Newsworldmarathi Pune : ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत रहावी म्हणून २४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही दिवस सायं. ७ वा. ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत.
याअंतर्गत वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी मार्गाकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीनतोफा चौक सरळ लष्कर पोस्ट अशी वळविण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.
सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गाने पुढे सोडण्यात येईल, असे आदेश पुणे वाहतूक. शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.