विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो…तो ‘ब्लॅक बॉक्स’ नेमका काय असतो….
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उहाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते.
याला ‘बबैंक बॉक्स का म्हणतात? तो खरंच काळा असतो का?
नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा नसतो. तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल.
ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात?
ब्लैक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतातः १. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) – विमानाचे वेग, उंची, दिशा, इंजिन माहिती रेकॉर्ड करतो. २. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) -पायलट व सह-पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो.
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय असते?
अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो? ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो. त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो.
ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो?
ब्लॅक बॉक्स विमानात मागच्या भागात बसवलेला असतो, कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो.
ब्लॅक बॉक्स किती डेटा साठवू शकतो?
त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो. जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो. अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यात साठवलेला असतो.
भारतात कोणत्या संस्था ब्लॅक बॉक्स तपासतात?
भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी खालील संस्था करतात: १. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), २. विमान अपघात तपास ब्यूरो (एएआयबी)
ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का?
मुख्य वापर अपघाताच्या चौकशीसाठीच असतो, पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठीही ब्लॅक बॉक्समधील डेटा उपयुक्त असतो.
ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर? जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही, तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठवले जाते.
मृत्यूला कवटाळतानाची स्थितप्रज्ञता; पायलट सुमित सभरवाल यांची त्यांना मिळालेल्या ४० सेकंदातली समय सूचकता
Newsworldmarathi Gujrat : संकटाच्या काळात, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत कधीच गडबडून न जाता मन स्थिर ठेवत स्थितप्रज्ञ, याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर कुठलाही एका टोकाचा परिणाम होऊ न देता मन मध्यबिंदूवर स्थिर करत आपण परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे, व उद्भवलेल्या समस्येवर आलेल्या संकटावर उत्तमातला उत्तम पर्याय, सोल्युशन आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण विचलित न होता स्थितप्रज्ञ अवस्थेला जाण्याचा सल्ला आपल्या महाभारतात भगवान श्रीकृष्ण ने दिला आहे.
अहमदाबाद जवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमाना ची दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि 304 किमी प्रति तासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे केवळ 600 – 900 फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचं बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं.
मी आता टीव्हीवर विविध चॅनेलवर चर्चा ऐकत आहे त्यातील तज्ञ सांगतात की जर का पायलट सुमित सभरवाल घाबरून जाऊ हडबडाहट मधे या विमानालाला कुठेही, कसेही पडू दिलं असतं तर 25000 अतिशय दाट लोक वस्तीवर हे विमान कोसळलं असतं मृत्यूचा आकडा भयानक राहिला असता.
स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना श्रद्धांजली देतानाच त्यांना आपण सलामही केला पाहिजे त्यांच्या या स्थितप्रज्ञ अवस्थेतील निर्णयासाठी. स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात; ब्रेक दाबताच लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसल्या, ड्रायव्हरचा तडफडून मृत्यू
Newsworldmarathi Pune: पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंगाधाम चौकामध्ये नुकतेच ट्रकने उडवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शहरातील चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका कंटेनर ट्रकला मोठा अपघात झाला आहे.
अर्टिगा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात करकचून ब्रेक दाबल्यामुळे सळ्या केबिनमध्ये घुसून झालेल्या अपघातात ट्रेलर चालक आणि साथीदाराला प्राण गमवावे लागले. मुंबईकडून बंगळूरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते.
ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.
ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आली. अर्टिगा चालकाने या ट्रेलरसमोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ट्रेलर चालकाने अर्टिगा कारला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला.
त्यामुळे ट्रेलरमध्ये असणाऱ्या सळ्या आणि पाईप या थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या. यातच चालकाचा आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. हा ट्रेलर मूळचा राजस्थानचा असून ट्रेलर चालक हाच याचा मालक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं, अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. हा अपघात ट्रकमध्ये लोखंडी रॉड्स ठेवताना असलेली निष्काळजीपणा आणि वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
“एअर इंडिया दुर्घटनेची बातमी ऐकून मी आणि अक्षता सुन्न झालो आहोत”; ऋषी सुनक यांच्याकडून भावना व्यक्त
Newsworldmarathi London : गुरुवारी अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया AI171 या विमानाच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून भारत आणि ब्रिटनमधील नागरिकांचा समावेश आहे.
या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी आणि अक्षता एअर इंडिया दुर्घटनेची बातमी ऐकून अत्यंत सुन्न झालो आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारत आणि ब्रिटन यांच्यातील नातं हे केवळ मैत्रीचं नव्हे, तर एक विशेष बंध आहे. या भीषण घटनेत जी कुटुंबं भारतीय आणि ब्रिटिश नागरिकांना गमावून बसली आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्यासाठी आमच्या प्रार्थना आणि भावना आहेत.
भारतातील आणि ब्रिटनमधील नागरिकांच्या एकजुटीचे प्रतीक – ऋषी सुनक यांचा भावनिक संदेश
ऋषी सुनक यांनी या संदेशातून भारत आणि ब्रिटन यांच्यातील नात्याचा उल्लेख करत, दोन्ही देशातील लोकांसोबत सहवेदना व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनातील दुःखाला आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार संदीप रामदासी यांना देवर्षी नारद पुरस्कार जाहीर
Newsworldmarathi Mumbai: विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे (mumbai) प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा दर वर्षी ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. या पुरस्काराचे यंदाचे 25वे वर्ष आहे. त्या निमित्ताने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अशा प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या 11 जणांचा सन्मान केला जाणार आहे. 203 वर्षे जुन्या असलेल्या मुंबई समाचारचा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली 77 वर्षे कार्यरत असलेल्या हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक न्यूज एजन्सीलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे. तर पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी (कविता) मयेकर यांचा सन्मान होणार आहे. या व्यतिरिक्त, सोशल मीडिया पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याचा सन्मान होणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार 14 जून 2025 रोजी एनएसई बिल्डिंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) इथे होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका तर विशेष अतिथी म्हणून टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर व टाइम्स नाऊ नवभारतच्या एडिटर-इन-चीफ नाविका कुमार उपस्थित राहणार आहेत. रा.स्व.संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील.
दरम्यान, संदीप रामदासी हे दोन दशकांहून अधिक काळ पत्रिकारितेत कार्यरत असून टेलिव्हिजन मीडियात एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून पत्रकारितेत आपलं योगदान देत आहेत.
पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा कहर
Newsworldmarathi Pune: गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून पुणे शहरात विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार ते अती मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने याबाबत आधीच अंदाज वर्तवला होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे झपाट्याने आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहराची झोप उडाली.
पावसाच्या भीषण तडाख्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला, परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर इतका होता की काही वेळेस दूरवर काहीच दिसत नव्हतं. नोकरीवरून घरी परतणारे नागरिक पावसात अडकले. काही जणांना मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावरच थांबावे लागले.
गुरुवारी रात्री दहा वाजता हलक्या सरींनी सुरुवात झाली. पंधरा मिनिटात पाऊस थांबल्याने अनेकांनी घरी जाण्यास सुरुवात केली. पण अवघ्या दहा मिनिटातच आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि पावसाने रौद्ररूप धारण केले. शहरातील पेठांपासून उपनगरांपर्यंत या पावसाचा मोठा प्रभाव जाणवला.
आगामी तीन दिवस पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाने १३ ते १६ जूनदरम्यान पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुणे शहर व परिसरात विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांसाठी सूचना :
• घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत बाळगावा
• विजांच्या कडकडाटात झाडाखाली उभे राहू नये
• मोबाईलवर बोलणे टाळावे
• मोकळ्या जागांपासून दूर राहावे
• सखल भागात जाण्याचे टाळावे
हवामान खात्याच्या सूचनेनुसार नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया : “ही दुर्घटना शब्दांपलीकडची वेदना!”
Newsworldmarathi Gujrat : भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, “अहमदाबादमधील ही दुर्घटना स्तब्ध करणारी आहे. यातून होणाऱ्या वेदना शब्दांत सांगता येणार नाहीत. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना सर्व पीडितांसोबत आहेत. संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून मदतकार्य सुरू आहे.”
गुरुवारी (१२ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केलेली एअर इंडिया फ्लाइट AI171 कोसळली. या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाने जाहीर केलेल्या प्रवासी यादीनुसार, एकूण २४२ प्रवासी या बोईंग ७८७ विमानात होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगाल आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. अपघातात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.
विमानाने घेतली ‘मेडे कॉल’, पण… उत्तर न देता कोसळलं!
DGCA चा प्राथमिक अहवाल: टेकऑफनंतर थेट अपघात; विमानतळ बंद
दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून AI171 फ्लाइटने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच ‘मेडे कॉल’ देण्यात आला. मात्र त्यानंतर एटीसीकडून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण कोणतेही उत्तर मिळाले नाही. DGCA ने आपल्या निवेदनात सांगितले की, “विमानाने रनवे २३ वरून १३:३९ वाजता उड्डाण केलं. त्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेरच्या भागात कोसळलं.
‘ड्रीमलाइनर’चे डेंजरस लँडिंग: बोईंगच्या अत्याधुनिक विमानाची सर्वात मोठी दुर्घटना!
US बनावटीच्या बोईंग 787 ड्रीमलाइनरला भीषण अपघात; चौकशी सुरु
ही दुर्घटना बोईंग कंपनीच्या ‘ड्रीमलाइनर’ मालिकेतील विमानाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात गंभीर दुर्घटना मानली जात आहे. लंडनकडे निघालेलं हे विमान गुजरातमध्येच कोसळलं असून, या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. विमानाने टेकऑफ घेतल्यापासून काही मिनिटांतच हा भीषण अपघात घड
सदर वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद
अहमदाबाद विमानतळावरील सर्व फ्लाइट ऑपरेशन्स तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही उड्डाणास किंवा लँडिंगस परवानगी नाही.
विजय रुपाणी कोण होते?
Newsworldmarathi Gujrat : विजय रुपाणी यांनी ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत गुजरातचे १६वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचा जन्म रँगून (सध्याचे यांगून), म्यानमार येथे झाला होता. भाजपमधील ते एक महत्त्वाचे नेते होते.
मुख्यमंत्रीपदापूर्वी त्यांनी १९९६-९७ मध्ये राजकोटचे महापौर, २००६ ते २०१२ या काळात राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले होते. २०१४ ते २०१६ या कालावधीत ते गुजरात सरकारमध्ये परिवहन, कामगार आणि जलपुरवठा मंत्री होते.
ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी आनंदीबेन पटेल यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र २०२१ मध्ये त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी सांगितले होते, “मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला आहे. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. पक्ष जे काम देईल, ते मी करत राहीन.”
या अपघातात त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात आणि पक्षात शोककळा
विमान अपघातात निधन
: लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI171 विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्या उपस्थितीची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केली आहे.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आमचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी लंडनला त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. तेही या दुर्घटनेचे बळी ठरले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भाजपसाठी ही एक मोठी हानी आहे.”
“आशीर्वाद खुशबू बेटा”; आई वडिलांना अश्रू अनावर
Newsworldmarathi Gujrat : खुशबू (वय २१), राजस्थानमधील नवविवाहित युवती, लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये होती. फ्लाइट AI171 उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळली, २०० हून अधिकांचा मृत्यू फ्लाइट एका सरकारी रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळली, अपघातानंतर विमानाने पेट घेतला.
अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 मध्ये २४२ प्रवासी होते. त्यामध्ये राजस्थानच्या बाळोतरा जिल्ह्यातील २१ वर्षीय नवविवाहित खुशबू यांचाही समावेश होता. त्या आपल्या पतीकडे लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांचे पती विपुल हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
खुशबू बुधवारी रात्री वडील आणि चुलत भावासोबत अहमदाबादला पोहोचल्या होत्या. विमानतळावरून वडील मदनसिंग यांनी तिच्यासोबतचा फोटो क्लिक करून व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिले होते – “आशीर्वाद खुशबू बेटा, लंडनला निघाली आहे.”
खुशबू आणि विपुल यांचे लग्न जानेवारी महिन्यात झाले होते. विवाहानंतर दोन महिन्यांतच विपुल लंडनला परत गेले होते. त्यानंतर खुशबू आपल्या माहेरी व सासरी राहून प्रवासासाठी पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करत होती.
तिचा प्रवासाचा दिवस कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता. घरातून निघताना आई आणि भावंडांना मिठी मारताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे वडील, जे गावात मिठाईचे दुकान आणि शेती करतात, स्वतः कार चालवत अहमदाबादपर्यंत गेले होते. त्यांच्यासोबत पुतण्या होता.
स्थानिक भाजप युवा नेता दुर्गासिंह राजपूरोहित यांनी सांगितले की, कुटुंब बुधवारी गावातून निघाले आणि रात्री उशिरा अहमदाबादला पोहोचले. तिच्या मागे तिच्या दोन बहिणी आणि भाऊ असं कुटुंब आता अचानक झालेल्या या दुःखद घटनेने हादरून गेले आहे.
लंडनकडे निघालेलं AI171 हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान गुरुवारी दुपारी १:३९ वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झालं. काही मिनिटांतच विमानाने “मेडे कॉल” दिला आणि जवळच्या एका सरकारी रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळलं. अपघातावेळी विमानाला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात हाहाकार माजला.
अधिकार्यांनी सांगितले की या अपघातात २०४ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले की मृतांमध्ये तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये भारत, यूके, पोर्तुगाल आणि कॅनडा येथील नागरिक होते.
सेना, एनडीआरएफ आणि सीआयएसएफ यांच्यासह सरकारी यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवली. विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली आणि नंतर पुन्हा सुरू करण्यात आली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (AAIB) चौकशी सुरू आहे.
तटकरेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर, विमान दुर्घटनेत महाराष्ट्राची लेक
अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. टेक ऑफनंतर अवघ्या दोनच मिनिटांत विमान कोसळलं आणि परिसरात भीषण स्फोट झाला. या अपघातात 200 पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे नातेवाईक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपर्णा महाडिक या देखील होत्या. विमानातील क्रू मेंबर्सची नावे समोर आली असून यामध्ये क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील असे आठजण होते. यापैकी अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या नात्यातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. अमोल देखील स्वतः एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे आपल्या वहिनी राहत असलेल्या मुंबई गोरेगाव ईस्ट येथील निवासस्थानी पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून २४२ प्रवासी प्रवास करत होते, यातील सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

