Newsworldmartahi Pune : क्रोध, काम आणि लोभ हे दुर्गण व्यापाऱ्यांसाठी घातक असून क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी व्यक्त केले.दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” २०२४ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया बोलत होते.
या कार्यक्रमात मे. गौतम ट्रेडर्स, सोलापूरचे वस्तीमल संकलेचा यांना राज्यस्तरीय पुरस्कार, मे. संगम कलेक्शन, राजगुरूनगर, पुणेचे विजयकुमार भन्साळी यांना पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार, तर मे. रामकृष्ण ऑईल मिल, पुणेचे आनंद पटेल यांना पुणे शहरस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद मे. पुरणचंद अॅन्ड सन्स्, पुणेचे सतीश गुप्ता आणि दि पूना मर्चंटस् चेंबर युवा सभासद मे. आर.बीज् ड्रायफ्रुट, पुणेचे राजीव बाठिया यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आदर्श पत्रकार संजय ऐलवाड यांना कै. वि.ल. गवाडीया पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सभासदांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया म्हणाले की, अनेकदा सर्व प्रयत्न करूनही व्यापारात नुकसान होते. अशावेळी झाले ते ईश्वराची ईच्छा होती, असे मानून पुढे सरकणे आवश्यक असते. क्रोध हा नेहमी होऊन गेलेल्या घटनेवर आधारित असतो. ती घटना म्हणजेच भूतकाळात निघून गेलेला क्षण असतो. अशा वेळी गेलेला क्षण किंवा होऊन गेलेल्या कृतीवर क्रोध व्यक्त करून आपण भविष्यातील काही संधी गमवण्यचा धोका असतो.
कामाचा कितीही ताण असला तरी मन आणि बुद्धी शांत तसेच स्थिर ठेवून वाटचाल केली पाहिजे.यावेळी बोलताना इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका म्हणाले की, आज प्रदान करण्यात आलेले पुरस्कार हे आजवर मिळालेल्या कामाची पावती आहे. या पुरस्कारा पासून प्रेरणा घेऊन भविष्यात अजून चांगले विधायक काम पुरस्कारार्थींना करायचे आहे. एकटा व्यापारी प्रत्येक समस्या सोडवू शकत नाही, त्यासाठी चेंबर सारखी ऐक्याची प्रतिक असलेली सक्षम यंत्रणाच आवश्यक आहे.यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा तसेच विजय भन्साळी आणि सतीश गुप्ता यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी स्वागत केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.