“‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणी खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी केली आहे. आमच्या सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढण्यास निश्चितच मदत होईल.’’– पुनीत बालन (मालक, पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी)
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा
Newsworldmarathi Pune: युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून नेहमीच विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भारतीयांमध्ये क्रिकेट खेळांमधील प्रेम लक्षात घेऊन आता क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले, ‘‘या अकॅडमीसाठी दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. सिंहगड कॉलेजच्या वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा त्यात समावेश आहे.
या अकॅडमीतील सर्व सुविधा बीसीसीआय मानकांनुसार असणार असून पुढील सिझनपासून बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजन येथे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआय प्रशिक्षित प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून प्रवेश सुरू होणार असून दि. १५ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोचिंग सुरू होणार आहे. ही प्रोफेशनल अकॅडमी असल्यामुळे प्रवेश मर्यादित असणार आहेत.’’
ही अकॅडमी पुणे आणि महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत ठरणार असून, क्रिकेटमधील करिअर करण्याची इच्छाशक्ती असलेल्या मुला-मुलींसाठी ही एक ऐतिहासिक संधी मानली जात आहे.
सोयी-सुविधायुक्त मैदान
या अकॅडमीमध्ये पावसाळ्यातही सरावात कोणताही खंड पडणार नाही तर तो सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक मैदानावर इनडोअर ३ विकेट्सची सुविधा असणार आहे. त्यामुळे वर्षभर प्रशिक्षण सुरु राहिल. दोन्ही मैदानांवर खेळाडूंसाठी होस्टेल सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे बाहेरगावच्या खेळाडूंनाही सहज प्रशिक्षण घेता येणार आहे. याशिवाय खेळाडुंसाठी व्यायाम शाळा, जलतरण तलाव, फिटनेस कोचिंग अशा सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. या अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांगीण फिटनेस आणि स्पोर्ट्स कंडिशनिंगचीही सुविधा मिळणार आहे.
महिलांसाठी विशेष बॅचेस
महिला क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र बॅचेसची व्यवस्था असून, मुलींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाईल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लब मार्फत स्पर्धेच्या संधी
अकॅडमीतील खेळाडूंना पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लब तर्फे विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
वाहनकर्जासह गृहकर्जाचा EMI कमी होणार; RBI चा मोठा निर्णय
Newsworldmarathi Pune: भारतीय रिझर्व्ह बँकेने वाहनकर्जासह गृहकर्जदारांना मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे.
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे. महागाई दर सातत्यानं कमी आणि आर्थिक विकास दरात चांगली वृद्धी होत असल्यानं आरबीआयनं व्याजदर घटवल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
यंदाच्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण तीनवेळा कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉईंटची भर पडली आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयने रेपो रेट 6.50 वरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. चलनविषयक धोरण समितीने ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी केली होती. दुसऱ्यांदा, एप्रिलच्या बैठकीत व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. तिसऱ्यांदा, जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. त्यानंतर आता रेपो रेटमध्ये आणखी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
नवी मुंबई पालिकेच्या तांडेल उद्यानाचे सौंदर्य खुलणार; मधुरा गेठे यांच्या ‘चला उद्यान घडवू…उद्यान बहरू’ मोहिमेचा शुभारंभ
Newsworldmarathi Mumbai: एक-दोन नव्हे तर; शे-दोनशे उद्यानांच्या गर्दीत विसावलेल्या नवी मुंबई शहरात‘स्त्रीशक्ती’ च्या साथीने आणखी उद्यान बहरणार, फुलणार आहे.‘आरबीजी फाउंडेशन’ आणि या फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘चला उद्यान घडवू…उद्यान बहरू’ या वृक्षारोपणाच्या मोहिमेतून शंभर झाडे लावून, त्यांच्या संगोपनाचा निर्धार केला गेला. विशेष म्हणजे, या मोहिमेच्या शुभारंभाला नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या पत्नी रेवती शिंदे यांच्यासह महापालिकेतील धडाकेबाज महिला उपायुक्त
या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार केला.
सी-वूडसमधील स्व. बाळासाहेब तांडेल उद्यानात मधुरा गेठे यांनी राबविलेल्या वृक्षारोपणाच्या मोहिमेला नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त उद्यान विभागाच्या प्रमुख स्मिता काळे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर सहभागी झाल्या होत्या.
नवी मुंबई शहरात आजघडीला महापालिकेच्या माध्यमातून सुमारे पाचशे ठिकाणी छोटी उद्याने आणि झाडे लावून परिसर विकसित केला आहे. त्यातच, पामबिच रस्त्यालगत स्व. बाळासाहेब तांडेल उद्यान विकसित करण्यात येत आहे.
याच उद्यानाच सुमारे दोनशे झाडांचे रोपण करून त्यांचे जतन केले जाणार आहे. त्यासाठी ‘आरबीजी फाउंडेशन’ विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिचा शुभारंभ शुक्रवारी रेवती शिंदे यांच्या हस्ते झाला. तेव्हा, काळे, बाबर आणि म्हात्रे उपस्थित होत्या. या मोहिमेला शुभेच्छा देताना, रेवती शिंदे म्हणाल्या, ‘झाडांचे रोपण आणि त्यांची निगा राखण्यासाठी अशी मोहीम स्तुत्य आहे. तिचं नेहमी सहभाग ठेवू.’
काळे म्हणाल्या’, महापालिकेच्या उद्यानात वृक्षा
रोपणासाठी घेतला हा पुढाकार, शहराची शोभा वाढवेल.’’
‘प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक चिंताही वाढत आहे. अशा काळात आपण हिरवाई जपली पाहिजे. त्यामुळे वातावरण ताजेतवाने राहील, असे बाबर यांनी सांगितले.
उद्याने आणि त्यातील हिरवाई हे नवी मुंबई शहराचे सौंदर्य आहे. याच सौंदर्यामुळे आपले शहर आणखी बहरणार आहे. त्यामुळे हिरवाई जपली आणि वाढवावी लागणार आहे. या उद्देशाने ही मोहीम राबवली आहे.मधुरा गेठे अध्यक्षा, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई.
खडकी स्टेशनवरून सेतुबंधन योजनेतून उड्डाणपूल; नितीन गडकरी यांचा सुनील माने यांची मागणीला प्रतिसाद
Newsworldmarathi pune: औंधपासून खडकी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. येथे रेल्वेच्या पूलाखालून जात असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालून येथे भुयारी मार्ग करावा अथवा उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे.
केंद्रसरकारच्या सेतुबंधन योजनेतून हे काम करता येईल, ही बाब माने यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला गडकरी यांनी मान्यता दिली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत राज्य सरकारकडून प्रस्ताव देण्याची सूचना गडकरी यांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम केले जाईल, अशी माहिती माने यांनी दिली.
याबाबतचे निवेदन त्यांनी नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे आणि विकास लवांडे यावेळी उपस्थित होते.
माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील खडकी पोलिस स्टेशन जवळ रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे. हा रस्ता औंधरोडसह खडकी रेल्वे स्टेशन तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी,कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र अंडरब्रिज रस्ता केवळ एक – एक मोटार जाण्या- येण्यासाठी वापरता येतो, इतका अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते.
हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचा ताण लक्षात घेता खडकी स्टेशन येथे रेल्वे स्टेशन करण्यात आले आहेत. भविष्यात अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतील मात्र याच रस्त्यावर या रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. भविष्यात यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या मुळे या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सेतुबंधन योजनेतून खडकी रेल्वे स्टेशन उड्डाणपुल करण्याची मागणी माने यांनी गडकरी यांच्याकडे केली. या योजनेतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तो या ठिकाणी उपलब्ध करून द्द्यावा. अशी विनंती सुनील माने यांनी श्री. गडकरी यांना केली आहे.
——-
रावसाहेब पटवर्धन विद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींचा राष्ट्रीय जांबोरीमध्ये उत्कृष्ट सहभाग
Newsworldmarathi Pune: उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 ते शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 19 वी राष्ट्रीय जांबोरी आणि ग्रँड फिनाले डायमंड ज्युबली झाली. यामध्ये पुणे येथील रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील राणी लक्ष्मीबाई गाईड पथकातील 06 गाईडने उत्कृष्ट कामगिरी केली.
स्काऊट गाईड जांबोरीसाठी संपूर्ण देशभरातून 28 राज्य तसेच चार देशातील 35 हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 80 स्काऊट्स व 80 गाईड्स यांची निवड करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या हस्ते जांबोरीचा उद्घाटन समारंभ झाला, तर शेकोटी कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जांबो रीस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मुख्य उपस्थितीत जांबोरीचा समारोप समारंभ पार पडला.
स्काऊट गाईड संचलन, शोभायात्रा, लोकनृत्य, साहसी खेळ, विविध स्पर्धा, फूड प्रदर्शन किलोरामा,कॅम्प क्राफ्ट, पायोनिरिंग प्रोजेक्ट, नाईट हाईक,साईड सिन अशा अनेक गोष्टीत विद्यालयातील गाईडने सहभाग नोंदवत विद्यालय,पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याची शान उंचावली. शेकोटी कार्यक्रमातील लोकनृत्यात विद्यार्थ्यांनी महाराजांच्या महाराष्ट्राचे दर्शन घडवून आणले.
जांबोरीमध्ये विद्यालयातील इयत्ता नववी मधील पौर्णिमा मनोज सर्वगोड,अदिती तानाजी तुळसे,काजल रविकिरण उके, श्रावणी प्रवीण कांबळे, नेहा मनोज कांबळे, अक्षदा प्रकाश चौधरी या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला.सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला दहावी बोर्ड परीक्षेत 10 वाढीव गुण मिळणार आहेत. गाईडर सोनल सुतार यांनी विद्यार्थिनींना जांबोरी सहभागासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय जांबोरीतील विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर,विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे तसेच सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन करणारे विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर, पालक व दाते यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे विमानतळ देशात ‘टॉप २० मध्ये; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत १९ वा क्रमांक
Newaworldmarathi Pune : देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक पटकावून ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ही रँकिंग अलीकडेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली.
लोहगाव येथे असलेले पुणे विमानतळ हे प्रामुख्याने संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असून, विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगसाठी वायुदलाची धावपट्टी वापरण्यात येते. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला नैसर्गिक मर्यादा येतात. या सर्व कार्यात्मक अडचणी असतानाही पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक मिळवला आहे. पुणे विमानतळाहून दुबई आणि बँकॉक अशा केवळ दोन सेवा सुरू असताना देखील पुण्याने १९ वे स्थान मिळवणे हे उल्लेखनीय यश ठरले आहे. ही रँकिंग पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढविण्याची पुण्याची क्षमता आणि संधीही दाखवते.
पुणे शहर हे आधीच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर चाकण एमआयडीसीमधून अनेक आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्या कार्यरत असल्यामुळे पुणे ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणूनही झपाट्याने विकसित होत आहे. विमानवाहतूक तज्ञांच्या मते, विद्यमान टर्मिनलचे उन्नतीकरण झाल्यामुळे प्रवाशांची सोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एरोमॉलसारख्या सुविधा व विस्तारित टर्मिनल इमारत उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना आता सुलभ आणि सोयीसुविधांनी युक्त प्रवासाचा आनंद मिळत आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने अनेक नवी विमानतळे उभारली, तसेच विद्यमान विमानतळांवरही मोठ्या प्रमाणावर उन्नतीकरणाची कामे करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत विमानतळावरील सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्या आहेत.”मुरलीधर मोहोळ, खासदार,केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री
‘राष्ट्रवादी’ गडकिल्ले संवर्धन सेलच्या जिल्हानिहाय नियुक्त्यांना वेग
Newaworldmarathi Pune : शिवकालीन ठेवा असलेले गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी स्विकारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरू केलेल्या गड किल्ले संवर्धन सेलच्या जिल्हानिहाय नियुक्त्यांना वेग आला असून सांगली जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुकाध्यक्षांची निवड व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
शिवालय सभागृह कात्रज येथे आयोजित या कार्यक्रमात गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्ष एम.डी. चौधरी, मुख्य समन्वयक सचिन कोळी, सांगली जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र देवघरे तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तालुकाध्यक्षांना नियुक्ती पत्रं वाटप करण्यात आले.
सातत्याने गडकोट मोहिमा, गड भ्रमंती करणार्या हजारो असंघटीत युवकांना एकत्रीत आणून ते करत असलेल्या शिवकार्याला अधिक सक्षम करण्यासाठी योगेश शेलार यांनी गडकिल्ले संवर्धन सेल हि हक्काचे व्यवस्था उभारली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मान्यतेने महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी होवून सर्व जिल्हा कार्यकारणी बांधणी शेलार यांनी गतीमान केली.
याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा व पुणे जिल्हा तसेच राज्यपातळीवरील पदांवर नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रं वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना योगेश शेलार म्हणाले, गडकिल्ले संवर्धन करणारा युवक स्वयंस्फुर्त आणि समर्पीत भावनेने काम करणारा सच्चा शिवभक्त असतो. त्यांनाच योग्य ती ताकत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली आणि गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात सर्व जिल्ह्यात सेलची बांधणी करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी सांगली जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका अध्यक्षांशी मुक्त संवाद पार पडला. गडकिल्ले संवर्धनासह त्या भागातील वाड्या वस्त्या व गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला , ज्येष्ठ नागरिक, उद्योग, व्यावसाय, समस्यां सोडवणसाठी सक्रीय कार्य करण्याचे यानिमित्ताने ठरले.
म. फुलेंचे विचार आजही दिशादर्शक : शिवाजी खांडेकर
Newsworldmarathi pune: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची गंगा बहुजनांसाठी खुली केली. महिलांना सुशिक्षित केले.कृषीक्षेत्रात मोलाचे योगदान दिले.त्यांचे सत्यशोधक विचार आजही दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
आज अनेक शाळांत मुलींची संख्या लक्षवेधी आहे. स्त्रीया शिकल्या आणि सामाजिक प्रगतीत सुधारणा झाली. म. फुलेंचे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे विचार मा.शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी व्यक्त केले.
म. ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. म. फुलेंचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोठे असल्याने त्यांचा स्मृतिदिन समाज शिक्षक दिन म्हणून गेल्या २० वर्षांपासून साजरा करण्यात येतो.यावेळी नामदेवराव जरग यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शिवाजी खांडेकर, नामदेवराव जरग, अलका काळे, अनिल कांबळे,मीना काटे, जीवन इंगळे, संगिता गोवळकर, पुष्पक कांदळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे यांनी म.फुलेंचा अखंड गावून केली. प्रास्ताविक प्राचार्य अनिल कांबळे यांनी केले.यावेळी सोपान बंदावणे आणि पुष्पक कांदळकर यांनी शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन मनिषा संगारे यांनी तर आभार जीवन इंगळे यांनी मानले.
गुड वाइब्स फिटनेस क्लबचा तिसरा वर्धापन दिन उत्सवात साजरा
Newsworldmarathi Pune: महिलांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळेल तेथून घेणे हि काळाची गरज असून, स्वस्थ, तंदुरूस्त महिलाच कुटुंबासह देशाच्या आधारस्तंभ आहेत. निरोगी जीवन व उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांना योग प्रशिक्षणाची आवड निर्माण करणारी गुड वाइब्स फिटनेस क्लबचे काम खऱ्याअर्थानं महिला सक्षमीकरणाचेच आहे ते आणखी जोमाने व्हावे अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी व्यक्त केली.
कात्रज येथील गुड वाइब्स फिटनेस क्लबचा
तिसरा ‘वर्धापन दिन’ सोहळा शेलारमळा ‘शिवालय सभागृहात’ पार पडला. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुचिता पानसरे, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे, महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार, संजीवनी शेलार व सपना शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला.
महिलांच्या तंदुरूस्तीसाठी मयुरी शेलार यांनी तीन वर्षापूर्वी हा क्लब सुरू केला. केवळ महिलांसाठीच हा क्लब सुरू केल्यामुळे महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. नियमीत योग आणि व्यायामाचा सकारात्मक परिणाम महिलांनी केवळ वर्षभरात अनुभवला. आत्मविश्वास वाढलेल्या महिलांनी क्लबचा ‘वर्धापन दिन’ साजरा करून तंदुरूस्त जीवनाची दिशा दिली.
तीसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आयोजीत योग लेखी परिक्षेत यशस्वी झालेल्या ईश्वरी हुळे ,यशश्री गाजर्लेवार,
किशोरी पाटील ,ऋतुजा गुजर, धनश्री गुजर, सरिता खैरे यांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक आयुक्त
सुचिता पानसरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
दिपाली कोळपकर व यशश्री गाजरलेवार यांनी सुत्रसंचलन केले. मयूरी शेलार यांनी आभार मानले
बारामती नगरपरिषद निवडणूक : दोन प्रभागांवर न्यायालयीन ट्विस्ट, उर्वरित निवडणुका नियोजित वेळेतच
Newsworldmarathi pune: बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन प्रभागांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग १३-ब आणि प्रभाग १७-अ या दोन जागांसाठी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली असून, या दोन प्रभागांतील मतदानाची तारीख अद्यापही ठरलेली नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार २६ नोव्हेंबर रोजी प्रभाग १३-ब आणि १७-अ साठी अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र या अर्जांची छाननी, उमेदवारी मागे घेणे यांसारखी पुढील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम मिळाल्यानंतरच राबवली जाणार आहे.
त्यामुळे या दोन प्रभागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदासह इतर सर्व प्रभागांमध्ये निवडणुका मात्र पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे राजापूरकर यांनी स्पष्ट केले.
न्यायालयीन निर्णयामुळे अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे बारामतीत उत्सुकतेने पाहिले जात असून, पुढील कार्यक्रमाविषयी राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

