Newsworldmarathi Pune : समाजात स्रियांचे स्थान बदलत चालले असले तरी स्रियांना त्रासदायक अशा अनेक अनिष्ट प्रथा आजही चालू आहेत. विशेषतः विधवांना समाजात अत्यंत क्लेशदायक पद्धतीने वागवले जाते. त्यांच्या मनाचा विचार न करता काही विशिष्ट कार्यक्रमात त्यांना सामावून घेतले जात नाहीच शिवाय त्यांना वेगळी अशी अवमानकारक वागणूक मिळते. सवाष्ण नसणं हा तिचा दोष नसतानाही समाजात काही अनिष्ट प्रथांमुळे तिला माणूस म्हणून आपला समाज वागवताना दिसत नाही. हे बदलायचं असेल तर प्रत्येक स्रिने बोलायला शिकले पाहिजे आणि प्रत्येक आई जागी झाली तर समतेच्या दिशेने सकारात्मक परीवर्तन होऊ शकते असे विचार वैदेही सावंत यांनी मांडले.
साने गुरुजी प्राथमिक शाळा, चक्रभेदी फाऊंडेशन देवरुख व इनरव्हील क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या अशा तीळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

शिव्या देणे बंद केले पाहिजे, वाईट प्रथा बंद व्हाव्यात म्हणून प्रबोधन केले पाहिजे व समाजात हळूहळू बदल घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. शासनाच्या वतीने दिलेल्या विविध योजनांचा अशा विधवा परित्यक्ता असहाय्य महिलांना लाभ मिळवून दिला पाहिजे असे विचार पुढे बोलताना त्यांनी मांडले.
यावेळी शासनाच्या बालकल्याण अधिकारी संगिता जाधवर मॅडम यांनी बाल संगोपन योजना,लेक लाडकी योजनांसारख्या महिलांना उपयुक्त अशा विविध योजनांची माहिती दिली.परित्यक्तांचे पूनर्वसन व्हावे म्हणून शासनाच्या वतीने योजना सुरू आहेत मात्र गरजू महिला याचा लाभ घेताना दिसत नाही याबाबत त्यांनी भाष्य केले.
यावेळी काही विधवा, परित्यक्ता महिलांचा गजरा माळवून तसेच साडी देऊन सन्मान करण्यात आला. विधवांनाही हा मान मिळावा, संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात त्यांची अवहेलना होऊ नये व अशा स्वरूपाच्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून साडी देऊन सन्मानित करण्यात आले. अनामिका जानराव यांनी पालकांच्या वतीने सुंदर मनोगत व्यक्त केले. विधवा महिलांचा अशा पद्धतीने सन्मान होताना संपूर्ण सभागृह सद्गदित झाले.पाहुण्यांनाही अश्रू अनावर झाल्याचे चित्र सभागृहाने पाहिले.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राष्ट्र सेवा दल संचलित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा शिवाजी खांडेकर उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर मुख्याध्यापिका मीना काटे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रिती शिरोडकर, स्वाती हिरवे, चित्रा आदमाने,संगिता गोवळकर ,चक्रभेदी फाऊंडेशन च्या सदस्या प्रभावती उबाळे, संस्थेचे संचालक तुषार शिंदे, प्रज्ञा वझे,निलेश शेकदार,अविनाश खंडारे, सोपान बंदावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या मुख्याध्यापिका मीना काटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. संपूर्ण उपक्रमाचे सुंदर नियोजन करणाऱ्या संगिता गोवळकर यांनी सूत्रसंचालन केले तर शितल खेडकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा शिंगाडे,पूनम कदम,सारिका नांगरे यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फूलफगर या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments