Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशाला आणि ‘ऑलिव्ह ग्रीन वेंचर्स फौंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९६५ च्या युद्धाला साठ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त प्रत्यक्ष युध्दभूमीवर काढलेल्या दुर्मिळ छायाचित्रांद्वारे त्या काळातील इतिहास लोकांसमोर जिवंत केला जाणार आहे. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त एअरमार्शल प्रकाश सदाशिव पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे ,माजी विद्यार्थी जयप्रकाश रामचंद्र भट, डी.आर.डी.ओ मधील शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, लष्करी इतिहासकार नितीन शास्त्री, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर व शालेय पदाधिकारी उपस्थित होते.या मान्यवरांचे स्वागत एन.सी.सी विभागातील विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन केले. विद्यार्थी समर्थ राऊत याने एअरमार्शल प्रकाश पिंगळे यांना स्वतः काढलेले स्केच भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी भारतीय सैन्यदलाच्या या यशोगाथेतून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन इतिहास घडवण्याचा प्रयत्न करावा असा संदेश आपल्या प्रास्ताविकातून दिला.
एअर मार्शल प्रकाश सदाशिव पिंगळे यांनी प्रत्यक्ष १९६५ च्या युद्धाच्या वेळी त्यांनी विमानांचा हल्ला कसा रोखला व ते युद्धामध्ये कसे यशस्वी झाले हा साहसी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर कथन केला. प्रशालेचे माजी विद्यार्थी जयप्रकाश भट यांनी नागरिकांसमोर इतिहास जागृत ठेवण्यासाठी आमची संस्था या प्रदर्शनाचे आयोजन करीत असते असे सांगितले.
शाळासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या मनामध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून आर्मी ,नेव्ही, तसेच सैन्य दलात भरती व्हावे असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देवळणकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एन.सी.सी विभाग प्रमुख राजेंद्र पवार यांनी करुन दिला. पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी ११.३० ते ४.०० यावेळेत सर्व नागरिक व पालक या सर्वांना हे प्रदर्शन पाहण्यास खुले आहे. सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी इतर शाळेतील विद्यार्थ्यांना ११.३० ते ४.०० या वेळेत हे प्रदर्शन पाहण्याची सोय करण्यात आली आहे.तरी या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
Newsworldmarathi Pune: महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र राज्यात महायुतीकडून भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, सुनिल सर्वांगोड, महेंद्र कांबळे, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विनोद टोपे, संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे, विशाल शेवाळे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, विरेन साठे, अनिल कांबळे, हकीम शेख, आसिफ सय्यद, चिंतामण जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या. मुंबई महापालिकेत 17 ते 18 तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या, विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असेही आठवले म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेसाठी विस प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भारतीय जनता पक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले.
दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मियांना प्राधान्य देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी देखील या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मुस्लिम बोहरा, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अशा सर्व धर्मीय समाजाच्या हिताचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. मोदी हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, असा दावा आठवले यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.
सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला. गोरगरिबांना उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबवणे हा आमचा अधिकार आहे आणि ते आमचे कर्तव्य देखील आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांना अशा योजना राबवता आल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या मतांमध्ये वाढ करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महार वतनाच्या जमिनीची सद्यस्थिती तपासून पहा
अमेडिया कंपनीकडून मुंडवा येथील महार वतनाची जमीन हडपण्याच्या प्रकाराबद्दल आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महार वतनाच्या जमिनी विकण्याचा अथवा विकत घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तरीदेखील राज्यभरात महार वतनाच्या अनेक जमिनी हडप करण्यात आले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमावी. या समितीने एका महिन्यात आपला अहवाल द्यावा. राज्य सरकारने स्थानिकांच्या हिताचा निर्णय या जमिनींबाबत घ्यावा. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.
Newsworldmarathi Baramati: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सौ. प्रतिभाकाकी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. १२ व शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे २४वे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी कनिष्ठ विभागाची व शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ विभागाची वकृत्व स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी ६ + २ = ८ मिनिटे वेळ देण्यात आला असून वरिष्ठ विमागासाठी रु. ११०००, रु. ७०००, रु. ३००० व रु. १००० आणि कनिष्ठ विभागासाठी रु. १००००, रु. ५०००, रु. २०००, रु. १००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. दोन्ही विभागांसाठी ‘सांघिक’ स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खळदकर यांनी दिली. बारामतीची ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ ही अखिल महाराष्ट्रात ‘वक्तृत्वाचा मानदंड’ म्हणून नावारुपास आलेली स्पर्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी या गाजलेल्या स्पर्धेत सहभागी होत असतात.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे –
कनिष्ठ विभाग –
१. अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी
२. कृत्रिम बुद्धिमत्ता व भारताची कृषिप्रधानता
३. संतांनी महाराष्ट्राला दिलेली जीवनमूल्ये
४. राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व – शरदचंद्रजी पवार
५. गाथा – ‘वंदे मातरम्’ची …
वरिष्ठ विभाग –
१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – आव्हाने व उपाय
२. नारायण सुर्वे – भाकरीचा चंद्र शोधणारा कवी
३. कृत्रिम बुद्धिमत्तेने घडविलेली कृषिक्रांती
४. त्रिभाषाविषयक धोरणाचे राजकारण
५. शरदचंद्रजी पवार – एक संघर्षयोद्धा
स्पर्धकांसाठी महत्त्वाच्या सूचना –
१. या वर्षीची वक्तृत्व स्पर्धा ऑफलाईन मोडवर घेण्यात येईल.
२. कनिष्ठ विभागाची स्पर्धा शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी व वरिष्ठ विभागाची स्पर्धा शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल.
३. स्पर्धेची नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८.०० वा. केली जाईल. आपल्या महाविद्यालयाच्या मा. प्राचार्याचे पत्र, स्वतःचे ओळखपत्र, मोबाईल नंबर व बँक डिटेल्स (पासबूक पहिल्या पानाची झेरॉक्स) इ. माहिती नोंदणी करताना जमा करावी.
४. सकाळी ९.०० वा. स्पर्धा सुरू होईल व संध्याकाळी ५.०० वा. पारितोषिक वितरण समारंभात स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र वितरण केले जाईल.
५. बक्षिसाची रक्कम रोख स्वरुपात न देता स्पर्धकाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
६. प्रत्येक संघासाठी २००/- (दोनशे रूपये) नोंदणी शुल्क आकारले जाईल.
७. सन्माननीय तज्ज्ञ परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील.
८. महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर, पदविका या विभागातील विद्यार्थी स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
९. प्रत्येक महाविद्यालयास कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संघ पाठविता येईल. संघातील स्पर्धकांना स्वतंत्र विषयावर बोलावे लागेल.
१०. स्पर्धक महाविद्यालयाचा अधिकृत विद्यार्थी असावा.
११. प्रत्येक स्पर्धकास ६ +२ = ८ मिनिटे वेळ दिला जाईल. वेळेचे बंधन अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे (८१४९१४२४५३),
डॉ. श्रीराम गडकर (९७६४८५००३५), प्रा. सुनील डिसले (९९६०२४८५१७), या स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खळदकर (८९७५०६२८९७), प्रा. शिवाजी टकले (९८६०९९३२१९), प्रा. कल्पना चौधर-खाडे (७३५०४६८२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
Newsworldmarathi Pune: नागपूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित अभ्यासक्रम-आधारित एकदिवसीय कार्यशाळा 24 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडली. विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील सर्व मराठी विषय शिक्षकांना या कार्यशाळेसाठी एक दिवसाची कर्तव्य रजा मंजूर करण्यात आली होती. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात असा उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश नखाते, कार्याध्यक्ष प्रा. सपन नेहरोत्रा आणि सचिव प्रा. संजय तिजारे यांच्या पुढाकारातून घडून आले. मराठीची अस्मिता जोपासणे, शिक्षकांना अद्ययावत ठेवणे, नवनवीन कौशल्य आत्मसात करणे, नवीन अभ्यासक्रमातील आव्हाने आणि संच मान्यता यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी शिक्षकांना कायमस्वरूपी कर्तव्य रजा मिळावी, यासाठी पुढील वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या वक्तव्याला उपस्थित शिक्षकांनी दणदणीत टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालिका डॉ. माधुरी सावरकर यांनी मराठी भाषा आणि विषय टिकवायचा असेल तर अशा उपक्रमांची आजच्या काळात आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. शिवलिंग पटवे यांनीही महासंघाच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यशाळेमुळे मराठी विषय शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसोबतच मराठी विषयाच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
Newsworldmarathi Pune: संविधान दिनाच्या निमित्त रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पुणे येथे 26 नोव्हेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव श्री शिवाजी खांडेकर विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कांबळे पर्यवेक्षक श्री जीवन इंगळे, शिक्षक प्रतिनिधी श्री. पुष्पक कांदळकर विद्यार्थी प्रतिनिधी सुमित सरोज व सोनाली बनसोडे उपस्थित होते.
श्रीमती वाझेदा मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे व भारतीय संविधानाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. श्री खांडेकर यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या जगण्यात संविधानाचा अंमल कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य कांबळे सर यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचे आपण पाईक आहोत त्यांचा वारसा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची आहे याची जाणीव करून देतानाच संविधानाने दिलेल्या अधिकारांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी राजश्री सातपुते हिने सर्व विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले. यानंतर भारतीय संविधान चिरायू होवो, माणसा माणसा जागा हो संविधानाचा धागा हो, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी दांडेकर पूल चौक ते निलायम ब्रिज अशी मानवी साखळी तयार करून भारतीय संविधाना प्रति आदर व्यक्त करत परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी ॲड. राजश्री अडसूळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार अभयजी छाजेड, माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, प्राचीताई दुधाने, उषाताई राजगुरू, प्रियांका मधाळे, ज्योती चंदेवळ, अनिताताई धिमधिमे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवण्यासाठी आणि शहरातील पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी अडसूळ यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
नियुक्तीनंतर ॲड. राजश्री अडसूळ यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, काँग्रेसच्या मूलभूत मूल्यांनुसार पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. यामुळे पुणे शहर काँग्रेसच्या नेतृत्वात नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.
शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती.
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी ३१.६० किलोमीटर असून त्यावर एकूण २८ स्थानके असतील. यासाठी ९८५७ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या नव्या मार्गिकांमुळे शहरातील रहिवासी भाग, आयटी पार्क व बाजारपेठांशी मेट्रोने जोडला जाईल. तसेच या दोन्ही मार्गिका सध्याच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांच्या जवळून धावणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. मेट्रो हा त्यातील प्रमुख घटक असून शहरातील मेट्रोचे जाळे लवकरच शंभर किलोमीटरहून अधिक विस्तारेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.
Newsworldmarathi Pune: साधू वासवानींच्या विचारांची आजच्या काळातील गरज असून “प्राणिमात्रांवरील दया आणि अहिंसेचा मार्ग हा मानवतेचा खरा धर्म आहे. साधू वासवानी यांनी आयुष्यभर दिलेला हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. २५ नोव्हेंबरला सर्वांनी मिळून ‘मांसरहित दिवस’पाळावा आणि त्यांच्या करुणामय विचारांना व्यापक स्वरूप द्यावे,” असे आवाहन पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी केले. मानवतेची सेवा करताना कोणतीही जात, धर्म किंवा भेदभाव न पाहता सर्वांना प्रेमाने वागवावे, हा त्यांचा संदेश समाजात पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
करुणा, प्रेम आणि मानवतेची शिकवण देणारे गुरुदेव साधू वासवानी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साधूवासवानी मिशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीचा वेध घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
Oplus_16908288
कार्यक्रमाला साधू वासवानी मिशनच्या प्रमुख कृष्णा दीदी उपस्थित होत्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. साधू वासवानी मिशन सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळापासून करत असलेल्या सेवाभावी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. उपस्थितांनी गुरुदेवांच्या शिकवणीचे स्मरण करत समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा घेतली.कार्यक्रमात सहभागी सर्वांनी साधू वासवानींच्या आदर्शांना अनुसरून मानवतेचे मूल्य जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
Newsworldmarathi Pune: साधू वासवानींच्या विचारांची आजच्या काळातील गरज असून “प्राणिमात्रांवरील दया आणि अहिंसेचा मार्ग हा मानवतेचा खरा धर्म आहे. साधू वासवानी यांनी आयुष्यभर दिलेला हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. २५ नोव्हेंबरला सर्वांनी मिळून ‘मांसरहित दिवस’पाळावा आणि त्यांच्या करुणामय विचारांना व्यापक स्वरूप द्यावे,” असे आवाहन पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी केले. मानवतेची सेवा करताना कोणतीही जात, धर्म किंवा भेदभाव न पाहता सर्वांना प्रेमाने वागवावे, हा त्यांचा संदेश समाजात पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
करुणा, प्रेम आणि मानवतेची शिकवण देणारे गुरुदेव साधू वासवानी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साधूवासवानी मिशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीचा वेध घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
Oplus_16908288
कार्यक्रमाला साधू वासवानी मिशनच्या प्रमुख कृष्णा दीदी उपस्थित होत्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. साधू वासवानी मिशन सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळापासून करत असलेल्या सेवाभावी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. उपस्थितांनी गुरुदेवांच्या शिकवणीचे स्मरण करत समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा घेतली.कार्यक्रमात सहभागी सर्वांनी साधू वासवानींच्या आदर्शांना अनुसरून मानवतेचे मूल्य जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
Newsworldmarathi pune: लाजवाब लेडीज क्लबतर्फे बहुगुणी आणि लोकप्रिय अभिनेते कन्वलजीत सिंह यांच्या उपस्थितीत आयोजित प्रेरणादायी सत्राला सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधेपणा, आत्मीयता आणि मैत्रीपूर्ण स्वभावाने मनं जिंकणारे कन्वलजीत यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनेक अनुभव, संघर्ष आणि आठवणी सहजपणे मांडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवास, कलाविश्वातील बदल, जीवनातील शिकवणी तसेच कुटुंब आणि मूल्ये या विषयांवर हृद्य शब्दांत संवाद साधला. त्यांचे स्पष्ट आणि जमिनीवरचे बोलणे सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरले. दरम्यान, प्रश्नोत्तर सत्रात महिलांनी विविध प्रश्न विचारत संवाद रंगवला.
लाजवाब लेडीज क्लब हे महिलांसाठी रचनात्मकता, संस्कृती आणि समाजाभिमुख उपक्रमांचे अनोखे व्यासपीठ आहे. शिकणे–सामायिक करणे–जुळून राहणे या मूल्यांवर आधारित हा क्लब नेहमीच नवीन उपक्रम राबवत असतो. या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की क्लब हा फक्त सामाजिक गट नसून एक सर्जनशील आणि सांस्कृतिक कुटुंब आहे.
यावेळी क्लब च्या फाउंडर कविता गोयल आणि ललिता अग्रवाल यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कन्वलजीत सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या उपस्थितीमुळे हा सायंकाल अधिक खास आणि संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले