Newsworldmarathi Pune : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना अभियानाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, मोनिका रंधवे तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डूडी यावेळी म्हणाले, बाल लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, बालिकांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि विकासाच्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बाल लिंग गुणोत्तराचे पुणे जिल्ह्याचे प्रमाण वाढावे याकरिता पुढील सहा आठवड्यांमध्ये सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.