Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून, मराठी भाषेचे आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. या परिषदेच्या शाखा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पसरलेल्या असून, सोलापूर ही त्यापैकी एक महत्वाची शाखा आहे. संस्थेतर्फे अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जातात. परिषदेतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर ह्यांचा गौरवपत्र प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. शिकारपूर यांचे ‘आधुनिक तंत्र एआय व सर्वसामान्यांवर होणारा परिणाम’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. मंचावर मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्त सुरवसे, सदस्य जे. जे. कुलकर्णी व किशोर चांडक उपस्थित होते.
डॉ. शिकारपूर गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 59 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते युवापिढी सक्षम व कौशल्यतेने परिपूर्ण घडवू इच्छित आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हाव्ोत यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रतर्फे डॉ. शिकारपूर यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.