…त्या दोन मैत्रिणीं डबलसीट, अन रंगली चर्चा
Newsworldmarathi Pune :
राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे (मामी)आणि निर्मला काळे या दोन मैत्रिणींनी एकाच गाडीवर बसल्यानंतर एकच चर्चा रंगली. डांगे चौकातील प्रतिभा मोटर्स या ठिकाणी हिरोच्या नवीन गाडीचे लॉन्चिंग करण्यात आले यावेळी सारिका भरणे उपस्थित होत्या.
बारामती होस्टेलचे प्रमुख शिवाजी काळे, गंधाली काळे, शिवानी काळे यांच्यासह हिरो कंपनीचे अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रतिभा मोटर्सच्या प्रमुख निर्मला काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना सारिका भरणे म्हणाल्या, निर्मला ताईंचे नियोजन अतिशय काटेकोर असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणे इतकं सोपं नसतं त्यासाठी मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात. या प्रयत्नामध्ये कुठेही काळे फॅमिली कमी पडत नाही. त्यामुळेच ते आज यशाच्या शिखरावर असल्याचे आपणास पाहायला मिळते. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्याने देखील प्रतिभा मोटरचे कौतुक भरभरून केले.
पुण्यात चाललंय काय! कधी कोयता गँगची दहशत तर आता गाड्यांची तोडफोडी
Newsworldmarathi Pune : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये वाढती चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. विशेषतः, वाहनांची तोडफोड आणि ‘कोयता गँग’च्या दहशतीच्या घटना समोर येत आहेत.
मंगळवारी रात्री दत्तवाडी, लक्ष्मीनगर, आणि पर्वती परिसरात सुमारे ४० वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. या तोडफोडीत चारचाकी वाहने आणि रिक्षांचा समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
‘कोयता गँग’च्या दहशतीमुळेही पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या गँगच्या सदस्यांनी विविध भागात कोयत्यांचा वापर करून दहशत माजवली आहे. उदाहरणार्थ, लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पार्श्व प्रतिष्ठानकडून भाविकांसाठी विशेष बसचे आयोजन
Newsworldmarathi Pune :प.पू.गणेशलालजी महाराजसाहब यांनी देशभर अहिंसा प्रसाराचे मोठे कार्य केले, ते जैन समाजाचे महान तपस्वी होऊन गेले, सोबत खादी प्रचार प्रसार, अंगीकार, गोशाळा उभारणी आणि इतर अनेक मोठी कार्यें केली. त्यांच्या प्रेरणेने देशभरातील मंदिरात धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अनेक पशु हत्या बंद झाल्या.
गेल्या 132 महिन्यांपासून अमावस्येला पुणे ते जालना ( गुरुगणेश धाम ) ते आहिल्यानगर (आनंदधाम) ते पुणे अशी बस यात्रा अगदी नाममात्र मूल्य घेऊन पार्श्व प्रतिष्ठान च्या वतीने सुरु केली.
मार्गदर्शक महेंद्र सुंदेचा व पार्श्व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सौरभ पारसमल धोका यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८ जानेवारी २०२५ रोजी जवळपास 200 पेक्षा जास्त भाविकांना नाम मात्र मुल्यात – सेवा रुपात नेण्यात आले.
सौ. जया महेंद्रजी सुंदेचा मुथ्था, सौ. दिक्षा सौरभजी धोका, सौ.पुनिता रोहनजी भटेवरा व गुरुभक्त परिवार यांच्या विशेष सहयोगाने यात्रा आयोजित झाली.
२८ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातून रात्री 8:30 वाजता युवारत्न महेंद्रजी सुंदेचा मुथ्था, समाजरत्न प्रकाशजी भंडारी, राजेंद्रजी ताथेड़, सुनिलजी पारख, युवा उद्योजक पवन चोरडिया, गौरव धोका, देवेंद्र पारख, संदेश गादिया आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जैन ध्वजा दाखवून या बसेस सोडण्यात आल्या.
या यात्रेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या यात्रेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी पार्श्व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सौरभ पारसमल धोका, उपाध्यक्ष चेतन पारख, खजिनदार प्रशिल ताथेड यांनी मेहनत घेतली.
तसेच जालना श्री संघ यांनी खुप चांगली व्यवस्था केल्याने सर्वांनी आभार मानले.
पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी करणार : राजेश पांडे
Newsworldmarathi Pune :पुस्तक महोत्सवाला दुसऱ्या वर्षीही वाढता प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव म्हणजे सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. हा महोत्सव म्हणजे एका अर्थाने लोक चळवळ आहे. नजीकच्या काळात ट्रस्टचे मोठे दालन पुण्यात सुरू करण्यात येणार असून पुणे शहराला पुस्तकांची जागतिक राजधानी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांनी केले.
नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या वतीने पुण्यात भव्य-दिव्य ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीरित्या आयोजन केल्याचे निमित्त साधून नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांच्या सत्कार सोहळ्याचे शनिवारी (दि. 25) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजन करण्यात आले होते. पांडे यांचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना पांडे बोलत होते. हा अभिनंदन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाला.
प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संवाद, पुणेचे सुनील महाजन, ‘भावार्थ’च्या कीर्ती जोशी मंचावर होत्या.
पांडे पुढे म्हणाले, प्रकाशक, वितरक यांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला असून वाचकांनीही या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला याचा आनंद आहे. पुस्तक स्टॉल्सला वाचकांनी मोठ्या संख्येने भेट दिल्याने पुढील वर्षी किमान एक हजार स्टॉल्सस उभारण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पांडे यांनी आवर्जून सांगितले.
श्रवण मनन, चिंतन, लेखन, वाचन यामुळे समाज सुसंस्कृत होण्यास हातभार लागत आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. कारण वाचन हे मानवी मन श्रीमंत करीत असते, असे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
प्रा. जोशी म्हणाले की, पुस्तक महोत्सव म्हणजे एका अर्थाने वाचन संस्कृतीमध्ये क्रांतिकारी पाऊल आहे. पुस्तक महोत्सवातील पुस्तकांच्या खरेदीकडे वाढलेला कल पाहता मराठी मनाची गरीबीची मानसिकता दूर झाली आहे, असे जाणवते. पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीत वाढ झाली आहे. उत्तम नियोजन, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सर्व वयोगटातील वाचकवर्गाचा मिळालेला उदंड प्रतिसाद हे महोत्सवाच्या यशस्वीतेचे प्रमाण आहे. पुणे शहर हे वाचकांची राजधानी व्हावी यासाठी साहित्य परिषद आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाशक संघाचे अध्यक्ष बर्वे म्हणाले की, पांडे यांचे पुस्तक महोत्सवाचे कार्य नक्कीच स्वागतार्ह आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने वाचनाकडे वळविले आहे. अशा स्वरूपाचे महोत्सव गावोगावी झाले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास प्रकाशक संघ सर्वतोपरी सहकार्य करेल.सूत्रसंचालन पराग लोणकर यांनी केले तर सुनील महाजन यांनी आभार मानले.
खासदार सुनेत्रा पवार, डॉ. विश्वनाथ कराड यांना रमाईरत्न पुरस्कार
Newsworldmarathi Pune : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे शनिवार, दि. 1 फेब्रुवारी ते शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. लोकसहभागातून होणारा महामाता रमाई महोत्सव एकमेव आहे. महोत्सव दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे. लता राजगुरू महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन दि. 1 रोजी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधनाच्या प्रियांबलचे सामूहिक वाचन करून होणार आहे. रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा दि. 2 रोजी आयोजित करण्यात आला असून महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.
दि. 3 रोजी बाबासाहेबांच्या जीवनात रमाईंचे योगदान या विषयावर प्रबोधनकार ताहेर शेख यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी समाजसेवक अंजुम इनामदार असणार आहेत. दि. 4 रोजी आडकर फौंडेशनच्या सहकार्याने विनोदी कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित यांचा सहभाग असून अध्यक्षस्थानी प्रभा सोनवणे असणार आहेत.
दि. 5 रोजी रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्रातील कवी यात सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी विनोद अष्ठुळ असतील. दि. 6 रोजी सरदार भोलासिंग आरोरा, फिरोज मुल्ला, विल्सन चंदवेळ, डॉ. वैष्णवी किराड, बौधाचार्य आर. के. लोंढे या धर्म प्रमुखांच्या उपस्थितीत महामाता रमाई यांना वंदन केले जाणार आहे.
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला असून खासदार सुनेत्रा पवार, एम. आय. टी. शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
पुणेकरांनो काळजी घ्या! जीबीएसचे थैमान सुरूच, रूग्णांची संख्या शंभरीपार
Newsworldmarathi pune : पुण्यात सध्या गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत आहे. १०१ रुग्णांची नोंद झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. ग्रामीण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड आणि इतर जिल्ह्यांमधील रुग्णांचा समावेश असून त्यापैकी काही रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याचे दिसून येते.
GBS सारख्या आजारावर उपचार खर्चिक असल्याने अनेक रुग्णांना आर्थिक अडचणी येत आहेत. IVIG इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या उपचार पद्धतींमुळे खर्च लाखोंपर्यंत पोहोचत आहे. अशा स्थितीत ससून रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयात या उपचारांची सुविधा देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतोय.
गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा दुर्मिळ पण गंभीर आजार असल्याने त्यावरील उपचार महागडे आणि खर्चिक ठरत आहेत. सध्या GBS च्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे, जिथे उपचारासाठी आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिससारख्या महागड्या पद्धतींचा वापर केला जातो. यामुळे उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे, ज्यामुळे अनेक रुग्णांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येची दखल घेत, प्रशासनाने ससून रुग्णालय आणि महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS वरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रुग्णांना अधिक परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळतील, तसेच खासगी रुग्णालयांवरचा अवलंब कमी होईल.
योग्य उपकरणे, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून रुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार मिळू शकतील.
झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा: नाना पटोले
Newsworldmarathi Pune : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्य़क्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे.
काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा युती सत्तेत आली आहे पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुसऱ्याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखाण्यांचे १०० कोटी रुपयांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. महागाई कमी करण्याऐवजी एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.
अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे..
‘आप’ने दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बदनामी करणारी पोस्टर्स लावल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे. बेईमान कोण? व भाजपाची बी टीम कोण? हे देशातील जनतेला माहिती आहे, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले.
या कार्यक्रमाला CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, वरिष्ठ नेते हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, श्रीरंग बरगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार
Newsworldmarathi Delhi : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अनेकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनोहर जोशी यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान लक्षणीय मानले जाते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे ते शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव मानले जाते.
दिवंगत गायक पंकज उधास यांनी गझल गायनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप पाडली. त्यांच्या मधुर आवाजाने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांची गाणी आजही संगीत प्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.
तसेच दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील पद्मभूषण जाहीर झाला आहे. १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालेला आहे. पैकी तिघे जण महाराष्ट्राचे आहेत. एकूण १९ जणांना यंदा पद्मभूषण जाहीर झालेला आहे. एकूण ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यात ११ जण महाराष्ट्रातील आहेत.
यंदा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी एकूण १९ जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यापैकी तीघे महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी, दिग्दर्शक शेखर कपूर, दिवंगत गायक पंकज उधास – गझल गायनाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानंबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यापार, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा यामध्ये समावेश आहे.
पद्मश्री पुरस्कारामध्ये अशोक सराफ हे अभिनय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व आहेत, तर अश्विनी भिडे देशपांडे आणि जसपिंदर नरुला यांनी संगीत क्षेत्रात आपल्या गायनकौशल्याने ठसा उमटवला आहे. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ओळखले जाते, तर राणेंद्र भानू मजुमदार बासरी वादन क्षेत्रातील एक आदरणीय नाव आहे. कृषीतज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा यांनी कृषी क्षेत्रात नवी दिशा दिली आहे, तर वासुदे कामत यांचे चित्रकलेतील योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. विलास डांगरे यांचे कामही उल्लेखनीय आहे यामुळे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी
पुणे: शहरातील नवले पुलावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली. आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पूल हा रहदारीचा रस्ता आहे. यावरून दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते. अशातच शनिवारी पहाटे एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच १२ केडब्ल्यू ३६६३ ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात ठोकली. कारचा वेग इतका होता की कारचा पुढचा भाग काहीसा बिघडला. या कारमधून प्रवास करणारे मित्रमंडळी हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत
Newsworldmarathi pune : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विजयी संघातील खेळाडूंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत विजयी रॅली काढण्यात आली.
आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कॅप्टन प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “खो-खोच्या पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो-खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे. देशासाठी दैदिप्यमान करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.
कर्णधार प्रतीक वायकर म्हणाला, “कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासीयांच्या अपेक्षांची जबाबदारी होती. वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं, आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत. खो-खो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून शाळांमध्ये आणि अकादमींमध्ये या खेळाचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.”
यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी,सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे यांच्यासह सर्व मा नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

