Newsworldmarathi Pune : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झालेले डॉ. भावार्थ हे सर्वात युवा विश्वस्त आहेत.
आळंदी येथे नुकत्याच झालेल्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. देखणे यांची पालखी सोहळाप्रमुखपदी तर योगी निरंजननाथ यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे आणि योगी निरंजन नाथ यांच्या नावाची घोषणा संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी केली.
डॉ. देखणे, ॲड. उमाप व योगी निरंजन नाथ यांची गत वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी निवड झाली होती. ॲड. उमाप यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून तर योगी निरंजन नाथ यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून कार्यरत होते.
योगी निरंजन नाथ आणि डॉ. भावार्थ देखणे यांची नेमणूक झाल्याची माहिती ॲड. उमाप व संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी कळविली आहे. डॉ. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. देखणे घराण्याची ओळख म्हणजे भारुड. सुप्रसिद्ध भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांची भारुडाची परंपरा डॉ. भावार्थ देखणे जपत आहेत व पुढे नेत आहेत.
वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार व व्याख्याते म्हणून डॉ. भावार्थ देखणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. योगी निरंजन नाथ यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आहे. एक साधक म्हणून त्यांनी अनेक वर्षे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सेवा रुजू केली आहे.