Newsworldmarathi Pune : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव माननीय डॉ. तानाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेने जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये जयवंत पब्लिक स्कूलचा १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय वारसा – “एक विरासत” या संकल्पने अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कर्नल एस. के. प्रकाश सर (इंडियन आर्मी) कौस्तुभ काळभोर सर (इन्व्हेस्टमेंट बँकर, फायनान्स व टेक्नॉलॉजी लीडर) कर्नल कुलदीप रोहिल सर (इंडियन आर्मी) अरविंद मित्तल सर (प्रसिद्ध नाट्य कलाकार, लेखक आणि समुदाय नेते) जेएसपीएमच्या स्कूल सहसंचालिका डॉ. अमिता कामत, हडपसर संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. व्ही. ए. बुगडे उपस्थित होते.
या सोहळ्यात प्राचार्या मौसमी चौधरी यांनी शाळेचा अहवाल सादर करताना गेल्या वर्षभरात शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील कामगिरी आणि समग्र विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीच नव्हे, तर समाजात सकारात्मक योगदान देणाऱ्या मूल्यांना आत्मसात करण्यासाठी प्रेरित करण्याच्या ध्येयावर भर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात प्रशालेतील नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. भारतातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन, वेदशास्त्र, महाभारत, रामायण, विज्ञान, अध्यात्म आणि समाजकारण आशा सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक रंगछटा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या कलेतून सादर केल्या.
या कार्यक्रमासाठी हडपसर संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. व्ही.ए बुगडे, स्कूल सहसंचालिका डॉ. अमिता कामत, प्राचार्या मौसमी चौधरी, समन्वयक शैलजा शेवाळे, दिपाली लोखंडे, शरयू पवार, मोहिनी भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शिक्षिका कनन बगजानी, माधुरी दीक्षित व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सूत्रसंचालन केले व कनन बगजानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Newsworldmarathi Nagar : महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत मोठा गोंधळ झाल्याची ही घटना आहे. अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत होताच संतापाच्या भरात पंचाला लाथ मारली. त्यामुळे मैदानात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला.
ही घटना केवळ खेळातील आक्रमकतेपुरती मर्यादित राहिली नाही, तर दोन्ही पैलवान थेट व्यासपीठावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले. अजित पवारांनी या गोंधळावर काय प्रतिक्रिया दिली आणि पुढील कारवाई काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. मात्र, “माझी पाठ टेकली नव्हती,” असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामना रंगला आहे.
Newsworldmarathi Pune : आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा ना ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते, क्रिकेट खेळात असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केली. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कर्वे नगर येथील पंडित फार्म्स येथे करण्यात आले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार व इंद्रनील चितळे उपस्थित होते.
चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बासरीवादक अमर ओक, कवी वैभव जोशी आणि पंडित आनंद भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला. त्यानंतर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली.
आवड, नेतृत्वक्षमता आणि कामाप्रती असणारी वचनबद्धता असली कि कामामध्ये यश मिळते. चितळे बंधूनी हे गुण जपत आपले कुटुंब एकत्र ठेवून व्यवसाय वाढवला आज त्यांच्याबरोबर आपण जोडले गेलो असल्याचा आनंद असल्याची भावना सचिनने यावेळी व्यक्त केली. माझी बहिण लग्नानंतर पुण्यात राहायला आली त्यामुळे मी पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे असे सांगत सचिन म्हणाला की मुंबईसाठी जुनिअर लेव्हलला खेळायच्या करिअरची सुरुवात १९८५ साली पुण्यात झाली होती, त्यामुळे पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे.
आयुष्यात शॉर्टकटला घेणे चुकीचे असल्याचे सांगताना सचिन म्हणाला, तुला यश मिळाले नाही तर तू अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस, असे धडे मला घरातूनच मिळाले होते. शाळेत असताना उन्हाळ्याची सुटी होती, तेव्हा मी खूपच मस्तीखोर होतो, झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो, त्यामुळे माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझे क्रिकेट सुरु झाले.
आजकाल अपेक्षांचे ओझे खूप असते त्यामुळे प्रेशर येते असे आपण ऐकतो. तुझ्यावर १०० कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असायचे त्या तू कसे हाताळले असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला की आपल्यावर दबाव असणे आवश्यक आहे, तसे असेल तर काम चांगले होते. २०११ मध्ये विश्वचषक खेळत असताना संघाच्या बैठका व्हायच्या, त्यामध्ये अपेक्षा व्यक्त व्हायच्या, आपण विश्वचषक जिंकायला हवा, अशी प्रत्येकाची भावना असायची. आपल्याला हा कप जिंकायचा आहे, पण त्याचा दबाव घेऊ नका, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. पण सकारात्मकते बरोबरच प्रत्येकजण दबावात होता, त्यामुळे विश्वचषक जिंकू शकलो, त्यामुळे आयुष्यात दबाव असणे आवश्यक असल्याचे सचिन यावेळी म्हणाला.
१९८३ मध्ये भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे आणि सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचे नाणे ठेवायचे आणि तू १० मिनिटे आउट व्हायचे नाही असे सांगायचे. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला की तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला असल्याने मला १० मिनिटे आऊट ना होता खेळावेच लागायचे व चेंडू हवेत मारता यायचा नाही. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिक दृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाल्याची आठवण सचिनने यावेळी सांगितली.
चूक केली तर आपला कान धरणारी व्यक्ती हवी? या प्रश्नाचे उत्तर देताना बंगळुरूमध्ये ऑस्ट्रलियाबरोबरच्या सामन्यात आपण केलेली चूक आणि त्याबदल्यात अजितने धरलेला कान याची आठवण ताजी केली. मी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण दोघेजण फलंदाजी करत होतो, माझ्या ३५ धावा झाल्या होत्या. मैदानावर प्रेक्षकांचा गलका सुरु होता आणि दुसरी भाव घेण्याच्या प्रयत्नात मी रन आउट झालो. तेव्हा मी मैदानावर नाराजीची प्रतिक्रिया दिली आणि तंबूत परतलो. मॅच झाल्यावर घरी परतलो, तेव्हा अजित मला म्हणाला, तू बाद झाल्यावर तिथे प्रतिक्रिया देण्याची काय गरज होती, त्यामुळे व्ही व्ही एस लक्ष्मण विचलित झाला असेल, त्याला तर पुढे फलंदाजी करायची होती असे म्हणत त्याने माझी अशी प्रतिक्रिया चुकीची होती हे दाखवून दिले.
अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन नसता तर मी क्रिकेटपटू म्हणून घडलो नसतो. अनेक खेळाडू माझ्यासाठी धावले नसते तर माझ्या इतक्या धावा झाल्या नसत्या, माझे कुटुंब, मित्र, ग्राउंडमन असे अनेकजण माझ्यासाठी नेहमीच तयार असायचे. आवड असली कि त्याला सीमारेषा नसतात, असेही तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
७५ वर्षाच्या अभिमानाची चवीची परंपरा ही ग्राहकांमुळे टिकून असल्याचे श्रीकृष्ण चितळे यावेळी म्हणाले. मागे वळून पाहताना घरातल्या प्रत्येकाने व्यवसाय वाढवण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. रघुनाथराव मुंबईमध्ये व्यवसाय करायचे तेव्हा, युद्धाचे दिवस होते. सैन्याला मोठ्या प्रमाणात लोण्याची आवश्यकता असे तेव्हा ते जळगाव, मुंबई या भागातून प्रवास करून लोणी मिळवून देत असत. १९६१ मध्ये पुण्यात आलेल्या पानशेत पुराच्या दरम्यान राजाभाऊ चितळे यांनी आपला कारखाना बंद ठेवून दुकानातील कर्मचारी मंडळींची राहण्याची व्यवस्था केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आधीच्या पिढीने लावलेल्या हे रोप पुढे नेत नव्या पिढीने त्यावर कळस चढवला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्राहक हा आमच्यासाठी कायमच ब्रँड अँबेसिडर राहिलेला आहे. विश्वास, गुणवत्ता या तत्वामुळेच आणि चितळे कुटुंबातील अन्नपूर्णा यांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावरच आमची उत्पादने अमेरिका आणि जगाच्या अनेक भागात जाऊन पोहचली आहेत, भविष्य काळात विदेशात अनेक ठिकाणी प्लँट सुरु करण्याचा मानस असल्याचे संजय चितळे यावेळी म्हणाले. येत्या काळात आम्ही लॉयल्टी प्रोग्रॅम सुरु करणार असल्याचे केदार चितळे यांनी सांगितले.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले, इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.
Newsworldmarathi Pune : पुना गोल्फ लीग चे यावर्षी पुण्यातील येरवडा गोल्फ कोर्स येथे दिमाखदार असे आयोजन करण्यात आले होते .या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेला देशभरातील अनेक खेळाडू आणि त्यांचे संघ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या गोल्फ लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अपवादात्मक योगदानाबद्दल अर्किन पाटील* – गोल्ड डिव्हिजनचे प्रतिनिधीत्व करत त्यांनी सन्मान मिळवला.मनप्रीत, एबी आणि जीजीच्या जग्वार्स चे,आर्किन पाटील चे अतुलनीय कौशल्य आणि संयम दाखवला, ज्यामुळे तो लीगच्या मुख्य विभागात त्याच्या संघाची प्रमुख सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते पुण्याचे आशुतोष लिमये ,त्यांनी उपविजेता पदक मिळवित पुना गोल्फ लीग च्या संघाचे वर्चस्व टिकवले. मनप्रीत, एबी आणि जीजीच्या जग्वार्समधील आणखी एक स्टार, कांस्य विभागात आशुतोषची उत्कृष्ट कामगिरी त्याच्या संघाच्या यशात मोलाची ठरली.
या वेळी विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. संघाचे मालक मनप्रीत उप्पल,अमित बोरा,आणि गौरव गाढोके यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पुन्हा गोल्फ क्लब चे कप्तान इक्रम खान यासह देशभरातील विविध संघाचे प्रायोजक ,कॅप्टन आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशुतोष लिमये यांनी काश्य पदक मिळवित पुण्याचे वैभव वाढवल्याची प्रतिक्रिया क्रीडा रसीकांडून व्यक्त होत आहे .
Newsworldmarathi Pune : पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तथापि, उपचारांच्या बाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
GBS हा एक दुर्मीळ आजार असून, शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या परिधीय नसांवर हल्ला करते, ज्यामुळे मांसपेशींची कमजोरी, सुन्नपणा आणि कधी कधी लकवा येतो. पुण्यात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता, आवश्यक ती काळजी घ्यावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. GBS आजाराच्या उपचारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या दरांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस आजाराच्या पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
Newsworldmarathi Pune : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख मुले व मुली यांची मोफत नेत्र तपासणी, औषधोपचार शिबिर, ॲम्बुलन्सचे उद्घाटन आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र रसाळ यांच्या “समकालीन हिंदी कविता में सामाजिक एवं राजनैतिक व्यंग्य” या पुस्तकाचा प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आमदार चेतन तुपे, सुरेश अण्णा घुले, शहरअध्यक्ष दिपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजेश रसाळ यांनी आपल्या मनोगतात सदर पुस्तक लिहिण्यासाठी जी काही प्रेरणा भेटली ती माझ्या आईकडूनच भेटली. माझी आई ही अतिशय शिस्तबद्ध व प्रेमळ स्वभावाची होती त्यामुळेच मी माझ्या पुस्तकाचे समर्पण माझ्या आईच्या चरणी केले आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन हे कडक शिस्तीसाठी, आणि तरुणांची आवडती राजकीय व्यक्ती असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते व्हावे. ही माझी मनोमन इच्छा होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन ही बाब मला जास्त अभिमानास्पद वाटते, असे रसाळ म्हणाले.
यावेळी डॉ शंतनू जगदाळे, अजित दूधभाते, प्रदीप देशमुख, अजित घुले, संदीप नाना तुपे, खलाटे सर, संदीप बधे, अमर आबा तुपे, शिवाजी डोंबे, वैष्णवी सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune : श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजीकाका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.
‘कमळ हार’ हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडविण्यात आली आहेत. या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे, त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे. मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे. ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते. या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे.
यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे. हा अद्वितीय दागिना २० कुशल कारागीरांनी २५ दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे. या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
Newsworldmarathi Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांच्या अपेक्षेनुसार, नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) काही बदल करण्यात आले आहेत, तर जुन्या कर प्रणालीत (Old Tax Regime) कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.
12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. भारत सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली, जी जुन्या रिजीमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे. नव्या रिजीममध्ये फक्त NPS वर सूट दिला जाते. तर जुन्या रिजीममधून अनेक गोष्टींवर लाभ घेता येऊ शकतो.
नवीन कर प्रणालीत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे करदात्यांना अधिक लाभ होणार आहे.
जुनी कर प्रणालीत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत. म्हणून, ज्यांनी जुन्या कर प्रणालीचा अवलंब केला आहे, त्यांच्यासाठी विद्यमान नियम लागू राहतील. या बदलांमुळे करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार योग्य कर प्रणाली निवडण्यास अधिक लवचिकता मिळेल.
Newsworldmarathi Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग आठव्यांदा बजेट सादर करत आहेत, ज्यामुळे त्या सलग आठ वेळा बजेट सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील.
बजेट 2025 बद्दल महत्त्वपूर्ण मुद्दे तज्ञ मांडत आहेत. मध्यमवर्गीयांना आयकरात दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकार मानक वजावटीची मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते.
तसेच, आयकर स्लॅबमध्ये बदल करून करदात्यांना सवलत देण्याची शक्यता आहे. या उपायांमुळे मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण थोड्याच वेळात त्यांचे आठवे बजेट सादर करतील. मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी आयकर स्लॅबमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वित्तीय तूट कमी करण्यासोबतच आर्थिक वृद्धी दर गाठण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मध्यमवर्गावर आई महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम असो, असे शुभ संकेत दिले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारकडून मध्यमवर्गीयांना कर सवलती देण्याची अपेक्षा आहे. आता थोड्याच वेळात, या अपेक्षांची पूर्तता होते का, हे समजेल.
Newsworldmarathi Pune : समाजात स्रियांचे स्थान बदलत चालले असले तरी स्रियांना त्रासदायक अशा अनेक अनिष्ट प्रथा आजही चालू आहेत. विशेषतः विधवांना समाजात अत्यंत क्लेशदायक पद्धतीने वागवले जाते. त्यांच्या मनाचा विचार न करता काही विशिष्ट कार्यक्रमात त्यांना सामावून घेतले जात नाहीच शिवाय त्यांना वेगळी अशी अवमानकारक वागणूक मिळते. सवाष्ण नसणं हा तिचा दोष नसतानाही समाजात काही अनिष्ट प्रथांमुळे तिला माणूस म्हणून आपला समाज वागवताना दिसत नाही. हे बदलायचं असेल तर प्रत्येक स्रिने बोलायला शिकले पाहिजे आणि प्रत्येक आई जागी झाली तर समतेच्या दिशेने सकारात्मक परीवर्तन होऊ शकते असे विचार वैदेही सावंत यांनी मांडले.
साने गुरुजी प्राथमिक शाळा, चक्रभेदी फाऊंडेशन देवरुख व इनरव्हील क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या अशा तीळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
Oplus_131072
शिव्या देणे बंद केले पाहिजे, वाईट प्रथा बंद व्हाव्यात म्हणून प्रबोधन केले पाहिजे व समाजात हळूहळू बदल घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. शासनाच्या वतीने दिलेल्या विविध योजनांचा अशा विधवा परित्यक्ता असहाय्य महिलांना लाभ मिळवून दिला पाहिजे असे विचार पुढे बोलताना त्यांनी मांडले.
यावेळी शासनाच्या बालकल्याण अधिकारी संगिता जाधवर मॅडम यांनी बाल संगोपन योजना,लेक लाडकी योजनांसारख्या महिलांना उपयुक्त अशा विविध योजनांची माहिती दिली.परित्यक्तांचे पूनर्वसन व्हावे म्हणून शासनाच्या वतीने योजना सुरू आहेत मात्र गरजू महिला याचा लाभ घेताना दिसत नाही याबाबत त्यांनी भाष्य केले.
यावेळी काही विधवा, परित्यक्ता महिलांचा गजरा माळवून तसेच साडी देऊन सन्मान करण्यात आला. विधवांनाही हा मान मिळावा, संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात त्यांची अवहेलना होऊ नये व अशा स्वरूपाच्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Oplus_131072
यावेळी उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून साडी देऊन सन्मानित करण्यात आले. अनामिका जानराव यांनी पालकांच्या वतीने सुंदर मनोगत व्यक्त केले. विधवा महिलांचा अशा पद्धतीने सन्मान होताना संपूर्ण सभागृह सद्गदित झाले.पाहुण्यांनाही अश्रू अनावर झाल्याचे चित्र सभागृहाने पाहिले.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राष्ट्र सेवा दल संचलित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा शिवाजी खांडेकर उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर मुख्याध्यापिका मीना काटे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रिती शिरोडकर, स्वाती हिरवे, चित्रा आदमाने,संगिता गोवळकर ,चक्रभेदी फाऊंडेशन च्या सदस्या प्रभावती उबाळे, संस्थेचे संचालक तुषार शिंदे, प्रज्ञा वझे,निलेश शेकदार,अविनाश खंडारे, सोपान बंदावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या मुख्याध्यापिका मीना काटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. संपूर्ण उपक्रमाचे सुंदर नियोजन करणाऱ्या संगिता गोवळकर यांनी सूत्रसंचालन केले तर शितल खेडकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा शिंगाडे,पूनम कदम,सारिका नांगरे यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फूलफगर या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.