Newsworldmarathi Pune : आपण राहतो त्या राज्यात पोस्टींग मिळावे यासाठी अधिकाऱ्यांचा सतत प्रयत्न असतो. मात्र इतर राज्यांमध्ये काम केल्याने आपण नक्कीच समृद्ध होतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा संपूर्ण देशात सन्मान केला जातो, त्यामुळे इतर राज्यात जाऊन काम करताना मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक दिली जाते, असे मत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव’ या विषयावर परिसंवादाचे आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. आसाम आणि मेघालय येथे 15-16 वर्षे काम केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, तसेच 15 वर्षांपासून राजस्थानमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी संतोष चाळके आणि 39 वर्षे सेवेत असलेले अरुण उन्हाळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशासनातील गमतीशीर गोष्टी..
इतर राज्यात काम करताना तेथील भाषा, संस्कृती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्यावेळेला काही मजेशीर प्रसंग घडतात. याविषयी चाळके म्हणाले, माझी राजस्थानात नियुक्ती झाली तेव्हा मी पोलिस स्टेशनमध्ये 5 जणांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना मी त्यांचे काम, पद या गोष्टी विचारात घेतल्या. मात्र त्याठिकाणी मिना ही प्रमुख जात असल्याने मी सुद्धा मिना जातीचा आहे आणि त्यामुळे मी 3 मिना जातीच्या लोकांची नियुक्ती केल्याचे बोलले जायला लागले. मी राजस्थानी नाही तर महाराष्ट्रातून आलो आहे हे समजल्यावर माझ्या पत्नीचे नाव मिनल आहे तर ती तरी मिना जातीची असेल असेही त्या लोकांना वाटले. मला तोपर्यंत याविषयी अजिबातच कल्पना नव्हती. पण नंतर मात्र हा सगळा गैरसमज दूर झाला आणि काम सुरळीतपणे सुरू झाले.
प्रशासनातही विविधेत एकता..
भारतात विविधतेत एकता आहे असे आपण म्हणतो किंवा ऐकतो. पण प्रशासनात काम करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. इतर राज्यांमध्ये काम करताना भाषा, संस्कृती, अन्न वेगळे असले तरी प्रेम, दु:ख, निसर्ग, जवळीक या गोष्टी सगळीकडे सारख्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवते. निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही बरीच प्रगत असल्याचे जाणवले, असे उन्हाळे म्हणाले.
राजकीय अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक..
प्रशासकीय अधिकारी आणि पुढारी यांचा अतिशय जवळचा संबंध असतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण महाराष्ट्राबाहेर पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना किंवा अगदी वाहनचालकांनाही अतिशय आदराची वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात हे चित्र अभावानेच पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी आमदार, नगरसेवक असे सगळेच जण आसाम किंवा राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा आदर करतात असे सोळंकी म्हणाले.