Homeपुणेगदिमांच्या ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन

गदिमांच्या ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन

Newsworldmarathi Pune : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन्‌‍ डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला.

‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीत नाटकांच्या दरबारामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी साकारलेल्या या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. यातील नाट्यपदे, संवाद वेगळ्या धाटणीचे असून त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या नाटकामधून त्या काळातील समाजव्यवस्था, एकोपा, वर्णव्यवस्था, शिक्षण, कौटुंबिक रचना तसेच सावकारी पाशानी पिचलेला समाज या वास्तवतेचे अनुरूप दर्शन घडते.

या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‌‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे‌’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत असलेल्या वर्षा जोगळेकर यांनी नाटकाचे कथानक गोष्टी रूपाने उलगडत नेले. ‌‘खेळीमेळीने करू न्याहरी‌’, ‌‘परतल्या घरट्याला पक्षीणी‌’, ‌‘त्या ओढ्याच्या पैलथडी एक असावी झोपडी‌’, ‌‘सुटला गं सांजवारा‌’, ‌‘परतेल शिपाई माझा‌’, ‌‘हरि तुझे नाम गायीन अखंड‌’, ‌‘उजळले भाग्य आता‌’ ही पदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली.

सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी अभिवाचन केले तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ लाभली. नाटकातील पदांच्या मूळ चाली उपलब्ध न झाल्याने निनाद जाधव यांनी पदांना नव्याने समर्पक चाली लावल्या आहेत. या अनोख्या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments