जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Pune : हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुकक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी भेट दिली. राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यकाळामध्ये होणार्या एशियाड, ऑलंपिक्स् गेम्स्, कॉमनवेल्थ गेम्स्, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी मा. देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्याचे पहिली महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार, महाराष्ट्र केसरी २०२५ पै. पृथ्वाराज मोहोळ आणि पहिल्या खो-खो विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक व पुण्याचे शिरीन गोडबोले, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पै. सिककंदर शेख याच्या थरारक सामन्याचा आनंद देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी धीरज घाटे यांचे थोरले बंधू स्व. धनंजय घाटे यांना आदरांजली वाहीली.
कुस्तीपटूंना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुस्ती क्रीडा प्रकार भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून लोकप्रिय असून त्याला एक पारंपारीक वारसासुद्धा आहे. राज्य तसेच पुणे जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिले महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार यांचा सन्मान आपण आज केला असून ही जी परंपरा आपण पुढे नेली पाहीजे. त्यासाठी अशा भव्यदिव्य कुस्ती स्पर्धा आयोजनांची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.
मागच्या काळामध्ये कुस्ती खेळासाठी आणि कुस्तीपटूंसाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा अशा वेगवेगळ्या स्तरांवर होणार्या स्पर्धांमध्ये राज्यांच्या कुस्तीपटूंची वाढ झाली पाहीजे, असा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकामध्ये पाहिजे त्या प्रमाणात राज्याचे कुस्तीपटू जिंकत नाहीत. त्या दृष्टीने अजुन काय प्रयत्न करावे लागतील, उत्तम प्रशिक्षण कसे करता येईल, याचा विचार करावा लागेल, त्यासाठी राज्याचे सरकार पुढाकार घ्यायला तयार आहे. यासाठी राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
स्पर्धा वादविवादा शिवाय व्हाव्यात : चंद्रकांत पाटील
घरात दुःख असतानाही खेळाडूंसाठी उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करताना स्पर्धेदरम्यान वाद निर्माण होऊ नयेत याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असा महत्त्वाचा सल्ला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा असून, तिचे आयोजन हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर भरवली जात आहे.
या उपक्रमामुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे, तसेच कुस्ती क्षेत्राला चालना मिळत आहे. अशा स्पर्धांमध्ये वाद किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
या प्रसंगी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योजक पुनीत बालन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे, हिंद केसरी योगेश दोडके, तात्यासाहेब भिंताडे, अमोल बुचडे यांसह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.
परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा : प्रा. फुलचंद चाटे
Newsworldmarathi pune : विद्याथ्यांनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. कारण, परीक्षेच्या काळात विद्यार्थी जेवढा शांततेने आणि सकारात्मक विचाराने अभ्यास करेल तेवढा त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे प्रा. फुलचंद चाटे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने प्रा. चाटे यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.
प्रत्येक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो. परंतु, विद्यार्थी परीक्षेची विनाकारण भीती बाळगत असतात बरेचसे विद्यार्थी परीक्षा जवळ येईल तसे विद्यार्थी जागरण करीत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत बसतात, जास्त वेळ जागत बसतात त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांची पुरेशी झोप होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मेंदू थकून जातो आणि जो अभ्यास केलेला असतो तो लक्षात राहत नाही, त्यामुळे परिक्षेचा ताण न घेता नियोजनपूर्वक अभ्यास करावा.असेही त्यांनी सांगितले
आयुष्याच्या कसोटीत द्वारकानाथ संझगिरी जिंकले, पण….
द्वारकानाथ संझगिरी
मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली . दोस्ती शब्दाने चमकलात?आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते.वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेर्या मारत असताना मला मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला.माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं.मी आठवड्याने दक्षिण कोरियातल ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो.तो थेट आयसीसी यूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे .बदललं.
पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार,सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो. त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हा सारखा उजळला होता.विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.
इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला. ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.
मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले.
” सर पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा ”
आणि लढायला सज्ज झालो.
डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले. कधी कधी वाटायचं “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.” कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं.
भूक नाही, खाणं कमी त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होत.
डॉक्टर स्मृतीच म्हणणं होत, ” आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती.ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.
पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.
पायलोनायडल सायनस ऐकलंय?
एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे. सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं. पित्ताशय नाही काढलं तर….
तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा”
ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.माझा भाऊ
डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली.
पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.?
त्याने विचार मांडला.पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं.तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.
डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. अॅनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फालगुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते.
डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती.
आधी पित्ताशय काढायचं . आणि त्यावेळेला इतर महत्वाची ( vital) प्यारा मिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची. ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.
पण एकाक्षणी मी भाऊक झालो.
मी भावाला म्हटलं, ” दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”
तो म्हणाला, ” ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”मी म्हटलं , ” बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो”
लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.
तो म्हणाला, ” तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील” ह्या शब्दांनी मला धीर दिला.मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली. ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्ना पूर्वी वधूला नटवतात, तस माझं नटणं झालं.
वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या.माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सर्कवून आत आली आणि म्हणाली, ” बाबा, काय ऐकायचंय? मी म्हटलं, ” माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव ” मी संगीतात त्या ” “नटण्याच्या ” वेदना विसरून गेलो.नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो.
आठ तास ती मंगलाष्टकं चालली.
शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं.
पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता. जवळचे नातेवाईक , आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना , त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवतं होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो.
आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होत. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते. युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो. इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं.
मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट अॅटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.
माझ्या ऑपरेशनच वैद्यकीय भाषेतल वर्णन
Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं.
डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होत. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटल होतं.
चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान,अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकानी त्यांना मदत केली. त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता,हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीच ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता.
आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारलां. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं,आणि निर्णय घेतला जायचं पुढे.
हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता. मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली.
ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो.
त्याचं वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले. डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती.
नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली ” ऑपरेशन चांगल झालं. पित्ताशय किडनी दोन्ही काढलं”
भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला. माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.
देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला.
लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे.
या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.
ज्येष्ठ समीक्षक द्वारकादास संझगिरी यांचा हा जुना लेख आहे.
नगरसेवक वेडेपाटील यांच्या पुढाकाराने बावधन येथील उद्यानाचा वीज पुरवठा सुरळीत
Newsworldmarathi Pune : बावधन येथील नागरी वन उद्यान परिसरातील वीज बिल न भरल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे झाडांना पाणी देणे अशक्य झाले आणि परिणामी झाडे वाळू लागली, काही झाडे तर सुकून गेली. हे उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी रोजच्या वावराचे आणि निवांत क्षण घालवण्याचे प्रमुख ठिकाण आहे.
मात्र, वीज नसल्यामुळे येथे अंधार पसरला आणि उद्यानाची दुर्दशा सुरू झाली. ही परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहून नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी स्वतः समक्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तसेच फोनवरून सातत्याने संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या गलथान कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. परिणामी, मेहनतीने उभारलेले नागरी वन उद्यान ओसाड होण्याच्या मार्गावर होते.
नगरसेवक वेडेपाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच निर्णय होत नसल्याचे पाहून उद्यानातील हिरवाई वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातून ₹22,590 भरून वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे झाडांना पुन्हा पाणी मिळेल आणि उद्यान पुन्हा हिरवेगार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि उद्यानाचा नियमित वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या या तत्पर आणि सामाजिक जाणीवेच्या कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करून वेळेत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, आणि “पर्यावरण संरक्षण आणि लोकांसाठी उत्तम सुविधा देणे हीच आमची जबाबदारी आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आम्ही प्रशासनाकडे ठोस मागणी करणार आहोत,” असे मत दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
Newsworldmarathi Mumbai : ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ३ डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संझगिरी हे एक स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक होते. जवळजवळ ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत काही इतर प्रादेशिक भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्येही स्तंभलेखन केले आहे.
पुणेकरांनो काळजी घ्या! जीबीएसचा धोका वाढतोय…
Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 149 संशयित प्रकरणांपैकी 124 रुग्णांमध्ये GBS ची पुष्टी झाली आहे, आणि त्यापैकी 28 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दुर्दैवाने, या आजारामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
खरं तर जीबीएसचे रुग्ण पाहिले असता, सरसकट हा आजार लहानग्यांपासून ज्येष्ठांना होतोय. कारण जीबीएसची लागण झालेले अल्पवयीन रूग्णही सापडले होते आणि ज्येष्ठ नागरीक देखील सापडले होतेय. त्यामुळे हा आजार सरसकट सगळ्यांनाच होतोय, असा कयास अनेक तज्ज्ञांनी मांडला.
मात्र आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार जीबीएस आजार कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींना होतोय. म्हणजेच ज्या व्यक्तींना कोणताच आजार नाहीये, त्यांना हा जीबीस टार्गेट करतोय.
दरम्यान, पुणे शहरातील जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) ने केलेल्या अधिकृत डेटाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. कोणताही अंतर्निहित सह-रोग नसलेले लोक गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणताही आजार नसलेल्या निरोगी व्यक्तींना देखील खबरदारीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
Newsworldmarathi Pune : जे एस पी एम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी आज जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉ वसंत बुगडे डॉ संजय सावंत योगाभ्यासक प्रा डॉ भरत गोरडे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंढे यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे योग अभ्यासक प्रा डॉ भरत गोरडे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार चे महत्व अध्यात्म विज्ञान आणि योग अभ्यास आणि दैनंदिन जीवन यामध्ये किती महत्त्वाचा आहे. हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले. गुरुकुल शिक्षण पद्धती मध्ये पहाटे उठल्यानंतर सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा आणि सकारात्मकता कशा पद्धतीने तयार होते हे शिकविले जात असे त्याची आज दैनंदिन जीवनात प्रत्येकाला गरज भासत आहे.
त्यामुळे प्रत्येकाने सदृढ शरीर आणि मानसिकतेसाठी सूर्यनमस्कार करावेत असेही मत व्यक्त केले दररोज कमीत कमी 12 सूर्यनमस्कार करावेतच असाही सल्ला विद्यार्थ्यांना त्यांनी दिला आणि प्रत्यक्ष सूर्यनमस्कार कशा पद्धतीने करावा याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा निलोफर पटेल शेख प्रास्ताविक प्रा अजित चव्हाण पाहुण्यांचा परिचय दिपाली थोरात प्रा सिबा बनसोडे तर आभार प्रदर्शन प्रा दत्तात्रय साबळे यांनी मानले या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा अर्चना राऊत सुग्रीव जाधव आणि छात्रा-अध्यापक छात्र अध्यापिका यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली.
…जेव्हा ऋषीं सुनक स्वतःच्या फोटोच्या प्रेमात पडतात
Newsworldmarathi Pune : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक भारताच्या दौन्यावर आहेत. ऋषी सुनक यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या पुस्तकानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. यादरम्यान त्यांचा साधेपणा आणि मनमिळाऊपणा अनुभवण्यास मिळाल्याचे ‘ऋषी सुनक’ या पुस्तकाचे लेखक व वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांनी सांगितले.
मुंबईत रविवारी (दि.२) सायंकाळी सहा वाजता ऋषी सुनक अन् दिगंबर दराडे यांची भेट झाली. यादरम्यान दराडे यांनी लंडन येथे जाऊन लिहिलेल्या सुनक यांच्या जीवनावरील पुस्तकाची प्रत त्यांना भेट दिली. आपल्यावर लिहिलेले पुस्तक पाहून सुनक भारावून गेले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील त्यांचा फोटो पाहताच त्यांनी मनमुरादपणे दाद दिली.
पुस्तक लिहिल्याबद्दल दराडे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. पुस्तक वाचून मी माझा अभिप्राय आपणास नक्की पाठवेन, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या सुनक यांचा साधेपणा या ठिकाणी वेळोवेळी जाणवत होता. सहजरीत्या सर्वांशी वागण्याची त्यांची लकब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक प्रभाव पाडत होती.
त्यांनी स्वतः दराडे यांच्याबरोबर मोबाईलमध्ये सेल्फी काढला, हसतमुख चेहऱ्याने या ठिकाणी आलेल्या सर्वांनाच ते भेटत होते. भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक यांचा भारताशी नेहमीच स्नेहबंध राहिलेला आहे, सामाजिक कार्यकर्त्या व इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका खासदार सुधा मूर्ती आणि उद्योजक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या देशाचा पंतप्रधान होण्याचा त्यांना पहिला मान मिळाला.
प्रत्येक भारतीय माणसाला त्यांच्याविषयी अभिमान आहे. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे आणि मंदिरात जाऊन पूजा करणारे, गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणाऱ्या पंतप्रधानांचा या ठिकाणी सर्वांना अभिमान वाटत होता.
आळंदीतील अनधिकृत शिक्षणसंस्थावर दोन दिवसांत कारवाई करा; महिला आयोगाकडून सूचना
Newsworldmarathi Pune : आळंदी येथे अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या तक्रारींनंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धर्मादाय आयुक्त आणि महिला व बालविकास विभागाला दोन दिवसांत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांनीही या संस्थांवर कारवाईची मागणी केली आहे.
आळंदीत सुमारे १५० हून अधिक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत, ज्यापैकी काहीच धर्मादाय कार्यालयात नोंदणीकृत आहेत. नोंदणी नसलेल्या संस्थांवर प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव असल्याने, अशा घटनांना वाव मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा अनधिकृत संस्थांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, यामध्ये खरी पार्श्वभूमी म्हणजे धर्मदाय आयुक्त आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता, बाहेर गावातून आलेल्या लोकांनी अनेक संस्था सुरू केल्या. याच संस्थांमध्ये शिकणारे मुलं आणि मुली यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. म्हणून मी स्वतः आळंदी येथे संस्थांची पाहणी केली आहे.
संबंधित पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच जिल्हा बाल विकास विभाग यांच्यासमवेत बैठक घेऊन कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या संस्थांवर दोन दिवसांत कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

