छत्रपती शिवाजी महाराज एका युगप्रवर्तक सेनानी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
Newsworldmarathi Pune : प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज एका युगप्रवर्तक सेनानी’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक १ मार्च रोजी होणार आहे. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे चेअरमन डॉ. पी.डी.पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, अर्थतज्ञ अभय टिळक, उद्योगपती संजय इनामदार, उत्कर्ष प्रकाशन चे सुधाकर जोशी, मसाप च्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्यप्रेम, स्वाभिमान, मनाची विशुद्धता, पराक्रम, शौर्य, निर्भयता, युद्धकौशल्य, आरमार निमिर्ती तसेच सर्व मावळ्यांचे त्यांनी केलेले संघटन आणि चतुरंग सैन्य या गोष्टी मराठी समाजाला आणि देश व जगाला स्वातंत्र्याचा संदेश देणारे ठरले. समाजाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी निर्माण केली. समाजाला जागे केले, देशात देशांतर्गत व परदेशी आक्रमक असताना त्यांच्यावर विजय प्राप्त करून मराठयांची सत्ता स्थापन केली. हे त्यांचे क्रांतिकारक कार्य असून याचे विस्तृत वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आले आहे.
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, सनी मेडिकल सातारा चे रोहित शहा, सनी फार्मा सातारा चे नितीन शहा, नेहा शहा – दावडा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ शनिवारपासून
Newsworldmarathi Pune : व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, याउद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ मार्च २०२५ रोजी महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर येथे हे प्रदर्शन होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कमिटी मेंबर सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव आदी उपस्थित होते.
बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल, आॅटोमोबाईल, एफएमसीजी, अॅर्व्हटायझिंग, ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रातील सेवा व उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजक यामध्ये सहभागी होत आहेत.
नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होणार आहेत. दिनांक १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम , पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अजित निंबाळकर तसेच प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन उपस्थित राहणार आहेत. व त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता फ्लूट अँड फिडल हा श्रुती भावे आणि अमर ओक यांचा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल संदीप चे संदीप कोतकर यांनी या सांगीतिक कार्यक्रमाला सहकार्य केले आहे. दोन्ही दिवस खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया देखील उपलब्ध असणार आहे.
रविवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता भीमथडी च्या संस्थापक सुनंदा पवार यांना एमईए चे आयकॉन म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एमईए प्राईड हा पुरस्कार तेजराज पाटील यांना देण्यात येणार आहे. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दोन्ही कार्यक्रम आणि एमईए एक्झिबिशन २०२५ सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यात रस्ते, पाणी योजनांच्या कामांना गती देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
Newsworldmarathi Mumbai : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलिस ठाणी स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातल्या महामार्गाचे रुंदीकरण, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विकासप्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करुन या प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन, पाणीपुरवठा- स्वच्छता, आरोग्य, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, गृह, क्रीडा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसचे वरिष्ठ अधिकारी (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्रीएकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाची गतीने उभारणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रूग्णालयाचे सुरुवातीच्या टप्प्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. उर्वरित कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडासंकुल बांधण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे जांभुळ येथे 2 हेक्टर 60 आर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फूटबॉल, टेनिस, धावपट्टी, प्रेक्षागार आदी सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. ही कामे मंजूर निधीतून तातडीने सुरु करावीत, ज्या कामांना अतिरिक्त निधी लागेल तो तातडीने उपलब्ध केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर डोणे आढळे, वाढीव डोंगरगाव कुसगाव, पाटण व ८ गावे, कार्ला व ७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, खडकाळे, वराळे, देहू नगरपंचायत पाणीयोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. या सर्व पाणीयोजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु : हर्षवर्धन सपकाळ
Newsworldmarathi Mumbai : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु, असा संकल्प असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अदिलशाही, निजामशाहीच नाहीतर भेदाभेद, अस्पृषता व असमाजवादी विचार घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधातही लढले. अदिलशाही, निजामशाही, औरंगजेब गेला पण जातीयवादाचा विचार मात्र गेला नाही तो आजही कायम आहे. एका अभिनेत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या घरासमोर पोलीस पहारा देत बसले आहेत. इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी फोनवरून धमकी दिली जाते व त्याचवेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांना सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करते हे दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
स्वातंत्र्य चळवळीतही केवळ सत्तेचे हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नही होते आणि स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेल्या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे.काँग्रेसची ध्येय धोरणही हिंदवी स्वराज्यावर आधारीत आहेत. महाराजांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधिल असल्याचे सांगताना ही प्रतिज्ञा करण्यासाठी रायगडावर आलो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे याचे हे द्योतक आहे. छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवले आणि पेशव्यांनी स्वराज्याची वाट लावली, आज तसेच होत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाड येथे विंचू दंशावर संशोधन करून औषध शोधणारे प्रख्यात डॉक्टर पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांच्या निवासस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सदिच्छा भेट दिली व बावस्कर कुटुंबियांशी संवाद साधला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे महिला काँग्रेसच्या ॲड. श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, दिलीप पाडगावकर, यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आरोपीची माहिती देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपये…
Newsworldmarathi Pune : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या वेळी घडला आहे.
अधिक माहिती अशी की, स्वारगेट डेपोत आपल्या गावी चाललेल्या २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे ( वय. ३७ वर्षे) रा. गुनाट, ता. शिरूर, जि. पुणे) हा फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हेगारास शोधण्यासाठी आठ पोलिस पथकं रवाना केली आहेत.
मात्र या घटनेला होऊन तीन दिवस होत आहेत तरी अजून आरोपी सापडत नसल्याने अखेर स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे घोषित केले आहे. दरम्यान, आरोपीची माहिती देणाराचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. या संबंधित स्वारगेट पोलिसांनी माहिती पत्रक जारी केले आहे.
कोंढवा-येवलेवाडी कार्यालय जनजागृती व स्वच्छता अभियान!
Newsworldmarathi Pune : उप आयुक्त, परिमंडळ क्र. ४ व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली गुरु हरदेव सिंह यांच्या स्मृतीदिनानिमित्त संत निरंकारी सेवादल – इंदिरानगर यांच्या माध्यमातून रविवारी (ता.२३) सकाळी ७ ते १२ या वेळेत ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात स्वच्छ जल स्वच्छ मून या संकल्पनेच्या अंतर्गत २२५ साधक तसेच क्षेत्रिय कार्यालय कडील ४० अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत परिसर स्वच्छ करणेत आला. १ कॉम्पॅक्टर , १ छोटा हत्ती व १ कंटेनर या वाहनामार्फत अंदाजे ४ टन १५० किलो कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने, एकदा वापरलेले प्लास्टिक वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वच्छतेबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर अभियाना दरम्यान कोंढवा येवलेवाडी कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. दुल्लम, आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक श्रीमती कदम, श्री. सोनवणे व अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
स्वारगेट स्थानाकातील धक्कादायक प्रकाराबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या….
Newsworldmarathi Pune : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला आहे.
या अमानुष घटनेतील आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तो तातडीने पसार झाला. स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागातही महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जात असले तरी अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सकाळी सहा-साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पीडित तरुणीने नऊच्या सुमारास पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पोलिस पथके कार्यरत असून पुण्यासह परिसरातील ग्रामीण भागातही शोधमोहीम राबवली जात आहे. आरोपीच्या कॉल डिटेल्सचा मागोवा घेतला जात असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहरात चाललंय काय! स्वारगेट बसस्थानाकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Newsworldmarathi Pune : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.
पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. यावेळी एका व्यक्तीने तिला बस तिकडे लागली आहे असं सांगून बसमध्ये नेले. आणि जबरदस्ती करत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.
स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत
युवकांनी नवकल्पना आणि तंत्रकौशल्य घेऊन अवकाश उद्योजक व्हावे : डॉ. के. सिवन
Newsworldmarathi Pune : “विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्रकौशल्य, विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखांचे ज्ञान आणि नवकल्पना यांच्या आधारावर अवकाश संशोधन क्षेत्रातील असंख्य संधी हेराव्यात. अवकाश तंत्रज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र आपलेसे करावे आणि अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी,” असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी विद्यार्थ्यांना केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३१ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘एआयटी’तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. के. सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, लष्करी अधिकारी, ‘एआयटी’चे अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार’ २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना देण्यात आला. ईशान कपूर यांना अष्टपैलू विद्यार्थी सन्मान देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्रीडापटू साठीचा जी. राजशेखर स्मृती करंडक वंशिका या विद्यार्थिनीने पटकावला. सर्वोत्कृष्ट संशोधन व सल्लासेवा हा पुरस्कार डॉ. एल. डी. जठार यांना, तर सर्वोत्कृष्ट अध्यापक हा पुरस्कार डॉ. सीता यादव यांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
डॉ. के. सिवन यांनी इस्रोच्या वाटचालीचा आढावा घेत ‘विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघावे’, असा सल्ला दिला. “अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभर युवकांना अनेक संधी आहेत. संशोधनाला मोठा वाव आहे. या क्षेत्रात खासगीकरणाचे युग सुरू झाले आहे. केंद्र सरकारचा त्याला पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरसोबत आपल्या देशाप्रती आणि आपल्या समाजाप्रती असलेली बांधीलकी ओळखून, या क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. ‘एआयटी’सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा अधिक आहे,” असे ते म्हणाले.
ब्रिगेडियर अभय भट यांनी स्वागत प्रास्ताविकात ‘एआयटी’च्या गेल्या वर्सभरातील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीविषयी माहिती दिली. ‘एआयटी’चे संचालक मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांनी आभार मानले. रोशनी गौडा आणि रजत सिंग यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे प्रवासादरम्यान मराठी साहित्य, कला, संस्कृतीचा जागर
Newsworldmarathi Pune : मराठी भाषेचा जागर करीत साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी अनोख्या साहित्ययात्री संमेलनाची अनुभूती घेतली. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे या रेल्वे प्रवासात मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत झालेले हे मराठीतील पहिलेच आणि दीर्घकालीन साहित्य संमेलन ठरले.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशा रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष रेल्वेला शूर सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले होते तर प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली होती. दि. 19 रोजी दुपारी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या दिवशी उदय सामंत यांनी साहित्यिक कलाकार यांच्याशी संवाद साधत पुणे ते अहमदनगर रेल्वे प्रवास केला. ही विशेष रेल्वे दि. 21 रोजी पहाटे दिल्ली येथे पोहोचल्यानंतर संमेलनाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, साहित्य रसिक आणि कलाकार महादजी शिंदे एक्स्प्रेसमधून दिल्लीत आल्यानंतर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्साहाने सहभागी झाले. साहित्य यात्री संमेलाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी रात्री परतीच्या प्रवासात सुरुवात झाली आणि समारोप आज (दि. 25) सकाळी 8 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या संमेलनाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे तर वैभव वाघ कार्यकारी अध्यक्ष होते.
सोमवारची (दि. 24) सकाळ अभंग, भजन, कीर्तनासह, पोवाड्याच्या सादरीकरणाने भक्ती आणि वीररसात चिंब झाली. ‘वाटेवरचा देवनाम’, ‘एका जनार्दनी शिव’, ‘ॐ नमो ज्ञानेश्वरा, करूणाकरा दयाळा’ आदी भक्तीगीते सादर करण्यात आली. विविध बोग्यांमध्ये सुरू असलेले कविता, कथा वाचन तसेच विविध कलांच्या सादरीकरणातून रसिकांना विविध साहित्य, कलाकृतींची आनंद मिळाला.
ढोल-ताशा पथकातील वादक तसेच अनेक हौशी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने कलागुणांचे सादरीकरण केले. सायंकाळी वारकऱ्यांनी हरी नामाचा घोष करत, टाळ-मृदुंगाच्या साथीने दिंडी काढली. यात अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.
नाशिक येथील वारकऱ्यांनी अभंग, हरिपाठ आणि भजन सादर केले. यात राजेंद्र सपकाळ, बाळासाहेब फराटे, सुखदेव सांगळे, लक्ष्मी घुले यांचा सहभाग होता.
सिंहगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादकांनीही कला सादर केली. सोलापूरचे कवी सुरेशकुमार लोंढे, बेळगावचे कवी महादेव खोत, कोल्हापूरचे कवी मकरंद वागणेकर यांनी कवितांचे वाचन केले. रेल्वेत प्रवाशांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांनी सामुहिक नृत्य-वादन करून सर्वांचे मनोरंजन केले. आटपाडीचे ढोलकी वादक सिद्धनाथ जावीर व माळशीरसचे संवदिनीवादक राजवर्धन वाघमारे यांच्या साथीने प्रवाशांनी भक्तीरचना सादर केल्या. युट्युब वरील सुप्रसिद्ध खास रे टीव्हीच्या रॅपर्सने अनेक दर्जेदार मराठी रॅप गाणी सादर करत मैफल रंगतदार केली.
पुणे ते दिल्ली या 34 तासांच्या आणि दिल्ली ते पुणे 31 तासांच्या प्रवासादरम्यान सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, अभिजीत पोखर्णीकर, ऋषिकेश कायत, दिग्विजय पाटील, अथर्व पिसाळ, केदार काटे या सरहद, पुणेच्या युवा कार्यकर्त्यांनी प्रवाशांना तत्पर आणि विनम्रपणे सेवा पुरविल्या.
कर्तव्य मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे पथक दिमतीला होते. या पथकात आठ जणांचा समावेश होता.
रेल्वे प्रवासादरम्यान हे पथक प्रवाशांची सतत विचारपूस करत कोणाला आरोग्याची समस्या जाणवल्यास त्यांना वैद्यकीय मदत करत होते. डॉ. फैज सय्यद, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. यश थोरात, डॉ. क्षितिज कुचेकर यांच्यासह गौरव गायकवाड, अनिकेत मोगरे, गणेश जानकर, यशवंत पवार यांचा वैद्यकीय पथकात समावेश होता.
या वर्षीचा उस्फूर्त प्रतिसाद, प्रवासा दरम्यान जोडली जाणारी मने, प्रत्येकाला मिळणारी सादरीकरणाची संधी आणि होणारी वैचारिक देवाण घेवाण पाहता दरवर्षी हे चाकावरचे मराठी साहित्ययात्री संमेलन सुरू ठेवावे असा आयोजकांचा विचार चालू असल्याचे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी सांगितले.

