जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये ११ प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्यक केले जात आहे.
११ मृत्यू ४ जण गंभीर जखमी
गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोकांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.