Newsworldmarathi Pune : पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात, विभागीय व जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणांचा या आजारा संदर्भात करण्यात येणाऱ्या उपचार व उपायोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी डॉ.पुलकुंडवार म्हणाले, ज्या भागामध्ये,कॉलनी मध्ये पेशंट आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्त्रोत महानगरपालिकेने तपासावेत आणि नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी.
दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा जेणेकरून हा आजार नेमका कशामुळे होतोय याची माहिती समोर येईल आणि नागरिकांना त्याबाबत सजग करता येईल.
सहसंचालक आरोग्य सेवा यांनी तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन त्यानंतर नागरिकांच्या माहितीसाठी एक मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध करावी.
आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार म्हणाले,गुलेन बारी सिंड्रोम हा मज्जातंतूचा आजार असून या आजारामध्ये सुरुवातीला पोटाचे आजार जसे, जुलाब, उलटी, पोटदुखी किंवा श्वसन आजार जसे, की खोकला,सर्दी इत्यादी होते.
आजार झाल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर रुग्णालयाच्या हात पायाची ताकद कमी होते व रुग्णास चालता येत नाही व हात हलवता येत नाही आजार वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होतो व रुग्णास व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासू शकते या आजाराचे निदान नर्वे कंडक्शन स्टडी व ( सी एस एफ तपासणीद्वारे) पाठीच्या मणक्यावरील पाणी तपासून केले जाते.या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार घ्यावेत या आजारातून बहुतांश रुग्ने बरे होतात असे त्यांनी सांगितल.
ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये या आजाराचे सध्या १० प्रौढ रुग्ण व दोन लहान मुलं दाखल झाले आहेत. यामध्ये आठ पुरुष व चार स्त्रिया यांचा समावेश आहेत. सर्व रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
बैठकीस,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मीरा बोराडे, बीजे मेडिकल विद्यालयाचे मायक्रोलॉजी विभाग प्रमुख राजेश कार्यकर्ते महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एच.डी. प्रसाद उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, साथरोग विभागाच्या सहसंचालक बबिता कमलापूरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, मनपा पाणी पुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.