Newsworldmarathi Pune : कर्णधार आशु मलिक याच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने बंगाल वॉरियर्सवर ४७-२५ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मध्यंतराला सतरा गुणांची आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी दहा सामने जिंकले होते. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत ठेवला होता. आजचा सामना जिंकून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या तुलनेमध्ये बंगाल वॉरियर्स संघाची कामगिरी निराशा जनक झाली आहे त्यांनी आतापर्यंत १८ सामने खेळले त्यामध्ये केवळ त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. आजची लढत जर त्यांनी गमावली तर त्यांचे प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्नही भंगले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही संघांसाठी आजची लढत महत्त्वपूर्ण होती.
प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या दृष्टीने दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच आघाडी कशी राखता येईल हीच रणनीती आखली होती. दहाव्या मिनिटापर्यंत त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. अर्थात बंगालच्या खेळाडूंनीही जिद्दीने त्यांना लढत दिली. बाराव्या मिनिटाला त्यांनी दिल्लीच्या अशू मलिक याची पकड करण्याचा आततायी प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि परिणामी कर्णधार फाजल अत्राचेली याच्यासह त्यांचे चार खेळाडू बाद झाले. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच लोणही बसला. या लोणमुळे दिल्ली संघाने आघाडी दहा गुणांपर्यंत वाढवली. मध्यंतराला त्यांनी २६-९ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच दिल्ली संघाने दुसरा लोण चढविला आणि आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २९-१० अशी आघाडी होती. त्यानंतर त्यांनी आपली आघाडी आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे २३ गुणांची आघाडी होती.
दिल्ली संघाच्या विजयामध्ये आशु मलिक याच्या चढायांबरोबरच योगेश याने पकडी मध्ये केलेली अव्वल कामगिरी याचाही मोठा वाटा होता. बंगाल संघाकडून एस विश्वास व नितेश कुमार यांची लढत अपुरी ठरली.