मेट्रोच्या पाच नव्या स्टेशनमुळे पुणे-सातारा रस्त्यावरील नागरिकांचा प्रवास होणार सुखकर
Newsworldmarathi Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये करण्यात आलेले बदल तसेच स्टेशनची संख्या वाढविण्यात आल्यामुळे सातारा रस्ता परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महामेट्रोने या मार्गावर केवळ तीन मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते.
मात्र, महापालिकेच्या भूमिकेमुळे आता या मार्गावर पाच भूमिगत मेट्रो स्टेशन होणार असून त्यासंबंधीच्या सुधारित आराखड्याला व वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्यसभेत मंजुरी देण्यात आली.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज विस्तारीत मार्गाचे कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, या मार्गाच्या आराखड्यात मार्गावर तीनच भूमिगत मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते.
मात्र, या स्टेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्यानुसार या भागातील लोकसंख्या आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात आला. जुन्या आराखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती व राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या स्टेशनचा समावेश होता.
नव्या आराखड्यात तीनच्या ऐवजी पाच स्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये बालाजीनगर व बिबवेवाडी-सहकारनगर स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांच्या जागांमध्ये बदल केल्यानंतर नव्या आराखड्याला महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
नवीन स्थानकांची नावे व प्रत्यक्ष ठिकाण
• मार्केट यार्ड – उत्सव हॉटेल चौक
• बिबवेवाडी / सहकारनगर – नातूबाग
• पद्मावती – सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ
• बालाजीनगर – भारती विद्यापीठ
• कात्रज – कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेलजवळ
मार्चमध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी
Newsworldmarathi Delhi : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुनावणीला आजही स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज (25 फेब्रुवारी 2025) होणार होती, परंतु ती पुढे ढकलली गेली आहे. या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, ज्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी आहे.
निवडणुकीच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी चार मार्चला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुका लवकरच घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
Newsworldmarathi Mumbai : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात (Pune Hospital) उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
भगवानराव गोरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव आज दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुरली अण्णांशी पंगा महागात, गजा मारणेला जमिनीवर बसवलं, टोळीची शहरातून काढली धिंड
Newsworldmarathi Pune :कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे.
गजा मारणे व त्याच्या टोळीतील २७ जणांवर कारवाई करणार, त्यांची मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज वार्तालाप कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर काही तासात गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्याविरुद्ध १९८८ पासून एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोनदा तडीपाराची कारवाई करण्यात आली असून एकदा स्थानबद्ध केले आहे. अशा प्रकारे त्याच्यावर १२ वेळा वेगवेगळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट नागरिकांच्या भेटीला !
Newsworldmarathi pune : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या पाचव्या टप्प्याला पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले. राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचीही या उपक्रमास पूर्णवेळ उपस्थिती होती.
नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते वेळेत सुटावेत यासाठी खासदार मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कोथरुड विधानसभा मतदारसंघातून सुरु केला. त्यानंतर कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा पाचवी टप्पा होता. नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॅाल्स, आधार कार्ड संदर्भातील स्टॅाल्सही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबविला जातो.
या संदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मोहोळ म्हणाले, ‘पर्वतीच्या अभियानात ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी टोकन घेत भेट घेतली. थेट नागरिकांना भेटताना नागरिकांसह मलाही मिळणारे समाधान मोठे आहे. भेंडीमध्ये विशेषतः वैयक्तिक कामे आणि नागरी प्रश्न सांगण्यावर नागरिकांचा कल दिसला. जे विषय लगेचच सुटू शकतील अशा कामांसंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच दीर्घकालीन कामांसंदर्भातही अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखण्यासंदर्भात सूचित केले.
टोकन व्यवस्थेमुळे प्रत्येकाला मिळते भेटण्याची संधी !
खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत खा. मोहोळ यांची भेट घेण्यासाठी सुरुवातीला टोकन द्वारे नोंदणी करुन घेतली जाते. त्या टोकनच्या क्रमांकद्वारे नागरिकांना थेट भेटण्याची संधी मिळते. शिवाय भेटासाठी किती कालावधी लागू शकतो याचा अंदाजही नागरिकांना येतो. या टोकन प्रक्रियेमुळे अभियानात सहभाग घेण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
रसिकांची दाद हाच कलाकारासाठी आशीर्वाद : पंडित विनायक तोरवी
Newsworldmarathi Pune : कलाकार हा कधीच पैशांसाठी, पुरस्कारासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी कलेचे सादरीकरण करत नसतो. स्वत:ला आनंद मिळावा, तो आनंद इतरांनाही देता यावा यासाठी त्याचा प्रयत्न असतो. रसिकांची दाद म्हणजेच आशीर्वाद, अशा भावना कलाकारांच्या असतात. पुरस्काराने कलाकारांची जबाबदारी वाढते, असे भावोद्गार प्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी काढले.
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव आणि संगतकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित कार्यक्रमात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गुरू गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी (बंगळुरू), पंडित विनायक बुवा पटवर्धन संगीत गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते (पुणे), पंडित चंद्रकांत कामत संगतकार पुरस्काराने तबला वादक पंडित रवींद्र यावगल (बंगळुरू) तर पंडित तुळशीदास बोरकर संगतकार पुरस्कराने संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर (मुंबई) आणि पंडित विनय मिश्रा (दिल्ली) यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी सत्काराला उत्तर देताना पंडित तोरवी बोलत होते. पुरस्काराचे वितरण एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे उपस्थित होते. संगीत गौरव व गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित कलाकारांना 21 हजार रुपये तर संगतकार पुरस्कारप्राप्त कलाकारांना 10 हजार रुपये पुरस्काराच्या रूपाने देण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील संकल्पना विशद केली.
ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते म्हणाले, कलेच्या क्षेत्रात माझ्याकडून जे कार्य झाले आहे त्याचे श्रेय माझे आई-वडील, गुरुजन, माझे शिष्य आणि रसिक या सगळ्यांचे आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही दडपण येणारी गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्या गुरू मालिनीताई राजुरकर आणि गुरुस्थानी असलेल्या कलाकारांना समर्पित करतो.
भूषण गोखले म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाला मोठा इतिहास असून ते स्वरमंदिरच आहे. महाविद्यालयातील गुरूकुल पद्धत ही एक उत्तम शिक्षणपद्धती आहे. ते पुढे म्हणाले, ज्याचे पाय कायम जमिनीवर असतात त्या व्यक्ती आयुष्यात कायम मोठ्या उंचीवर पोहोचतात. पुरस्कार मिळालेले सर्व कलाकार आपआपल्या क्षेत्रात इतक्या उंचीवर असूनही अतिशय नम्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्या शिष्यांसमोर आदर्श आहेत.
यावेळी पंडित विनय मिश्रा यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आशय कुलकर्णी यांनी तबला साथ केली. पंडित रवींद्र यावगल याचे एकल तबला वादन झाले. त्यांना अभिषेक शिनकर यांनी संवादिनीची साथ केली. दिली. पंडित विनायक तोरवी यांच्या दमदार अशा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना पंडित रवींद्र यावगल (तबला), पंडित विनय मिश्रा (संवादिनी) समर्पक साथसंगत केली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.
नीलम गोऱ्हे निर्लज, नमकहराम बाई : संजय राऊत यांची टीका
Newsworldmarathi Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं’, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोऱ्हेंचं वक्तव्य ठाकरे सेनेच्या चांगलच जिव्हारी लागलं आहे. निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे असं अनेक शब्द राऊत यांनी गोऱ्हेंसंदर्भात उच्चारलं आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात राऊत यांन एका महिलेसंदर्भा अपशब्द वापरल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
संजय राऊत यांनी गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती…बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कोणती बाई तुम्ही पक्षात आणली?, जाताना ही बाई ताटात घाण करून गेली, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
तसेच, नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज बाई आहे, नमक हराम बाई असं म्हणत हा शब्द कापू नका, बीप साउंड देऊ नका…हा असंवैधानिक शब्द नाही, असं सांगत राऊतांनी संताप व्यक्त केला.
यासोबतच, नीलम गोऱ्हे बाई नसून बाईमाणून आहे, भ्रष्ट आहे, अशी टीका करत काल नीलम गोऱ्हे म्हणाल्या 50 लाख रुपये दिले महामंडळाला… लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?माझ्याकडे माहिती आहे पुरावे आहेत, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
रविंद्र धंगेकर घेणार एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण हाती?
Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसापासून माजी आमदार रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र धंगेकर यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत धंगेकर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
उद्याच्या बैठकीत धंगेकर करणार कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती. गेल्या २ दिवसांपासून धंगेकर यांच्या सोशल मिडिया पोस्ट सुद्धा चर्चेत आहेत.
हू इज धंगेकर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी विचारलेला हा प्रश्न चांगलाच गाजला होता. पण आता ‘व्हेअर इज धंगेकर’ असं विचारण्याची वेळ आलीय. कारण रविंद्र धंगेकरांचं चाललंय तरी काय असा प्रश्न पडत आहे. उद्याच्या बैठकीत धंगेकर काय निर्णय घेतायेत याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वर्गमित्राच्या जाचाला कंटाळून विद्यार्थीनीने संपवले जीवन
पुणे : आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सहिती कलुगोटाला रेड्डी या तरुणीने वाकडमधील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला तिच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात तिचा वर्गमित्र प्रणव राजेंद्र डोंगरे हाच तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे उघडकीस आले आहे.
सहिती आणि प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. प्रणवने सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या सततच्या छळामुळे सहिती तणावाखाली होती आणि शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येनंतर कलुगोटाला रेड्डी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी प्रणव डोंगरे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर प्रकरणाचा वाकड पोलीस तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे कॉलेज व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संवेदनशील समाजाची आज गरज : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस
Newsworldmarathi Pune : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे मत अ भा साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
बल्लवाचार्य कै. म. वा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा चौथा “अन्नब्रम्ह” पुरस्कार, पुणे शहरातील नामांकित ‘श्री मुरलीधर व्हेज’ अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे बोलत होते. सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हासदादा पवार, पुरस्काराचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसाद जोशी उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही. ‘टू मिनिट नूडल्स’च्या जमान्यात त्यांना अन्न तयार करण्यामागचे कष्ट कळत नाही. पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे. पुण्यात दरवर्षी 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी नोकरी निमित्त पुण्यातच राहतात. या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो.
उल्हासदादा पवार म्हणाले, पिझा – बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत, भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुचुंबिय करत आले आहे जे निरोगी प्रकृती करीता आवश्यक आहे त्यामुळे परदेशी लोकांना पण या खाद्य संस्कृतीने भुरळ घातली आहे. मात्र ज्या प्रमाणे उडपी आपल्या देशाच्या प्रत्येक भागात व्यवसाय करताना दिसतात, तसा मराठी माणूस खाद्य व्यवसाय करताना दिसत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, पुर्वाश्रमीच्या मुरलीघर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी ‘विद्यार्थी मेस’ची संकल्पना मर्यादित संख्येत आज ही राबवीत आहोत. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मुल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून, ‘नफ्या बरोबर ग्राहकांचा संतोष व समाघान’ कमावणे हे मुरलीघर’ चे प्रथम पासुन वडीलोपार्जित ऊद्दीष्ट ठरले आहे. राज्याच्या विविघ भागातुन अनेक महत्वाचे कलाकार, राजकीय व्यक्ती, उद्येग व्यवसाईक, उच्च पदस्थ यांनी मुरलीघर भोजनालयातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. हा पुरस्कार तीन पिढ्यांच्या तपस्येचा, ऊत्तरदायीत्वाच्या सातत्याचा सन्मान आहे. ते म्हणाले, या पुरस्काराचे दुसरे वैशीष्ठ्ये म्हणजे डॉ जोशी सरांनी वडीलांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण जपत इतर ‘अन्न – व्यवसाईकांना’ सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे. कामगार वर्गा’ प्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टीकोन व त्याची कृतीशील दखल इ मुळे हे शक्य झाल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगीतले. तसेच ‘परगांवच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, दुष्काळजन्य परिस्थितीत व कोरोना काळात सेवा देण्याऱ्या घटकांना’ मुरलीघर भोजनालयातुन, व्यवसाईक दृष्टीकोना पेक्षा सामाजिक दृष्टीकोनातुन’ सेवा दिली गेली याचा अभिमान वाटतो..!
डॉ. न. म. जोशी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, माझे वडील हे आचारी काम करायचे म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी श्राद्ध घालण्यापेक्षा अन्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं. हीच खरी त्यांना आदरांजली आहे असे मला वाटते. मुरलीधर भोजनालायाची कीर्ती पूर्वी पासून आम्ही ऐकत आलोय. मुरलीधर च्या भोजनाची वाजवी किंमतीतील सुग्रास चव चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीची आहे.गोपाळदादा तिवारी हे सामाजिक जाणीव असलेले राजकारणी असल्याचे डॅा न म जोशी सरांनी सांगितले.
अन्नब्रम्ह पुरस्कार मानपत्र, सन्मान चिन्ह व रु ५०००/- असे स्वरुप होते.. मात्र रु ५०००/- हे तिवारी कुटुंबीयांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्या करीता डॅा न म जोशी सरां कडे सुपुर्त केले.. मानपत्राचे वाचन दीप्ती डोळे यांनी केले. प्रसाद जोशी यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. अमर काळे यांच्या ‘गायन कार्यक्रमा’सह मुरलीधर च्या ‘स्नेह भोजना’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी सभागृहात घटनातज्ज्ञ प्रा ऊल्हास बापट, मा विठ्ठल मणीयार, रवि चौधरी, सुर्यकांत मारणे, डॉ मोहन ऊचगांवकर, माजी उपप्राचार्य प्रा संजय कंदलगावकर, विष्णु कुलकर्णी, गणेश नलावडे, खाद्यविक्रेता संघाचे मा अध्यक्ष किशोर सरपोतदार, शेखर बर्वे, दत्ता ऊभे, जयंत पवार, दत्त मंदीर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, टिळक गणपती ट्रस्ट अध्यक्ष रविंद्र पठारे, राम विलास तापडीया, राधेश्याम कासट, डॅा तांदळे, राजेद्र खराडे, मेघराज निंबाळकर, अमोल सावंत, किशोर सरदेसाई, प्रा सुरज कुलकर्णी, उमेश चाचर, सुरेश पारखी, मंगेश झोरे, अँड फैयाज शेख, सुभाष जेधे, शेखर बनसोड, सुरेश नांगरे, गोरख पळसकर, बंडू शेडगे, विकास घोले, अण्णा गोसावी, अविनाश गोडबोले, शंकर थोरवे, नितीन पायगुडे, महेश अंबिके, योगेश भोकरे, आशीश गुंजाळ, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, गणेश शिंदे, ॲड स्वप्नील जगताप, सुनील मारणे, महेश हराळे, संजय अभंग, गणेश मोरे, नरेश आवटे, श्रीकांत सांखला बंधू, राजेश सुतार, इ सह सह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

