Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दावोस येथे होणाऱ्या जागतिक अर्थ परिषदेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादिवशी केलेल्या करारांमध्ये बहुतांश कंपन्या भारतीय असल्याचे दिसून येते. भारतीय कंपन्यांशी दावोस मध्ये करार करण्यापेक्षा ‘व्हायब्रंट गुजरातच्या’ धर्तीवर महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक बोलताना माने म्हणाले, महाराष्ट्र सध्या आर्थिक विपन्नावस्थेत आहे. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये ८२,०४३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचा कर्जाचा बोजा ७.११ लाख कोटीवर नेऊन ठेवला आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी करण्यात आला आहे. ९६,००० कोटींच्या अतिरिक्त भारासह महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणखी बिकटता येऊ शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक होती म्हणून हात ढिला सोडला होता, त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. पुढील पाच वर्ष काटेकोरपणे आर्थिक नियोजन करावे लागेल अशी कबुली दिली आहे. त्यामुळे राज्याला दावोस दौरा परवडण्यासारखा आहे का ? याचा सरकारने विचार केला पाहिजे.
महाराष्ट्रात रोजगार वाढीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यकच आहे. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र दावोसमध्ये केले जाणारे गुंतवणूक करार प्रामुख्याने भारतीय कंपन्या आणि भारतीय उद्योजक यांच्याबरोबर केल्याचे दिसत आहे. असे करार करण्यासाठी दावोसला जाण्यापेक्षा मुंबई किंवा पुण्यात हे करार करता येतील. कारण या कंपन्या मुंबई-पुण्यात नक्कीच येऊ शकतात. पुढील वर्षी राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा.
गुजरातमध्ये दरवर्षी जागतिक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी व्हायब्रंट गुजरात म्हणून भव्य कार्यक्रम घेतला जातो. तसा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम महाराष्ट्रात का होत नाही. गुजरातमध्ये गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी तर मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहीम कमी करण्यात आली नाही ना अशी शंका या निमित्ताने येते. मुख्यमंत्र्यांनी यापुढेही गुंतवणुकीचे धोरण निश्चितपणे आक्रमक पद्धतीने राबवावे त्यासाठी आम्ही सर्व पाठिंबाच देऊ मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्र दिमाखात सुरू करून खरोखरची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल असे काम करण्याची आवश्यकता असल्याचे माने यांनी म्हटले आहे.