Newsworldmarathi Pune : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे स.प. महाविद्यालय मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ट्रस्टची दोन भव्य दालने उभारण्यात आली आहेत.
महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, महा आरोग्य शिबीर दालनात मोफत रक्त, नेत्र, दंत, हृदय आजार, डोळे, श्रवण, त्वचा अशा २६ हून अधिक विभागांमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या व आजारांवरील निदान करण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसात ५ हजारहून अधिक रुग्णांनी या शिबिरातील सेवांचा लाभ घेतला आहे. या तपासण्या व सुविधांकरिता २८ हून अधिक रुग्णालये आणि संस्थानी सहभाग घेतला आहे.
मुख्य दालनात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील गणरायाचे लाईव्ह दर्शन येथील दालनामध्ये होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्य मंदिराची भव्य रंगावली व ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची संपूर्ण माहिती या दालनामध्ये माहिती व छायाचित्रे स्वरूपात देण्यात आली आहे. तरी पुणेकरांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासोबतच ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेण्याकरिता रविवार, दि.२२ डिसेंबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० यावेळेत भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.