असल्याचे वास्तव समोर आले आहे कालच एका बड्या अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. प्रशासकीय वर्तुळात लुडबुड करणारा आका तयार झाला आहे. प्रशासकीय वर्तुळाला लागलेली कीड संपवण्याची धमक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे एक आशेचा ‘किरण’ म्हणून पाहिले जात आहे.
बारामती नगरपरिषदेत नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानिमित्ताने या विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचे समोर आले असून अनेक सुरस कथा आता बाहेर येवू लागल्या आहेत.
शहरातील बांधकाम व्यावसायिक भगवान चौधर यांच्या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या नगररचना विभागात दाखल होता,तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ढेकळे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये द्या अशी मागणी ढेकळे यांनी केली. त्यातील १ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच स्वरुपात घेताना त्यांना बुधवारी (दि. १९) रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली.
या विभागात अगदी शिपायापासून ते ऑनलाईन काम करणाऱ्या एजन्सीचे ऑपरेटर, ते थेट नगररचनाकार अशी भ्रष्टाचाराची मोठी साखळीच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री हाॅटेलात अनेकदा व्यवहार ठरवले जातात. गृह प्रकल्प असो कि व्यावसायिक प्रकल्प त्याच्या मंजूरीसाठी लाच दिल्याशिवाय सहीच होत नसल्याचे चित्र बारामतीत आहे. एजंटांचा विळखा या विभागाला पडला आहे.
बारामती नगरपरिषदेच्या कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. पवार यांच्यामुळे कोट्यवधींचा निधी पालिकेला विकासकामांसाठी मिळतो. पवार यांनी वारंवार सूचना केल्यानंतरही अधिकारी स्तरावर अडवाअडवीची कामे चालतात. पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्य़क्रमात पालखी महामार्ग भूसंपादन मोबदल्यापोटी प्रांताधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने पवार यांच्याकडे केली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचा एक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय विहिरींच्या कामांना परवानगी देत नाही, अशी तक्रार पवार यांच्याकडे केली होती. त्यावर पवार यांनी आमची भावकीच पैसे घेतेय. त्यांनी चुकीचे काम केले असल्यास गैर नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही बारामतीत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागण्यात तसूभरही बदल झालेला नाही.
बारामती नगरपरिषदेला मिळणाऱ्या महसूलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो. बारामती शहराच्या विकासामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामतीमधील सर्व बांधकाम व्यावसायिकांना मागील काही वर्षांपासून होत आहे. ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर ‘क्रेडाई’ने वेळोवेळी घातली आहे.विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे बारामती ‘क्रेडाई’ने स्वागत केले असून आता तरी या विभागातील कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी अशी मागणी ‘क्रेडाई’ने केली आहे.


Recent Comments